Join us

अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 18:40 IST

संसार, जबाबदाऱ्या, प्रश्न, अडचणी, सुख-दुःख हे चक्र सुरूच राहणार, पण यात आणखी किती वर्ष घालवणार? येत्या ६ महिन्यात 'असा' घडवा बदल!

आयुष्यात करायचं बरंच काही असतं, पण या 'बरंच काही' ला निश्चित स्वरूप न मिळाल्याने आपली घडी विस्कटलेली राहते. एकामागून एक वर्ष येतात, जातात. दिनदर्शिकेची पानं बदलतात. पण आपण आपल्यात काय बदल केला, किती घडलो, किती बिघडलो, याचा जमा खर्च मांडतो का? याबाबतीत चिंतन करतो का? हे सगळं ३१ डिसेंबरला केलं पाहिजे असं नाही. खरं तर रोज रात्री केलं पाहिजे. दिवसभराचं सिंहावलोकन महत्त्वाचं आहे, तरच बदल घडणार ना? 

आता आपण २०२५ च्या मध्यावर आलो आहोत. जानेवारी २०२५ मध्ये ठरवलेले रिझोल्युशन किती प्रमाणात पूर्ण झाले, याची गोळाबेरीज केली तर उत्तर जवळपास शून्य येईल. पण हरकत नाही. जब जागो तब सवेरा! इथून पुढे डिसेंबर २०२५ संपण्याआधी स्वतःमध्ये बदल घडवायचा संकल्प करा आणि त्यासाठी पुढील महत्त्वपूर्ण सवयी लावून घ्या. 

आरोग्यावर लक्ष : 'हेल्थ इज वेल्थ' हे आपण वाचतो, पण अनुसरतो किती? आपलं आरोग्य संपत्तीसारखं जपायचं असेल तर ते सांभाळायला नको का? त्याची दुखणी खुपणी काढायला नको का? आजचं उद्यावर ढकलत आपण शरीराची हेळसांड करतोय, ती थांबवूया. शरीराच्या कुरबुरी वेळच्या वेळी दुरुस्त करूया. आरोग्याच्या तक्रारी नसल्या की आयुष्य अर्ध्याहून अधिक सोपं होतं आणि उत्साहाने भरून जातं. त्यामुळे आधी स्वतःकडे लक्ष द्या. 

अनावश्यक गोष्टी काढून टाका : आवराआवर केवळ घरात नाही तर मनातही गरजेची आहे. कितीतरी अडगळ आपण आपल्या घरात, मनात करून ठेवली आहे. त्या पसाऱ्याकडे बघण्यात, तो ढीग उपसण्यात आपला वेळ वाया जातोय. त्यात किती वस्तू, आठवणी गरजेच्या आहेत त्याचा सोक्ष मोक्ष लावूया आणि नवीन गोष्टींसाठी नवीन जागा तयार करूया. चमत्कार घडेल, आयुष्याला नवीन दिशा मिळेल. करून बघा. 

छोटे, पण स्पष्ट ध्येय आखा: काहीतरी, कधीतरी हे शब्द आपल्या सबकॉन्शस मेंदूला कळत नाहीत. तो म्हणतो, मुद्द्याचं काय ते बोल! त्यामुळे मनाला सतत छोटी ध्येय गाठण्याची सवय लावा. त्यातून मिळणारा आनंद तुमचा उत्साह द्विगुणित करेल आणि नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा देईल. 

स्क्रीन टाइम कमी करा: दुसऱ्यांचे रिल्स बघण्यात आपण आपल्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ वाया घालवत आहोत. स्क्रीन टाइम कमी करा, तुमचं बघून मुलं सुद्धा स्क्रीन टाइम कमी करून वाचनात, खेळण्यात, फिरण्यात, गप्पा मारण्यात वेळ घालवायला शिकतील, नव्हे तर तुम्हाला ते शिकवावं लागेल. भविष्यात हे त्यांनाही उपयोगी पडणार आहे. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी १ तास स्क्रीन पाहणे टाळा, मग ती मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप कोणतीही असो!

वेळेचे नियोजन : शालेय वयात आपण अनेकदा टाइम टेबल केलं असेल आणि अनेकदा ते अयशस्वी झालं असेल. कारण, कट टू कट टाइम टेबल आखणं म्हणजे वेळेचं नियोजन नाही, तर दिवसभरात ठरवलेली १० पैकी ७-८ कामं करणं याला वेळेचं नियोजन म्हणता येईल. वेळ वाया न घालवणं हाही वेळेचा सदुपयोग आहे. कुटुंबाबरोबर घालवलेला वेळ, मैत्रिणींबरोबर घालवलेला वेळ, स्वतःसाठी राखून ठेवलेला वेळ, शांत चित्ताने घालवलेला वेळ हा सुद्धा क्वालिटी टाइम आहे. तो काढला पाहिजे. 

शांत झोप महत्त्वाची : आपण एवढे कष्ट करतो, ते दोन वेळचं सकस जेवण मिळावं आणि शांत झोप लागावी यासाठी! पण तेच मिळणार नसेल तर एवढे कष्ट करून काय उपयोग? आरोग्य शास्त्रात झोपेला खूप महत्त्व आहे. शांत झोप लागणं हे वरदान आहे. त्यासाठी मन शांत हवं. हे प्रयत्नपूर्वक करावं लागतं. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा आणि शांत झोप घ्या. 

जगाचा ताण घेऊन जगू नका : युट्युबर उर्मिला निंबाळकर हिने यासंदर्भात केलेल्या व्हिडीओमध्ये ही अतिशय महत्त्वपूर्ण जाणीव करून दिली आहे. 'पागलपंती जरुरी है' म्हणजेच विचारांचा ताण घेऊन तुम्ही स्वतःमधलं हसतं, खिदळतं मुलं गमावून बसू नका. काही गोष्टी, विचार सोडून द्यायला शिका. तणावमुक्त व्हा. चिंता करून प्रश्न सुटत नाहीत. उगाच ओढलेले, आक्रसलेले चेहरे घेऊन वावरू नका. आनंदाने जगा आणि हेच आपल्या जगण्याचं ध्येय ठेवा. 

या गोष्टी केल्या तर तुम्हाला तुमच्यात सकारात्मक बदल दिसू लागतील आणि हे वर्ष वाया गेलं, हा गिल्ट/अपराधीभाव मनाला त्रास देणार नाही हे नक्की!

टॅग्स :महिलास्त्रियांचे आरोग्य