"आज काय घालू?" पासून ते "घरात एवढा पसारा कुठून आला?" इथपर्यंत आपण स्त्रिया दररोज अनेक विचारांशी झगडत असतो. 'मिनिमलायझेशन' म्हणजे सर्व सुखांचा त्याग करणे नव्हे, तर ज्या गोष्टी आपल्याला खरोखर आनंद देतात, त्याच गोष्टींसोबत जगणे.
एक एक करत जमवलेल्या वस्तू जेव्हा पसारा वाटू लागतात, तीच वेळ असते मिनिमलायझेशनची! अर्थात कमी करण्याची. फेकून देणे हा त्यावर उपाय नाही. तर आपल्या दृष्टीने निरुपयोगी झालेली वस्तू वापरण्याजोग्या स्थितीत असताना देऊन टाकणे हा योग्य पर्याय आहे. आपल्याकडे आठवडा बाजार लागतो, लागायचा, तसा परदेशात वस्तूंचे आदान-प्रदान करण्याचा वार ठरलेला असतो. प्रत्येक वसाहतीत हा आठवडा बाजार भरतो. ज्याला जी वस्तू अनावश्यक वाटते त्याने ती तिथे आणून ठेवावी आणि ज्याला आवश्यक वाटते त्याने ती घेऊन जावी. सगळ्यांची देवाण घेवाण झाल्यावर उरलेल्या वस्तूंचा योग्य विनिमय केला जातो.
आपल्याकडे अशी व्यवस्था नसली, तरी एक तर आपण आपल्या समूहात, मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये, कौटुंबिक मेळाव्याच्या निमित्ताने ती निर्माण करू शकतो, किंवा निदान आपण आपल्यापुरते पुढील बाबतीत मिनिमलायझेशन करू शकतो, कसे ते पाहा आणि २०२६ सुरु होण्याआधी पसारा आवरून मिनिमलायजेशन अंगिकारण्याची सवय लावा.
१. कपाटातील पसारा
आपल्यापैकी अनेकींच्या कपाटात असे कपडे असतात जे आपण 'कधीतरी बारीक झाल्यावर घालू' म्हणून साठवून ठेवतो. मिनिमलायझेशनचा पहिला नियम म्हणजे - जे कपडे गेल्या १ वर्षात तुम्ही एकदाही घातले नाहीत, ते कोणालातरी देऊन टाका. कपाटात मोजके पण उत्तम कपडे असतील, तर दररोज सकाळी काय घालू हा निर्णय घेण्याचा ताण (Decision Fatigue) कमी होतो.
२. स्वयंपाकघरातील साधेपणा
खरेदीच्या उत्साहात आपण अनेकदा अशी उपकरणे किंवा भांडी घेतो ज्याचा वापर वर्षातून एकदाच होतो. ओट्यावर जेवढा कमी पसारा, तेवढी कामात गती आणि मनात शांतता राहते. 'मल्टी-पर्पज' गोष्टींचा वापर वाढवणे हाच खरा मिनिमलिझम आहे.
३. मानसिक मिनिमलायझेशन (Mental Minimalism)
केवळ वस्तूच नाही, तर विचारही मिनिमल करा. सोशल मीडियावरील नको असलेल्या लोकांशी तुलना करणे, सतत 'परफेक्ट' दिसण्याचा दबाव घेणे हे मानसिक पसारे आहेत. जे लोक किंवा जे विचार तुम्हाला ऊर्जा देत नाहीत, त्यांना आयुष्यातून 'डिलीट' करायला शिका.
४. आर्थिक बचत आणि दर्जा (Quality over Quantity)
दहा स्वस्त गोष्टी घेण्यापेक्षा एकच पण उत्तम दर्जाची वस्तू घेण्याची सवय लावा. यामुळे घराचा पसारा कमी होतो आणि पैशांचीही बचत होते. मिनिमलिस्ट स्त्री ही अधिक सजग ग्राहक असते.
५. वेळेचे नियोजन
जेव्हा वस्तू कमी असतात, तेव्हा त्या आवरण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत वाचते. तोच वेळ तुम्ही स्वतःच्या छंदासाठी, व्यायामासाठी किंवा कुटुंबासोबत घालवण्यासाठी वापरू शकता.
याव्यतिरिक्त,
डिजिटल क्लिनिंग: मोबाईलमधील नको असलेले व्हाट्सअप फोटो आणि न वापरली जाणारी ॲप्स डिलीट करा.
स्वयंपाकघर: कालबाह्य (Expired) मसाले किंवा न वापरली जाणारी प्लास्टिकची भांडी काढून टाका.
नातेसंबंध: जे विचार किंवा लोक तुम्हाला नकारात्मकता देतात, त्यांना मनात जागा देणे बंद करा.
या गोष्टी तुमचे आयुष्य सोपे करतील आणि जगण्यातली सहजता वाढेल.
