अनुराधा प्रभूदेसाई
इमोशनल हेल्थ हा शब्द गेलाय तुमच्या कानावरुन? यापूर्वी वाटलंय कधी की आपली भावनिक तंदुरुस्ती नेमकी जरा तपासून पाहू. हे प्रश्न नव्हते असं नाही पण आयुष्याला एकाएकी करकचून ब्रेकच लागावा असं भयंकर आव्हान गेल्या वर्षानं सोबत आणलं, जे अजूनही सुरुच आहे. भीती, अस्वस्थता, अनिश्चितता सगळंच घोंघावत आलं आणि आपल्याला प्रश्न पडला की, आपल्या हातात काहीच उरलेलं नाही का?एरव्ही आपल्याला प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण हवं असतं. पण, इथे तर अशी परिस्थिती निर्माण झाली की, काहीच आपल्या हातात राहिलं नाही. रोज उठल्यावर नवीन काहीतरी कळत होतं. काही वास्तव तर बरंच काल्पनिक. अचानक असं वाटायला लागलं की बास्स. आता पळून जावं. आपली भावनिक झटापट आपलाच अंत पाहायला लागली.लॉकडाऊनदरम्यान एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली की भावनांकडे विशेषत: अवघड भावनांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण, या अवघड भावना कशा हाताळाव्यात हेच आपल्याला माहीत नसतं. नको मनात आणायला वाईटसाईट म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कधी विचारच करत नाही की, आपली इमोशनल हेल्थ नक्की कशी आहे?
चांगलं मानसिक आरोग्य काय सूचित करतं?मानसिक आरोग्य चांगलं असतं तेव्हा तुमचं मन स्थिर असतं ते तुमच्या भल्यासाठी काम करत असतं. तेव्हा तुम्ही विचार करण्यास सक्षम असता. सकारात्मक परिणाम होईल, असा आपण विचार आणि कृती करू शकतो, ज्याचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर आणि सामाजिक स्वास्थ्यावर होतो.आपण मानसिकदृष्ट्या तेव्हा चांगले असतो जेव्हा.- काम करण्यासाठी आपण आपल्यातल्या संपूर्ण क्षमता वापरतो आणि उत्पादकतेनं काम करतो.- रोजच्या आयुष्यातल्या ताणतणावाचा सामना व्यवस्थित करतो.- आपल्या कुटुंबाप्रति आणि आपल्या समूहासाठी अर्थपूर्ण योगदान देतो.- आपल्या प्रियजनांच्या कायम संपर्कात असतो.- आपल्या भोवतीच्या प्रश्नांवर भावनिक संतुलन राखून प्रतिक्रिया देतो.- कोणत्याही प्रकारच्या स्क्रीन्स आणि समाजमाध्यमांचा अतिवापर करत नाही.जेव्हा या गोष्टी होत नाहीये किंवा याच्या उलटच घडत आहे, यातली लय बिघडली आहे असं जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा लगेच सावध व्हा. यावर काम करण्यासाठी पुढाकार घ्या. जेव्हा आपण आजारी पडतो, आपलं आरोग्य बिघडतं तेव्हा आपण तो आजार दूर करण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी डॉक्टरांकडे जातो. अगदी तसाच पुढाकार घेऊन आपण मनोविकार तज्ज्ञांकडे जाणं, त्यांची मदत घेणं आवश्यक आहे.जेव्हा भावनिक असंतुलन निर्माण होतं तेव्हा त्याची लक्षणं तुमच्या रोजच्या वागण्यात दिसू लागतात. तुमच्या कामात अडथळे आणू लागतात.
काय असतात ती लक्षणं?- अति खाणं, अति झोपणं किंवा अगदी कमी खाणं, कमी झोपणं.- रोजच्या कामापासून आणि लोकांपासून स्वत:ला दूर ठेवणं.- कमी किंवा अजिबातच ऊर्जा नसणं.- सुन्न वाटणं. अजिबात काहीच वाटेनासं होणं.- सांगता न येणाऱ्या वेदना होणं- असहाय आणि निराश वाटणं.- नेहमीपेक्षा जास्त धूम्रपान, मद्यपान करणं किंवा औषधं घेणं.- अतिशय गोंधळल्यासारखं वाटणं, विस्मरण होणं, सतत राग, उदास, चिंता किंवा भीती वाटत राहाणं.- कुटुंबीयांवर, मित्रमैत्रिणींवर चिडणं, ओरडणं, त्यांच्याशी भांडणं.- टोकाचे मूड स्वींग्ज होऊन त्याचा नातेसंबंधावर परिणाम होणं.- डोक्यात सतत विचार आणि आठवणी येत राहाणं.- जे प्रत्यक्षात नाही असे कसलेतरी आवाज ऐकू येत राहाणं.- स्वत:ला किंवा इतरांना दुखापत करण्याचे विचार येणं.- रोजचं काम करता न येणं, मुलांकडे दुर्लक्ष करणं. वरीलपैकी एक किंवा अनेक गोष्टी जाणवणं, ही मानसिक समस्यांची सुरुवात आहे असं समजावं.
आपलं मानसिक स्वास्थ्य आणि भावनिक आरोग्य हे दोन्ही सांभाळणं ही आपली मोठी ताकद असते, ती कशी वाढवायची याविषयी पुढच्या लेखात बोलू..समजून घेऊ स्वत:च्याच भावना!
( लेखिका मानसशास्त्रज्ञ, कौन्सिलर आणि दिशा कौन्सिलिंग सेण्टरच्या संचालक आहेत.) www.dishaforu.comdishacounselingcenter@gmail.com