>सुखाचा शोध > दुसऱ्या दिवशी घर नावाचं झोपडंही राहिलं नसतं, त्या पालांवरच्या आनंदी गुढीची गोष्ट!

दुसऱ्या दिवशी घर नावाचं झोपडंही राहिलं नसतं, त्या पालांवरच्या आनंदी गुढीची गोष्ट!

ऊसतोड कामगारांच्या पालावरचं जग, त्या जगातल्या पाडव्याचं आमंत्रण आलं म्हणून गेले, तर एक नव्याच आनंदाची गुढी भेटली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 02:48 PM2021-04-13T14:48:21+5:302021-04-13T15:04:34+5:30

ऊसतोड कामगारांच्या पालावरचं जग, त्या जगातल्या पाडव्याचं आमंत्रण आलं म्हणून गेले, तर एक नव्याच आनंदाची गुढी भेटली.

Gudhipadwa : sugarcane workers in Maharashtra & joy of doing small things | दुसऱ्या दिवशी घर नावाचं झोपडंही राहिलं नसतं, त्या पालांवरच्या आनंदी गुढीची गोष्ट!

दुसऱ्या दिवशी घर नावाचं झोपडंही राहिलं नसतं, त्या पालांवरच्या आनंदी गुढीची गोष्ट!

Next
Highlightsपालावरचा पाडवा!पालावरचा गुढीपाडवा: छायाचित्रं- बाळासाहेब काकडे

- अश्विनी बर्वे

‘ताई, आता आम्ही जाणार गावाकडं’ वर्षा सांगत होती. ‘व्हय ताई, पाडवा झाला की निघणार आम्ही,’

सुनिता म्हणाली. गावाच्या बाहेर मोकळ्या जागेत अनेक दिवसांपासून ऊस तोडणी मजुरांची पालं होती. गावातला सगळा ऊस कोपरगाव, संगमनेरच्या साखर कारखान्यात जात होता. ही मंडळी अनेक महिन्यांपासून या भागात मुक्कामाला आहेत. त्यांच्या पोरांची शाळा बुडते आणि दिवसभर मुलं पालावरच असतात. म्हणून आम्ही काही जण जावून त्यांना गाणी गोष्टी, थोडं फार लिखाण शिकवत होतो. त्यातून त्यांच्याशी मैत्री झाली होती, पण गुढी पाडव्याच्या दरम्यान साखर कारखाने बंद होतात. त्यांचा गाळप संपतो आणि ही मंडळी आपल्या गावाकडे निघतात.

‘म्हणजे तुम्ही पाडवा करून जाणार ना?’

‘व्ह्य तर,या की तुम्ही पुरण पोळी खायला,’ सुनिता म्हणाली.

ऊस तोडणी मजुरांच्या वस्तीवर पाडवा कसा करतात, हे बघण्याची उत्सुकता मला होतीच. मी लगेच आमंत्रणाचा स्वीकार केला. दुसऱ्या दिवशी मी वस्तीवर पोहोचले, तर या बायकांचा दिवस नेहमीप्रमाणेच पहाटे सुरू झाला होता. इतर वेळी त्या भाकऱ्या थापून, चूल विझवून घाईनं कोयता घेऊन ऊस तोडीला जात, पण आज मात्र सगळी वस्ती स्वच्छ करण्याचं काम चालू होतं. आपली खोपटी जी उद्या इथे नसणार आहे, तीही लख्ख सारवून ठेवली होती. अंगणात गुढी उभारण्याची तयारी होती. काहींनी गुढीवर वरण वाढण्याचा डाव लावला होता, तर काहींनी तांब्या लावला होता. प्रत्येक खोपट्यात पुरण चुलीवर शिजत होतं. माझ्या सगळ्या मैत्रिणी ठेवणीतल्या साड्या नेसल्या होत्या. आज त्या कोणाचंच ऐकणाऱ्या नव्हत्या. कितीही काम असलं, तरी चांगले कपडे घालून मिरविण्याची त्यांची हौस त्या आज करून घेत होत्या. बापे पण चांगल्या स्वच्छ कपड्यामध्ये होते.

‘घरी लवकर जायला मिळावं ना, म्हणून हा डाव आणि तांब्या गुढीला लावला आहे’ मी गुढीकडे पाहत उभी आहे, हे पाहून कौसल्या म्हणाली. मी एखादं भांडं गुढीला लावलेलं पाहिलं होतं, पण डाव मात्र पहिल्यांदाच पाहात होते. गुढीच्या काठी शेजारी ऊसही लावला होता, त्याला काहींनी रिबिनी लावल्या होत्या. तिथंच कागदावर पूजेचं सामान होतं. आजूबाजूच्या झाडांची फुलं तोडून आणली होती. काहींनी ऊस तोडीहून येतानाच जास्वंदीची, तगरीची फुलं आणली होती. गुलाल,हळदी-कुंकू, खोबरं आणि गूळ होतंच. ते सगळं गुढी उतरविल्यावर सगळ्यांना वाटून खायचं होतं.

‘ताई, वस्तीवर आम्ही डावच लावतो, तशीच सवय आहे आम्हाला,’ सुनीता म्हणाली. सुनीता, सरला, कौसल्या, सगुणा या सगळ्या माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या. कारण दुपारच्या वेळी त्यांची मुलं मला आणि मी त्यांना काहीबाही शिकवत असू, त्यामुळे मुलं एका जागेवर तर राहतात, याचं त्यांना समाधान होतं. नाहीतर जवळच्या कॉलनीतली माणसं पोरांकडे चोर म्हणून बघतात आणि त्यांना हाड्तुड करतात, असं त्यांचं म्हणणं होतं.

आज मात्र मुलांच्या अंगावरही नवीन कपडे आले होते, कंत्राटदारानं पोरांना खाऊसाठी पैसे दिले होते, त्यामुळे मुलं त्यांच्या मनाला येईल, ते पेप्सी, कुरकुरे, वेफर्स, चॉकलेट खात होते. खोपटा-खोपटामधून एकमेकांकडे पुरण पोळी, भात, भजी, कुरड्या याचा थाळा जात होता. पालावर नुसती लगबग चालू होती. हसण्या- खिदळण्याचे, पोरांच्या ओरडण्याचे, रडण्याचे आवाज येत होते. सगळीकडे उत्सव होता. कामाच्या धबडग्यात एक दिवस थोड्याशा विश्रांतीचा होता. रोज घाईघाईनं अर्ध पोटी जेवणारी माणसं आज व्यवस्थित जेवणार होते. आता कामावर जायची घाई नव्हती, पण उद्या गावाकडं निघायचं, म्हणून सगळं सामानही गोळा करायचं होतं. त्यामुळे दुपारी जेवणं झाल्याबरोबर अंग जड झालं, तरी आयाबाया भांडी घासून, पुसून गोणीत भरण्याच्या तयारीला लागल्या.

काही जणींनी गावच्या बाजारातून काही भांडी विकत घेतली होती. रोजच्या कष्टातून आजचा दिवस आनंदात घालवत असतानाही या स्त्रिया भविष्याकडे आशेनं पाहत होत्या. म्हणूनच त्या गावाकडच्या घरासाठी भांडी खरेदी करत होत्या. यातील काही जण बीडकडच्या होत्या, तर काही जणी नंदूरबारच्या होत्या. आता परत कधी भेटू, म्हणून एकमेकींच्या गळ्यात पडून आसवं गाळत होत्या. एवढ्या कष्टातही सण साजरा करण्याचा उत्साह आणि त्यासाठीही कष्ट करण्याची तयारी बघत होते. माझ्या मनात त्यांच्या उत्साहाची गुढी उभारली जात होती.

 

ashwinibarve2001@gmail.com

Web Title: Gudhipadwa : sugarcane workers in Maharashtra & joy of doing small things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

गुढीपाडवा : कोंडलेपण अनुभवणाऱ्या, सत्त्वपरीक्षा पाहणाऱ्या वातावरणात ‘जगण्याची’ गुढी कोण उभारणार? आपणच ना.. - Marathi News | GudhiPadwa: happy new year- beginning of hope & positive life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुढीपाडवा : कोंडलेपण अनुभवणाऱ्या, सत्त्वपरीक्षा पाहणाऱ्या वातावरणात ‘जगण्याची’ गुढी कोण उभारणार? आपणच ना..

आज गुढीपाडवा. यावर्षी किती उदास मळभ आजूबाजूला आहे, पण तरीही मनांवरची मरगळ घालविण्यासाठी, सारं ठीक होईल या आशेनं उमेदीची गुढी उभारू! ...