सायली कुलकर्णी (मानसोपचारतज्ज्ञ)
“माझ्या सोबतच नेहमी असं होतं?” “लोक मलाच मुद्दाम त्रास देतात.” “मला नशीब साथच देत नाही.” - ही वाक्यं आपल्याला ओळखीची वाटतात का? काही लोकांच्या बोलण्यात, त्यांच्या सुरात, अगदी रोजच्या वागण्यात हे सतत जाणवतं. हीच मानसिकता म्हणजे व्हिक्टिम मेंटॅलिटी. अर्थात बळीभावना. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, आपण कायम बळी जात आहोत, आपणच बिचारे आहोत. लोक आपल्यालाच कायम छळतात, त्रास देतात असे समजत राहणे, किंबहुना असे ठाम मत असणे म्हणजे व्हिक्टिम मेंटॅलिटी होय.हे खरं आहे की कधी कधी आयुष्यातले छोटे-मोठे निर्णय आपल्याच्या मताविरुद्ध जातात. घरच्या छोट्या गोष्टींपासून ऑफिसमधील मोठे ताणतणाव छळतात. त्यामुळे त्रास होतो. असहायता जाणवते. मात्र त्यातून मार्ग काढण्याचे आणि भावनांवर योग्य पद्धतीने काम करण्याचे ठोस उपाय शोधले जात नाहीत, तेव्हा स्वतःला कायमच व्हिक्टिम समजण्याची सवय लागते. हळूहळू या सवयीमुळे त्याच मानसिकतेत आपण जगतो, तशाच मतांची साखळी बांधली जाते.
महत्त्वाची लक्षणं काय दिसतात?
१. सततची तक्रार : आयुष्य म्हणजे एक कम्प्लेन बॉक्स होऊन जातं. सतत छोट्या-मोठ्या गोष्टींच्या तक्रारींचा पाढा वाचला जातो.
२. इतरांमध्ये दोष शोधणे : स्वतःच्या चुकांची जबाबदारी न घेता इतरांना किंवा बाह्य परिस्थितीला दोष देत राहणे.
३. नकारात्मक विचारसरणी : माझ्याकडून काही होणार नाही, माझ्या हातात काहीच नाही अशा वाक्यांचा जपच करणे.
४. सहानुभूतीची अपेक्षा : लोकांनी माझं दु:ख ओळखावं, मला चांगलं म्हणावं अशी सतत अपेक्षा करत राहणे.
५. सतत राग येणं, मत्सर वाटणं : इतरांचं सगळं चांगलं होतं, पण माझं काही धड होत नाही असं वाटून चिडचिड होते.
परिणाम काय होतो?
१. लोक टाळू लागतात, कारण सततचा तक्रारीचा सूर त्रासदायक, कटकटा वाटतो.
२. नाती तुटतात, मैत्रीत किंवा कुटुंबात अंतर वाढतं.
३. कामाच्या ठिकाणी त्यांना ‘नेहमी कुरकुर करणारे’ म्हणून गंभीरपणे घेतलं जात नाही.
४. आत्मविश्वास कमी होतो, स्वतःवर विश्वास ठेवणं कठीण होतं.
५. आयुष्याचा आनंद हरवतो, माणूस स्वतःचं जग स्वतःच संकुचित करतो.
उपाय काय?
१. स्वतःला प्रश्न विचारा : मी या परिस्थितीत काही करू शकतो/शकते का? मी माझ्यात काय बदल करू शकते?
२. चुकांमध्ये स्वतःचा वाटा ओळखा. कायम परिस्थिती व इतरांवर खापर फोडण्यापेक्षा स्वतः मधील चुका लक्षात घेऊन त्यामध्ये बदल करा.
३. कृतज्ञता हवी. व्यक्ती, वस्तू, आणि परिस्थिती यांच्यामधील चांगुलपणा बघायला शिका. त्यांच्याबद्दल कृतज्ञता जपा.
४. तुलना थांबवा. इतरांचं यश आपल्याविरुद्ध नाही हे लक्षात ठेवा. अनावश्यक तुलना अस्वस्थता देते.
५. राग-मत्सर- द्वेष हे भाव बळीभावनेतून निर्माण होतात, आपल्याला नक्की काय होतंय, पाहा.
६. समस्येत अडकून न राहता उपाय शोधा. मार्ग शोधा, त्यातून वाट काढून पुढं चाला. रडगाणी टाळा.
७. सकारात्मक लोकांमध्ये राहा. सकारात्मक पद्धतीने विचार करणाऱ्या लोकांसोबत राहिले की नकारात्मकता कमी होते.
८. स्वत:शी असलेला संवाद सुधारा. मी प्रयत्न करणार, मी सक्षम आहे असा सकारात्मक स्वसंवाद ठेवा.
९. सपोर्ट सिस्टीम तयार करा. नातेवाईक, मित्र यांच्याशी माणुसकीच्या भावनेने वागून सपोर्ट सिस्टीम तयार करा. त्यांची मदत मागा.
१०. हवं तर सायकॉलॉजिस्टची मदत घ्या. समुपदेशनही मार्ग सोपा करू शकते.
महत्त्वाचं..आयुष्य सतत तक्रारींच्या चौकटीत अडकवणं, रडगाणी गाणं काही बरं नाही. पण लक्षात ठेवा, परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण नसलं तरी त्यावरची आपली प्रतिक्रिया मात्र नेहमी आपल्याच हातात असते. आपण काय करणार हे ठरवा आणि करा.जर तुम्हाला सतत असं वाटत असेल की जगण्यात अर्थ नाही, सारं जगच आपलं शत्रू आहे तर मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्या. आपला कम्प्लेन बॉक्स रिकामा करा. आयुष्य सुंदर आहे आणि आनंदानं जगायचं आहे यावरचा विश्वास वाढेल!येत्या दसऱ्याला आपल्याच मनाच्या मर्यादेत अडकून जगणं सीमित करणारे आपले हे विचार नक्की बदलू या!
Web Summary : Feeling like life's unfair? It's victim mentality. Stop complaining, take responsibility, practice gratitude, and seek help. Change your mindset this Dussehra!
Web Summary : क्या आपको लगता है कि जीवन अनुचित है? यह शिकार मानसिकता है. शिकायत करना बंद करें, जिम्मेदारी लें, कृतज्ञता का अभ्यास करें और मदद लें. इस दशहरे पर अपनी मानसिकता बदलें!