सायली कुलकर्णी (मानसोपचारतज्ज्ञ)
आजकाल आपण सगळेच एका नव्या मल्टी-स्क्रीनिंगच्या जगात जगतो आहोत. टीव्हीवर चालणारा शो, हातात मोबाइल, बाजूला लॅपटॉप आणि मध्येच टॅबवर दुसरं काही, मेंदू एका क्षणासाठीही शांत नाही. प्रत्येक वयोगटातील माणसा बाबतीत स्क्रीनचा हा गोंधळ जाणवतोय. अर्थात तरुणाईचं प्रमाण यात जास्त दिसून येतं कारण त्यांच्या जगण्याचं, शिकण्याचं आणि विरंगुळ्याचं केंद्रच आता स्क्रीनभोवती फिरतं आहे(Popcorn Brain Syndrome).
या डिजिटल गतीच्या पार्श्वभूमीवर मानसशास्त्रज्ञ डेव्हिड लेव्ही आणि मायकेल डी मॉन्टमार्ट्रे यांनी ‘पॉपकॉर्न ब्रेन सिंड्रोम’ ही संकल्पना मांडली. त्यांच्या मतानुसार, सततच्या स्क्रीन वापरामुळे मेंदू सतत उत्तेजन शोधू लागतो. जणू काही गरम तव्यावर (popcorn brain mental health) उडणाऱ्या पॉपकॉर्नसारखा. एका क्षणासाठीही तो स्थिर राहू शकत नाही.
‘पॉपकॉर्न ब्रेन सिंड्रोम’ म्हणजे काय?
‘पॉपकॉर्न ब्रेन सिंड्रोम’ ही एक मेंदूची अवस्था आहे. या अवस्थेत मेंदूला सतत नवं, वेगवान आणि आकर्षक काहीतरी हवं असतं. सोशल मीडियावरचं प्रत्येक नोटिफिकेशन, पुढचे रील, नवे मेसेजेस या सगळ्यामुळे मेंदूला डोपामिनचं क्षणिक सुख मिळतं. पण हळूहळू ही सवय एक व्यसनासारखी बनते. परिणामी मेंदूला शांत बसणं, पुस्तक वाचणं किंवा मनन करणं कठीण वाटू लागतं. प्रौढ व्यक्तींपेक्षा किशोरवयीन मुलांमध्ये मल्टी स्क्रीनिंगचे दुष्परिणाम जास्त दिसून येतात. याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे किशोरवयीन मुलांच्या मेंदूचा विकास अद्याप सुरू असतो, म्हणून या परिणामांचा ठसा त्यांच्यावर अधिक खोल उमटतो.
काय होतं?
१. एकाग्रता आणि स्मरणशक्ती कमी होणे.
२. सततचा ताण, चिडचिड आणि अस्वस्थता
३. अभ्यासात किंवा कामात लक्ष न लागणं
४. वास्तव जीवनातील संवादात उदासीनता
५. झोपेचे विकार
६. भावनिक थकवा
उपाय काय?
१. दिवसात काही वेळ मोबाइलपासून दूर राहा.
२. एका वेळी एकच काम करा, आणि पूर्ण लक्ष त्या कामावर ठेवा.
३. चालणे, सूर्यप्रकाश, पक्ष्यांचा आवाज, हिरवळ हे सर्व मेंदूचे नैसर्गिक रिचार्ज अवश्य वापरा.
४. ध्यान, श्वसन किंवा फक्त मौनात काही क्षण घालवा. शांततेचा सराव करा.
५. कंटाळाही अनुभवा. फ्री टाईम मेंदूला विश्रांती देतो.
