- मंगला कुलकर्णी
गणपती उत्सव! (Ganesh Utsav 2025) सर्वत्र आनंदी-उत्साही वातावरण असतं. रोजच्या जगण्यातली काळजी-स्ट्रेस कमी होऊन सारेच नव्या उत्साहानं कामाला लागतात. घरात स्वच्छता होते तसं आपलं घर, आपली माणसं, आपण स्वत:ही नवेनवे भासू लागतो. गणपतीकडे साऱ्यांसाठी सुख-समाधान मागतो आणि सर्वांची विघ्न-अडचणी कमी करण्याची प्रार्थना करतो(Ganesh Utsav 2025).
कल्पकता, प्रयोग, नावीन्याची आस हे सारंही लाभावं अशी इच्छा असतेच. जगण्यातली जुनी मरगळ कमी होऊन नव्या आनंदाचं तोरण दाराला लागतं.
गोडगोड मोदक खाताना आणि जीवलग माणसांना (Ganesh Utsav Celebration With Family) देतानाही मन नव्या गोडव्यानं आनंदून जातं. नव्याची उमेद वाटते आणि जुन्या चांगल्या गोष्टींचं अप्रूपही वाटतं,
त्याविषयी कृतज्ञताही वाटते. सोबत हवीशी वाटतात आपली जीवाभावाची माणसं(family moments during ganesh festival).
मनातले जुने बोचरे व्रणही खपली धरू लागतात. सर्वांसोबत नव्या आनंदाचा तालही सहज धरला जातो. नव्यानं जपली जातात नाती आणि एकत्र येत साजरा होतो. दहा दिवस हा उत्सव मनापासून! गौरींच्या आगमनाने या दहा दिवसात साऱ्या घरादारालाच माहेरच्या मायेची ऊब लाभते. दोन दिवस येतात माहेरवाशिणी घरी, पण किती करावे त्यांचे लाड, करावे तितके कमीच! किती पदार्थ, किती पक्वानं आणि केवढा आग्रह मायेनं भारलेले हे दिवस हवेहवेसे वाटतातच.
घरोघर साजरा होणारा हा उत्सव माणसांना एकत्र आणतो, नात्यातले कलह बुजवून टाकतो आणि बांधतो मायेची नवीन गाठ. आनंद वाटल्यानं वाढतो म्हणत सारेच नव्या उमेदीनं, लेकराबाळांसह नव्यानं ऊनपावसाच्या खेळात रंगून जातात.
कुणाकडे दीड दिवस, कुणाकडे ५ तर कुणाच्या घरी १० दिवस गणेश आमगमन होते. पाहुण्यांनी भरलेले घर मन हलकं करते. साऱ्या गोष्टी वाटून घेताना, अडचणीही सुख वाटू लागतात. नातेवाईकांचा गोतावळा यावेळी हवासा वाटतो. साेबत म्हंटलेली गाणी, पत्त्यांचे डाव, रात्र रात्र रंगलेल्या गप्पा, सुखादु:खाच्या कानगोष्टी हे सारं जगण्याचे ताण कमी करत थेरपीचं काम करतं. मनात साचलेले जुने ताण निघून जायला लागतात. बोलून मन हलकं होतं, गैरसमजही कमी होतात. सुखाचे क्षण हातात धरुन ठेवावेसे वाटतात आणि दरवर्षी या दिवसांची वाट पाहावीशी वाटते ती म्हणूनच..!