गौरी पटवर्धन
“नाही गं… आमच्याकडे चालत नाही.”“वन डे रिटर्न ट्रिपला जायला तसा काही प्रॉब्लेम नाही. तरी पण एकदा यांना विचारून सांगते.”“मुलगा कॉलेजला जायला लागल्यापासून त्याचे वडील आणि तो एकमेकांशी बोलतच नाहीत. ते काही बोलले की त्याला राग येतो आणि तो ऐकत नाही म्हणून ते चिडचिड करतात. मग दिवसभर याचे निरोप त्यांना द्या आणि त्यांच्या चौकश्यांना उत्तरं द्या. पुन्हा दोघंही कधी माझ्यावरच चिडतील याचा काही नेम नाही.”“वयोमानानुसार सासूबाईंचा कॉन्फिडन्स कमी झालाय. त्यांना सारखी मी आजूबाजूला लागते. कुठे बाहेर गेले आणि तासाच्या जागी दीड तास लागला तरी त्या अस्वस्थ होतात. त्यामुळे हल्ली कुठे बाहेर जायचं म्हंटलं म्हणजे मला नकोच वाटतं.”“मुलीला ती हल्ली घालतात तसली गुढग्यावर फाडलेली जीन्स घ्यायची आहे. तिच्या सगळ्या मैत्रिणींनी घेतली आहे. पण सासरे नाही म्हणतात. त्यावरून ती चिडून बसली आहे. आणि ती चिडली म्हणून सासरे वैतागले आहेत. ते म्हणतात तू तिला समजावून सांग की असले फाटके कपडे घालायचे नाहीत. आणि ती म्हणते की तू अण्णांना समजाव की ती जीन्स फाटकी नसते, ती फॅशन आहे. माझं मधल्यामध्ये दोन्हीकडून मरण होतं.”
“माझी नणंद आमच्या जवळच राहते. तिला कुठेही बाहेर जायचं असलं, की ती माझ्या सासूबाईंना फोन करते आणि दोन्ही मुलांना आमच्याकडे सोडू का म्हणून विचारते. सासूबाई कशाला वाईटपणा घेतील? त्या लगेच हो म्हणतात. मग ती मुलांना इकडे सोडून जाते. आणि असं ती आठवड्यातून तीनदा तरी करतेच. मुलांचं करण्याबद्दल काही नाही गं, पण त्या मुलांना अजिबात शिस्त नाही. काहीही सांगितलेलं ऐकत नाहीत. घरी जो स्वयंपाक केलेला असतो तो खात नाहीत. त्यांना मामीकडून सारखं नूडल्स, बिस्किटं असलं खायला हवं असतं. तेही करायला माझी हरकत नाही. पण उद्या जर ती म्हंटली की माझ्या मुलांना ही नीट जेऊ घालत नाही तर? आणि त्या दोघांचं बघून माझी मुलंपण सारखी वेफर्स आणि बिस्किटांचा हट्ट करायला शिकली आहेत. काय करावं तेच कळत नाही. नणंदेच्या मुलांना काही बोललं की सासूबाईंना राग येतो…”