lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > डॉक्टर, हमारे यहाँ औरत को कोई इन्सान भी नहीं समझता..

डॉक्टर, हमारे यहाँ औरत को कोई इन्सान भी नहीं समझता..

आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागात मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या तरुण मराठी डॉक्टरच्या यादीतील काही नोंदी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 05:36 PM2021-03-09T17:36:08+5:302021-03-09T17:38:43+5:30

आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागात मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या तरुण मराठी डॉक्टरच्या यादीतील काही नोंदी.

how social problem causes mental illness in women. | डॉक्टर, हमारे यहाँ औरत को कोई इन्सान भी नहीं समझता..

डॉक्टर, हमारे यहाँ औरत को कोई इन्सान भी नहीं समझता..

Highlights स्त्रियांच्या मानसिक स्वास्थ्याचे कोणते प्रश्न निर्माण होतात, त्यांना सामाजिक प्रश्नही कारणीभूत ठरतात. छायाचित्रं प्रतिकात्मकं आहेत.

डॉ. निलेश मोहिते

" हमारे यहापे औरतोको इन्सान समझा ही नही जाता डॉक्टर, उसे अभीभी जानवर या जानवर से थोडासा उपर समझा जाता हे "..
- मध्यप्रदेशातील एका खेड्यातून उच्चशिक्षित तरुणी उद्विघ्नपणे मला तिची कहाणी फोनवरून सांगत होती. उच्चशिक्षित असल्यामुळे तिच्या लग्नात खूप समस्या येत होत्या. लग्न ठरवताना मुलांना शिकलेली मुलगी बायको म्हणून हवी होती पण तिने बाहेर काही काम करू नये किंवा फक्त चूल आणि मूलच सांभाळावे अशी त्यांची अपेक्षा असल्याचं सांगत होती. लग्न होत नसल्यामुळे तिचे घरचे म्हणत की तू एवढी शिकली हा दोष आहे.  लग्नानंतर नाेकरी करण्याचा हट्ट सोडून द्यावा यासाठी घरचे खूप दबाव टाकत होते. या सगळ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करून जीवन कायमच संपवून टाकावे या  निष्कर्षापर्यंत  ती तरुणी पोहचली होती. आणि मला फोनवरही आपबिती सांगत होती.
बरंच बोलल्यावर लक्षात आलं की आमच्या सायकॅट्रीच्या पुस्तकाप्रमाणे ही तरुणी डिप्रेशन या आजाराने त्रस्त होती. आमच्या पुस्तकाप्रमाणे तिला औषधं गोळ्या आणि समुपदेशनाची गरज होती. पण खरा प्रश्न आहे की, या उपचारांच्या पलीकडे जाऊन त्या तरुणीवर ही वेळ का आली? 
त्याला कारण तिची  सध्याची परिस्थिती, रूढी, परंपरा, विषमाता, पुरुषसात्तक समाज व्यवस्था, जातीची उतरंड आणि बरेचशे जाचक धार्मिक-सामाजिक नियम. स्त्रियांच्या मानसिक आरोग्याचा विचार करतांना आपल्याला या महत्वाच्या मुद्यांना डालवून पुढे जाता येणं अशक्य आहे. फक्त्त गोळ्या-औषधं किंवा समुपदेशनाने सुटणारा हा वैयक्तिक आजार नाही तर हा एक सामाजिक आजार सुद्धा आहे. म्हणूनच या लेखप्रपंचातुन आपण सामाजिक अंगाने स्त्रियांच्या मानसिक आरोग्याचा विचार करणार आहोत.


उत्क्रांतीच्या हजारो वर्षांच्या कालखंडात  स्त्री-मन, पुरुष-मन आणी सामाजिक मनाचा आराखडा त्या त्या वेळेच्या गरजेनुसार बदलत गेला. उत्क्रांती ही धिम्यागतीने लाखो वर्ष चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. गेल्या दोन शतकात विज्ञानाने घेतलेल्या गरुड झेपेमुळे फारच कमी वेळात मानवजातीचं आयुष्य प्रचंड प्रमाणात बदललं त्यामुळे आपल्याला असंही म्हणता येईल की आपण उत्क्रांतीच्या एका महत्वाच्या कालखंडातून जात आहोत. हळूहळू स्त्रिया हजारो वर्षांच्या जाचक बंधनातून मुक्त होऊ पाहत आहेत पण त्याला समाजाचा भक्कम पाठिंबा मिळतातना अजूनही दिसत नाही म्हणूनच लोकांना शिकलेली मुलगी बायको म्हणून हवी असते पण नोकरी करणारी मुलगी नको असते.
अशा विरोधाभासातून स्त्रियांच्या मानसिक स्वास्थ्याचे कोणते प्रश्न निर्माण होतात, त्यांना सामाजिक प्रश्नही कसे कारणीभूत ठरतात याचा आढावा आपण या लेखमालेतून घेणार आहोत. 
खरं तर बाईचं मन हे न उलगडणाऱ्या कोड्यासारखं आणि तळ न सापडणाऱ्या सागरासारखं विशाल असतं त्यामुळे तिच्या मनाची होणारी उलथापालथ सुद्धा अत्यंत गुंतागुंतीची असते. मात्र सामाजिक मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात कार्यरत असल्याने आणि फक्त दुर्गम भागात काम करणाऱ्या सामाजिक संस्थाबरोबरच काम करत असल्यानं मी मला या भागात भेटणाऱ्या महिलांच्या मनस्वास्थ्याचे प्रश्न मांडणार आहे. महाराष्ट्र, आसाम आणि अरुणाचल प्रदेश मध्ये काम करणाऱ्या  "परिवर्तन संस्था", नॉर्थ इस्ट मध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणारी अग्रनी संस्था "द अँट" आणि झारखंड, मध्यप्रदेश आणि ओरिसा मध्ये आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या "एकजूट " संस्थेमध्ये मी मुख्यत्वे  काम पाहतो. त्यामुळे हिमालयात राहणाऱ्या  पहाडी महिलेपासून, झारखंड च्या जंगलतील आदिवासी महिला, मध्यप्रदेशातल्या खेड्यातील तरुणी, पुण्याच्या झोपडपट्टील्या काकू, मोठ्या कंपनीची सीईओ आणि टीव्हीवर दिसणाऱ्या अभिनेत्री अशा वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीच्या महिलांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या मला समजून घेता येतात.  फक्त मानसिक आजरांचा विचार न करता  मनाच्या खोल अथांगतेचा शोध घेण्याचा अयशस्वी प्रयत्न सुद्धा करणार आहोत. 
मी मूळचा डोंबिवलीचा, सध्या महाराष्ट्रापासून ३५०० किलोमीटर अंतरावर आसाम मध्ये राहतो आणि तिथून मनातलं बोलायला मी आपल्याला या कॉलममधून भेटायला येणार आहे..
भेटू.. बोलत राहू!  

(लेखक आसाममध्ये सामाजिक मनोविकारतज्ज्ञ म्हणून काम करतात.) 
nmohite9@gmail.com

Web Title: how social problem causes mental illness in women.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.