Join us
Daily Top 2Weekly Top 5

मला बाई छंदच नाही!! तुम्हालाही असंच वाटतं का? शोधा स्वतःची आवड, आणि जन्मात तुम्ही एकट्या पडणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2026 19:24 IST

Find your own passion, and you won't be alone in life : ओळखा स्वतःची आवड. जाणून घ्यायची सोपी पद्धत.

दैनंदिन जबाबदाऱ्या, कामाचा ताण आणि सततची घाई यामध्ये माणूस अनेकदा स्वतःला विसरतो. आपल्यात नेमकी कोणती कला आहे, आपल्याला मनापासून काय करायला आवडते, हे प्रश्न मागे पडतात. पण स्वतःतील कला शोधणे आणि एखादा छंद जोपासणे हे केवळ वेळ घालवण्याचे साधन नसून स्वतःशी नातं जोडण्याचा मार्ग आहे. स्वतःतील कला ओळखायची असेल तर सर्वात आधी स्वतःकडे शांतपणे पाहणे गरजेचे आहे. एखादे काम करताना वेळ कसा जातो ते कळतच नाही, कुठल्या गोष्टी करताना मन हलके होते, हे लक्षात घ्यावे. लहानपणी आवडत असलेल्या गोष्टी आठवून पाहाव्यात. गाणे म्हणणे, चित्र काढणे, लिहिणे, स्वयंपाक, बागकाम, नृत्य, हस्तकला किंवा वाचन यापैकी काहीतरी आपल्याला नकळत आनंद देत असते. वेगवेगळ्या गोष्टी करून पाहिल्या तर आपली खरी आवड हळूहळू स्पष्ट होते. अर्थात आपल्याला काही ठराविक आवडी माहिती आहेत. तेवढेच छंद असतात असे अनेकांना वाटते, मात्र जेवण बनवण्यापासून पोटभर खाण्यापर्यंत कोणताही छंद एखाद्याला असू शकतो.

छंद जोपासताना स्वत:ला वेळ देणे तितकेच महत्त्वाचे आहे. “आपल्याला वेळ नाही” ही सवय बदलून दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवला पाहिजे. रोज नाही जमले तरी आठवड्यातून काही वेळ त्या छंदासाठी दिला, तरी मनाला समाधान मिळते. कौतुक किंवा मान्यता मिळेलच असे नाही, पण छंद हा स्वतःसाठी असतो, इतरांना दाखवण्यासाठी नाही, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सातत्य ठेवले की आत्मविश्वास आपोआप वाढतो.

एखादा छंद जपण्याचे फायदे केवळ कौशल्यापुरते मर्यादित नसतात. छंदामुळे मन एकाग्र होते, विचारांना दिशा मिळते आणि नकारात्मक भावना कमी होतात. ताण, चिंता, चिडचिड यावर छंद खूप प्रभावी ठरतो. एखादी आवडती गोष्ट करताना मन वर्तमान क्षणात रमते, त्यामुळे मानसिक थकवा दूर होतो. म्हणूनच छंद हा मानसिक आरोग्यासाठी औषधासारखा आहे, पण कोणतेही दुष्परिणाम नसलेले. आजच्या धावपळीच्या जीवनात नैराश्य, एकटेपणा आणि असमाधान वाढत आहे. अशा वेळी छंद माणसाला आतून मजबूत ठेवतो. स्वतःच्या आवडीची गोष्ट करताना माणूस स्वतःशी जोडला जातो, आत्ममूल्य वाढते आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. अनेकदा हाच छंद पुढे जाऊन ओळख, उत्पन्न किंवा समाधानाचे साधनही होतो.

स्वतःतील कला शोधणे म्हणजे काहीतरी मोठे साध्य करणेच असे नाही, तर मनाला शांतता देणारा मार्ग शोधणे आहे. छंद जपा, त्याला वेळ द्या आणि त्यात आनंद शोधा. कारण छंद हा केवळ वेळ घालवण्याचा प्रकार नसून, आरोग्य चांगले ठेवणारा मार्ग आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Discover hobbies, avoid loneliness, and find joy in life.

Web Summary : Find your passion to combat daily stress and connect with yourself. Hobbies reduce stress, enhance mental well-being, and boost self-esteem, offering a fulfilling life.
टॅग्स :मानसिक आरोग्यनृत्यसोशल व्हायरलमहिला