सुनयना लोणारे (समूपदशेक)
दसरा. आपणच आपल्याभोवतीच्या सीमा ओलांडून उत्तुंग काम करण्याचं बळ देणारा आनंदाचा सण!
दरवर्षी नऊ दिवस शक्तीची उपासना केल्यावर येतो तो दसरा! मनापासून आनंदाचं सोनं लुटण्याचा सण, आनंद वाटण्याचा सण.
आपल्याच शस्त्रास्त्रांची पूजा करून त्यांची शक्ती आपल्याकडे आहे हा आत्मविश्वास देणारा, सरस्वतीची पूजा करत नम्र व्हायला शिकवणारा खास दिवस!
दरवर्षी हा सण येतो तेच आपल्याला आठवण करून द्यायला की आपण मनापासून ठरवलं तर अशक्य काय आहे?(Dussehra 2025: We can change our lives in six months, see how to become a 'magician'!)
आपल्या मनात प्रचंड ऊर्जा आहे, ती ऊर्जा योग्यप्रकारे वापरली, स्वत:वर विश्वास ठेवला आणि खंबीर निर्धार केला तर आपणच आपल्या पायातल्या आपल्याला रोखणाऱ्या बेड्या तोडून टाकू शकतो. जे जे शक्य ते ते सारं करू शकतो, शिकू शकतो, नव्या गोष्टी आणि इतरांना सोबत घेत चालू शकतो जगण्याची नवी आनंदाची उत्तुंग वाट!
गरज आहे ते फक्त ठरवण्याची आणि सातत्यानं मेहनत करण्याची!
आपल्या आजूबाजूला अनेक माणसं अशी कामं करताना दिसतील जी करणं अशक्य वाटेल,ती ते काम का करु शकतात?
कारण त्यांनी त्यात रस निर्माण केलेला आहे, त्यामुळे त्यांचा कामातला आनंद कधी संपत नाही कारण तो आतून येतो. हा आतला झरा एकदा सापडला की आयुष्यभर पुरतो कोणत्याही बाहेरच्या प्रेरणेशिवाय आपण ती गोष्ट करु शकतो.
म्हणून एखादी कला/ छंद /स्कील/अभ्यास जे आवडत नाही पण आवडीनं करायचं आहे ते निवडा.
जसजसं तुमचं त्याविषयी ज्ञान वाढत जातं तसतसा रस निर्माण होत जातो. कुठल्या गोष्टीत रस निर्माण होऊन त्यात प्राविण्य मिळवण्याची हीच सोपी पद्धत आहे.
पुस्तकं किंवा सरळ यूट्यूबपासून सुरुवात करायची. हळूहळू प्रगती होतेच, त्यासाठी सातत्य मात्र हवं.
दिवसात थोडा वेळ तरी स्वतःमधे गुंतवला तर आपण असं काम करु शकतो की ज्यामुळे स्वतःबद्दल प्रेम वाढेल,आदर वाढेल.
आपण आपल्याला आवडू लागलो, आपलं काम आपल्याला आवडायला लागलं तर जगात अवघड असं काहीच नाही.
यंदाच्या दसऱ्याला आपण असंच मनापासून करुया सीमोल्लंघन!