- सायली कुलकर्णी (मानसोपचारतज्ज्ञ)
आपल्या समाजात काही चुकीच्या रितीभाती, मतं आणि माध्यमांनी घडवलेली मतं इतक्या सहजपणे आपल्याभोवती फिरत असतात की, अनेकदा विचार न करता आपण ती स्वीकारतो.(Do you get confused by free advice? When have you made a final decision based on your own opinion?) यश, नैतिकता, देशप्रेम अशा अनेक विषयांवर आपल्या भोवतीच्याच लोकांची मते आपण आपली मानू लागतो. स्वतःचा काही विचार करत नाही. इतरांची मतं सरसकट विचार न करता, भावनिकरीत्या समजून न घेता स्वीकारली तर ती मनात गोंधळ, भीती निर्माण करतात. आपणही अशावेळी चुकीचे निर्णय कळत-नकळत घेतो.
रोजच्या आयुष्यातलं उदाहरण घ्या.
मुलाला अभ्यासात अजिबात रस नसल्यामुळे आईला प्रचंड काळजी वाटत असते. त्यात तिला घरातील इतर लोक, अवतीभोवतीचे लोक अनेक फुकटचे सल्ले सतत देतात. आपली मतं सांगतात.
म्हणतात... ‘चांगलं खडसाव त्याला’, ‘मोबाईल काढून घे त्याचा’, ‘कडक शिस्तीत ठेव त्याला’, ‘धाकच नाही तुझा!’
हे सगळं ऐकून ती आई वैतागते. स्वत:ची निरीक्षणं, मतं, मुलाच्या काय अडचणी याचा काहीच विचार न करता संतापते. मुलाशी संवाद न करता, त्याचं काहीच ऐकून न घेता अचानक त्याचं वेळापत्रक कडक करून टाकते. सतत ओरडू लागते. म्हणते ऐकत नाही माझं म्हणजे काय, शिस्तीत अभ्यासाला लाग. येता-जाता त्याला धारेवर धरते.
परिणाम असा की, मुलाची अभ्यासात प्रगती होत नाहीच. तो अभ्यासाला बसला तरी त्याला त्यात रस नसतो तो नसतोच. पण वाईट म्हणजे आईचं आणि मुलाचं बिनसतं. ते दुरावतात. मुलगा अजूनच कोषात जातो. त्याच्या अडचणी आईला सांगतच नाही आणि प्रश्न सुटत नाही.
म्हणजे इथं झालं काय तर स्वत: विचार न करता, अडचण समजून न घेता इतरांच्या मतांनुसार थेट कृती केली.
पण कृती करण्यापूर्वी स्वत:चं मत, अंतःप्रेरणेनुसार समजलेलं आकलन हे काहीच नव्हतं. त्यामुळे इतरांचं ऐकून मत बनवणं महागात पडलं. परिस्थितीवर विपरित परिणाम घडला.
इतरांची मतंच नाही तर सामाजिक मतं आणि गोंधळ याचाही आपल्यावर कसा परिणाम होतो, याचे अगदी अलिकडचे ताजे उदाहरण म्हणजे कोरोना काळातील गोंधळ. कोरोना महामारीच्या सुरुवातीला, सोशल मीडियावर विविध अफवा आणि मतांचा भडिमार सुरू झाला होता. अमूक गोळी, तमूक काढा, ढमूक प्रकारची वाफ, तमूक प्रकारचे मास्क, त्याहून वेगळे सॅनिटायझर या साऱ्याचा अतिरेक इतका की, नीट विचारच न करता अशा विविध गोष्टी ऐकून लोक घाबरून निर्णय घेत होते. त्यात अनेक लोकांची फसवणूकही झाली, पैसे गमावले. स्वतःला किंवा इतरांना धोका निर्माण झाला. मानसिक तणाव वाढला. इतरांच्या भावनिक मतांमुळे खरे काय आहे हे समजून न घेताच, वैयक्तिक आयुष्यातही चुकीचे निर्णय घेतले गेले. विचारपूर्वक निर्णय घेतल्यावरच आपण मानसिक आणि शारीरिक शांततेचा मार्ग शोधू शकतो. ते नाही झाले तर गोंधळातून केवळ ताणच निर्माण होतो, तोटाच होतो.
सोशल मीडियाच्या काळात अवतीभोवती तणाव असेल तर अशीच प्रचंड मतमतांतरं दिसतात. तो नॉइज आपल्याला स्वत:ला काही विचारच करू देत नाही किंवा आपण करत नाही. अगदी अलिकडच्या युद्धजन्य परिस्थितीतही. अनेकांचा ताण वाढला, मतमतांतरात काही उमजत नव्हतं. खरंतर देशावर संकट आलेलं असताना आपण आपल्या देशाच्या सन्मानासाठी आणि एकतेसाठी समजून-उमजून, शांतपणे, एकजुटीने उभं राहणं हेच आपलं सामान्य नागरिक म्हणून कर्तव्य असतं. पण कोण काय म्हणते, नी कोण काय बोलले या कलकलाटात अनेकांच्या मनात गोंधळच जास्त निर्माण झाला.
लक्षात घ्या, जेव्हा मनात गोंधळ असतो, तेव्हा निर्णयही गोंधळलेलेच असतात. जेव्हा इतरांच्या आवाजात आपला आवाज हरवतो, तेव्हा निर्णय दुसऱ्यांसाठी घेतले जातात स्वतःसाठी नव्हे. आजूबाजूच्या प्रत्येक आग्रही मताला जर आपण विचार न करता आपल्या मनात जागा दिली, तर आपलीच मूल्यं हरवतात. मन चार दिशांना ओढलं जातं, पण आपली वाट कोणती कळत नाही.
अशावेळी विचारा स्वत:ला?
मी विचारपूर्वक निर्णय घेतेय/घेतोय का? नुसतीच भावनिक प्रतिक्रिया देतोय की शांतपणे कृती करतेय/करतोय?
माझा निर्णय माझ्या मूल्यांशी सुसंगत आहे का?
व्यक्तिगत आयुष्यात आणि समाजातही विवेकी विचार करणाऱ्या खंबीर मनाची आवश्यकता आहे.