Lokmat Sakhi >Mental Health > ऑफिसात बॉसने झापलं की घरी मुलांवर तुम्ही राग काढता? चिडून घर डोक्यावर घेता?

ऑफिसात बॉसने झापलं की घरी मुलांवर तुम्ही राग काढता? चिडून घर डोक्यावर घेता?

ऑफिसात बॉस आणि घरी मुलं छळतात तुम्हाला? आपण कमीच पडतो सर्वत्र असं वाटतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 17:02 IST2022-05-06T16:59:38+5:302022-05-06T17:02:50+5:30

ऑफिसात बॉस आणि घरी मुलं छळतात तुम्हाला? आपण कमीच पडतो सर्वत्र असं वाटतं?

office pressure makes you angry, arrogant, as a parent you become dominating | ऑफिसात बॉसने झापलं की घरी मुलांवर तुम्ही राग काढता? चिडून घर डोक्यावर घेता?

ऑफिसात बॉसने झापलं की घरी मुलांवर तुम्ही राग काढता? चिडून घर डोक्यावर घेता?

Highlightsआपण सुपरवूमन नाही हे एकदा मान्य केलं तर आपणही आपल्याला चुका करण्याची परवानगी देऊच शकतो.

ऑफिसमध्ये कामाचा ताण खूप असतो. त्यात कधीकधी बॉस झापतो. सहकारी कधीतरी टोमणे मारतात. आपलं काम कधीच संपत नाही. सतत नवीन स्किल्स शिका, वेळेची मारामारी, सगळीकडेच कामं सतत करत रहा. तरी कुणी ना कुणी तक्रार करतंच सारखं. त्यात अनेकदा मनासारखी पगारवाढ होत नाही. आणि आपण घुसमटून जातो. ऑफिसात कामाचं प्रेशर आहे म्हणतो आणि आपण तेच  प्रेशर घेऊन घरी येतो. आणि आता मुख्य प्रश्न असा आहे, की हे प्रेशर आहे म्हणून आपण नक्की कसं वागतो घरातल्यांशी? बाहेरचा राग घरात काढतो का?

(Image : google)

मुळात पुरुषांच्याबाबतीत हे गृहित धरलं जातं की, त्याला कामाचा ताण आहे. त्याला घरातली कामं सांगू नका. त्याला राग येईल असं वागू नका.  बायकांना मात्र घर आणि काम दोन्ही गोष्टी सांभाळाव्याच लागतात. दोन्हीकडची जबाबदारी असते आणि एकच काहीतरी मी करीन अशी काही सूट नसते. त्यात मोठी जबाबदारी असते ती मुलांची, पालकत्वाची. सुजाण पालकत्वाचीही अपेक्षा असते. तिनं मुलांशी उत्तम पालक म्हणूनच वागावं असं सामाजिक प्रेशर असते.  इतरांपेक्षाही बाई स्वत:च स्वत:ला उत्तम पालक असण्याच्या परीक्षेलाही बसवते. त्याचा परिणाम असा होतो की सगळीकडेच परीक्षा देणारी आई घरात कधी चिडचिडी, आरडाओरडा करणारी रागीट बाई बनते लक्षातही येत नाही.
अमेरिकेच्या कार्लटन विद्यापीठाने प्रसिद्ध केलेला अभ्यास सांगतोय की, ज्या बायकांना नोकरीत मनस्ताप जास्त त्या घरात मुलांशी अधिक उद्धटपणे वागतात.  बाहेरच्यांचा राग घरात काढतात, मुलांवर काढतात असं नव्हे तर त्या मुलांना अधिक धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मुलांनी इतर मुलांपेक्षा सरसच असावं आणि आई नोकरी करते म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असं कुणीही म्हणू नये म्हणून त्या मुलांशी जास्त ‘स्ट्रिक्ट’ वागतात. आपल्याकडे पालकत्वाची सगळी कौशल्य आहेत, त्यात आपण कुठंही कमी पडत नाही, असं त्यांना दाखवून द्यायचं असतं. त्यांच्या कार्यालयीन कामाच्या कौशल्याचा, त्यांच्या आत्मविश्वासाचा संदर्भ त्या पालकत्वाशी लावतात आणि परिणाम म्हणून मुलांवर जास्त ऑर्डर सोडतात. मात्र त्याचा उलट परिणामच होतो. ऑफिसात बॉस ऐकत नाही, घरात नवरा आणि मुलं ऐकत नाहीत, आपली कामं कुठंच सुरळीत होत नाहीत असं म्हणून त्या जास्त हवालदील होतात. अधिक चुका करतात. आणि स्ट्रेस वाढवून घेतात.

(Image : google)

अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या अभ्यासानुसार अशा दुहेरी कातरीत सापडलेल्या महिलांनी कुठंतरी मनमोकळं केलं पाहिजे. घरात किंवा कार्यालयातही कामं सोपी होतील म्हणून मदत मागितली पाहिजे. आणि आपलं कार्यालयीन काम, त्यातले बदल आणि आपलं मुलांशी असलेलं नातं यात स्पर्धा लावणं बंद केलं पाहिजे. तरच या ताणातून वाट सापडू शकते. आपण सुपरवूमन नाही हे एकदा मान्य केलं तर आपणही आपल्याला चुका करण्याची परवानगी देऊच शकतो. आनंदानं जगण्याचं हे सूत्र आहेच की, परफेक्ट तर जगात कुणीच नसतं.

Web Title: office pressure makes you angry, arrogant, as a parent you become dominating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.