Join us  

कोरोनाच्या भीतीने ओसीडीचा त्रास, OCD हा मानसिक आजार असतो काय, कोरोनानंतर तो का छळतोय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 6:08 PM

घर नेहमीच चकचकीत आणि झाडून पुसून लख्ख ठेवण्याची सवय अनेक जणींना असते. ही सवय निश्चितच चांगली आहे. पण याचा अतिरेक झाला तर मात्र काहीतरी चुकतेय हे लक्षात घेण्याची गरज आहे. अशाच आशयाचा OCD आजार सध्या अनेक महिलांमध्ये दिसून येत असून त्यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही, असा त्याचा अर्थ होतो.

ठळक मुद्देएखाद्याला स्वच्छ, टापटीप राहण्याची सवय असते. तसेच स्वच्छतेशी संबंधित प्रत्येक गोष्टी त्यांना हवी तशीच व्हावी, याबाबत त्या आग्रही असतात. याचा अर्थ अशा प्रत्येक व्यक्तीलाच ओसीडी झाला आहे, असा नव्हे.ओसीडी झाला असणे आणि नसणे यातील रेषा अतिशय सुक्ष्म आहे. त्यामुळे मानसोपचारतज्ञांच्या सल्ल्याशिवाय यासंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये.

घर नेहमीच स्वच्छ असावे हा काही महिलांचा जणू अट्टाहास हसतो. एखादे भांडे वारंवार विसळणे, त्यापायी हजारो लीटर पाणी वाया घालणे, दिवसातून तीन- तीन वेळा फरशी पुसणे, घरातली एखादीही वस्तू इकडून  तिकडे झाली तरी प्रचंड अस्वस्थ होणे आणि जोपर्यंत ती वस्तू पहिल्यासारखी ठेवत नाही, तोपर्यंत मनाला चैन  न पडणे अशी सवय अनेक महिलांमध्ये दिसून येते. अशी लक्षणे आढळून येणाऱ्या महिलांमध्ये ओसीडी म्हणजेच ऑब्सेसिव्ह कंम्पल्सिव्ह डिसऑर्डर हा आजार असण्याची मोठी शक्यता असते. 

 

कोरोना आला आणि स्वच्छतेचे सगळे नियमच बदलून गेले. घरात कोणी आले की सगळ्यात आधी बाथरूम गाठायचे, स्वच्छ अंघोळ करायची आणि कपडे गरम पाण्यात भिजवायचे, असा नियमच जणू अनेक घरांमध्ये झाला होता. याशिवाय हात वारंवार धुणे, बाहेरून आलेल्या वस्तू सॅनिटाईज करणे ही कामे घरातल्या प्रत्येकाला करावी लागली. या नव्या स्वच्छता धोरणाचाही त्रास आधीपासूनच ओसीडी असणाऱ्या महिलांना जास्तच जाणवत आहे.घरात एखादी वस्तू आणली आणि घरातल्या सदस्यांनी ती व्यवस्थित सॅनिटाईज करून ठेवली तरी अनेक महिलांचे समाधान होत नाही. त्या पुन्हा एकदा या सगळ्या वस्तू सॅनिटायझरचे फवारे मारून स्वच्छ करतात, भाज्या वारंवार धुतात. शिवाय आपल्याला किंवा आपल्या कुटूंबातील कोणाला हा आजार होईल का, अशी भीतीही कायम त्यांच्या मनात असते. त्यामुळे जर अशी लक्षणे कोणाला जाणवत असतील, अस्वस्थता वाढली असेल, तर जास्त वेळ वाया न घालविता मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. यासगळ्या गोष्टी करण्याच्या नादात अशा व्यक्ती आपल्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करतात. शिवाय या गोष्टींमध्येच वेळ गेल्याने त्यांचे घरातले इतर काम किंवा ऑफिसचे काम अपुरे राहू लागते आणि त्याचाही ताण या व्यक्तींवर येतो. 

 

OCD आजार असण्याची इतर लक्षणे१. स्वच्छतेचा अतिरेक आणि मनाला हवी तशी स्वच्छता होत नाही,  तोपर्यंत असणारी प्रचंड अस्वस्थता.२. गॅस बंद केला की नाही, कुलूप लावले की नाही, रात्री दारे, खिडक्या व्यवस्थित बंद केल्या ना, कपाटाचे दार नीट लावले ना, यासारख्या गोष्टींचा कायम विचार करणे. ३. मनातल्या मनात सतत आकडेमोड करणे, कायम स्वत:शी बोलणे आणि कोणतीही गोष्ट करण्याचा क्रम ठरवून घेणे आणि त्याच पद्धतीने ती गोष्ट पुर्ण होईल, यासाठी अतिरेकी अट्टाहास असणे.  

टॅग्स :मानसिक आरोग्यआरोग्यमहिला