सुरेश पवार
आज आंतरराष्ट्रीय आनंद दिवस. तुम्ही वाचलंच असेल की १४९ देशांच्या यादीत भारत १३९ व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपण आनंदी नाही का? आपण उदास आहोत, कुठं गेला आपला आनंद मग?प्रत्येकालाच वाटतं की आपण आनंदी रहावं. पण आनंद म्हणजे नेमकं काय? याबाबतीत अनेकांची मते देखील भिन्न आहेत .कुणाला सर्व काही मिळवण्यात आनंद मिळतो तर कुणाला वाटण्यात आनंद मिळतो, कुणाला नाचण्यात आनंद मिळतो तर कुणाला एकांतात काही क्षण घालवण्यात आनंद मिळतो. मुळात आनंद ही घटना नसून ती एक स्थिती आहे ज्यामध्ये सामान्यत: वाटतं त्यापेक्षा अधिक प्रसन्न वाटू लागतं. खेळण्याने,नाचण्याने, गाणी ऐकण्याने वा इतर अनेक गोष्टीतून व्यक्तीला मिळत असतो तो आनंद. एखादी गोष्ट जीवनात अचानक मिळते ज्याची पूर्वकल्पना नसते जी अनपेक्षितपणे मिळते तो असतो आनंद आणि जेव्हा व्यक्त देखील होता येत नाही भावना निरंकारी होतात हसू न येता डोळ्यांद्वारे केवळ अश्रू ओघळतात तो असतो परमानंद असे आनंदाचे आपण टप्पे जरी पहिले असले तरी अभ्यासकांनी दोन प्रकारात याची विभागणी केलेली दिसते. हेडॉनिक (Hedonic)म्हणजे आयुष्यात उपभोगातून मिळणारा आनंद- आणि युडोमॉनिक (Euduaimonic) म्हणजे आपल्या आंतरिक क्षमतांच्या वापरामुळे झालेला आनंद.
एखादं कामं करताना मनात संकोच नसणं,त्या क्षणाला वाटलं म्हणून हवं तसं मुक्त वावरावसं वाटणं आणि त्या कामातून किंवा कृतीतून आनंद मिळून केवळ खळखळूण मनसोक्त जगण्याची इच्छा तुमच्यात जागृत होत असेल तर त्या भावनांना दाबून न ठेवता हवं तसं जगण्याचा प्रयत्न करा. विंदा करंदीकरांच्या काही ओळी आठवतात. ‘असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.’
(लेखक सामाजिक काम करतात.)