अनघा आगळे
आज लक्ष्मीपूजन. घरी आलेला पै-पैसा वाढावा, टिकावा असं आपल्या सर्वांनाच वाटतं. पण पैशाचा विचार करताना खर्च, बचत, गुंतवणूक या तीन गोष्टींचा आपण नेमका विचार करतो का? तुम्ही स्वत:ला विचारा, गरज नसलेल्या वस्तू आपण खरेदी करतो का? इतरांना दाखवण्यासाठी गरज नसताना कपडे ते घरातल्या वस्तू ते गाड्या घेतो का? आपण आधी खर्च करतो की आधी बचत. पगार आला की आधी बचत करा.
मोबाइल ॲप आहे म्हणून धडाधड शेअर बाजारात पैसे लावतो आहोत का? तर जपून.
सोनं-चांदी महाग झालं तर तुम्ही गुंतवणूक कशात करता? तुम्ही फक्त पैसे साचवता की गुंतवणूक करता?
मेडिक्लेम, विमा तुम्ही घेतला का? काही गडबड झाली तर कव्हर आहे का आपल्याला?
हे सारे प्रश्न स्वत:ला विचारा. लक्ष्मीपूजन करताना मनाला खरीखुरी उत्तरं द्या!
खरंतर आपल्याला जास्त पैसा मिळावा असं सर्वांना वाटतं पण विचार करा की धन आणि लक्ष्मी म्हणून आपण काय मागतो, काय पुजतो?
मागायचंच असेल तर फक्त स्वत:साठीच नाही तर आपण सर्वांसाठीच वैभव मागूया. स्वास्थ्य मागूया. पैसा आपली मती भ्रष्ट न करता आपला प्रत्येक पैसा स्वत:सह इतरांच्या कल्याणासाठीच वापरला जाईल अशी प्रार्थना करुया.
आज आपण सर्वच जण पैशाच्या मागे धावतो आहोत. जगायला पैसा लागतो हे कोणी नाकबूल करणार नाही. मात्र, कुणाकडे अधिकचा पैसा असेल किंवा कुणी श्रीमंत असेल तर अशा व्यक्तीकडे संशयाने पाहतो. त्यांनी तो पैसा प्रामाणिकपणे मिळवला नसेल, असे उगाच गृहित धरतो. म्हणजे एकीकडे आपल्याला श्रीमंतीचे, पैशाचे आकर्षण वाटत असते, पण त्याचबरोबर ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्यांच्याकडे जरा आकसानेही पाहतो.
तसे न करता आपण आपल्या कष्टाला आशीर्वाद दे असं म्हणूया!
आपण नेहमी म्हणतो की, लक्ष्मी चंचल आहे. पण लक्ष्मी चंचल नाही, ज्याच्याकडे ती असते ती व्यक्ती चंचल होते, त्याची वृत्ती चंचल होते. आपले दोष आपण लक्ष्मीवर थोपवत असतो. म्हणून माझ्याकडे लक्ष्मी आल्यावर माझे जीवन असे व्हावे की, माझ्याकडे लक्ष्मी आल्यावर ज्या काही चुका होतात त्या माझ्या हातून होता कामा नयेत. एवढं जरी केलं तरी आपल्या घरी आलेली लक्ष्मी कायमच आपल्या घरी राहून सुख आणि समाधान देईल!