Join us  

Reason To Feel Sad : उदास वाटतं, विनाकारण टचकन डोळ्यात पाणी येतं, असं का ? त्याचीच 4 कारणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 5:14 PM

Reason To Feel Sad : अचानक डोळ्यात पाणी येणे, खूप रडावेसे वाटणे असं सगळं तुमच्यासोबतही होत असेल तर त्यामागची नेमकी कारणं शोधून त्यावर काम करणे आवश्यक आहे हे वेळीच लक्षात घ्या.

ठळक मुद्दे काहीवेळा आपला हट्टीपणा कमी करुन समोरच्याचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे.सतत नकारात्मक विचार केले तर तुम्हाला त्यातून कोणीही बाहेर काढू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या हाताने निराशा ओढवून घ्याल.

बरेचदा असं होतं की काहीच कारण नसताना आपल्याला उगाचच खूप उदास वाटत राहतं. आपण खूश आहोत असं आपण दाखवत राहतो पण प्रत्यक्षात आतून मात्र आपण खूप निराश असतो. अनेकदा असंही होतं की आपल्या आजुबाजूला अनेक चांगल्या गोष्टी घडत असूनही आपण त्यामुळे खूश न होता आपण स्वत:मध्येच गर्क राहतो आणि त्यामुळे आपला मूड विनाकारण ऑफ राहतो (Reason To Feel Sad). आता आपल्या लक्षात येत नाही पण अशा कोणत्या गोष्टी असतील ज्यामुळे आपण उदास असतो. अचानक डोळ्यात पाणी येणे, खूप रडावेसे वाटणे असं सगळं तुमच्यासोबतही होत असेल तर त्यामागची नेमकी कारणं शोधून त्यावर काम करणे आवश्यक आहे हे वेळीच लक्षात घ्या. नाहीतर हा उदासपणा दिवसेंदिवस वाढत जाईल आणि मग त्यातून बाहेर येणे अवघड होऊन बसेल. 

(Image : Google)

१. काळजी करणे 

अनेकदा आपल्याला कोण काय म्हणेल, अमुक गोष्ट झाली नाही तर आपले भविष्य कसे असेल यांसारख्या गोष्टींची चिंता वाटत असते. आपल्याला वाटले नाही तरी अशी सतत चिंता करण्याचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. सतत चिंता केल्याने आपल्या मनात नकळत नकारात्मक भावना निर्माण होतात. या भावना सातत्याने आपल्यासोबत राहिल्या तर आपण उदास व्हायला लागतो. त्यामुळे विनाकारण भविष्याची किंवा ज्या गोष्टींची काळजी करुन उपयोग नाही अशा गोष्टींचा विचार करत बसू नये. त्यामुळे उगाचच आपला मूड खराब होतो. 

२. पश्चाताप 

आयुष्यात काही गोष्टी आपण करुन जातो आणि त्या केल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. या गोष्टी खूप मोठ्या असतील असे काही नाही तर या गोष्टी अगदी लहानही असू शकतात. मात्र त्या केल्यानंतर पश्चाताप केल्याने आपल्याला उदास वाटू शकते. कोणाशी छोटेमोठे भांडण होणे किंवा कोणाला आपण उलटे उत्तर देऊ न शकणे अशा गोष्टी आपल्या डोक्यात घर करुन राहतात. याचा आपल्याला विनाकारण त्रास होत राहतो आणि आपण उदास होतो. 

३. दु:खी राहणे 

सगळे लोक आपल्या विरोधात आहेत, आपले नशीबच खराब आहे, आपल्यासोबत चांगले काही घडतच नाही अशाप्रकारचे विचार आपल्याला दु:खी करतात. त्यामुळे असा विचार न करता सकारात्मक विचार करणे अतिशय गरजेचे असून त्यामुळे तुम्ही आनंदी राहू शकाल. मात्र सतत नकारात्मक विचार केले तर तुम्हाला त्यातून कोणीही बाहेर काढू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या हाताने निराशा ओढवून घ्याल.

(Image : Google)

४. हट्टीपणा 

सातत्याने आपण वागतो तेच बरोबर किंवा आपलेच म्हणणे खरे करणे हे चुकीचे आहे. अशामुळे लोक आपल्यापासून नकळत दूर जायला लागतात आणि आपण एकटे पडतो. त्यामुळे काहीवेळा आपला हट्टीपणा कमी करुन समोरच्याचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. त्यामुळे लोक आपल्याला किंमत देतात आणि आपल्याला एकटे किंवा निराश वाटणे कमी होऊ शकते. 

टॅग्स :मानसिक आरोग्यआरोग्य