अनेकांचा हा दरवर्षीचा अनुभव असतो की दिवाळीसारखा मोठा सण असला तरी आपल्याला मात्र उदास वाटतं. कधी एकदा हा सणउत्सव संपतो असं वाटतं. का उगीच लोक इतके आनंदी आहेत असं वाटूनही चिडचिड होते. असं का होत असेल? कशामुळे उदास वाटतं? कशाचा राग येतो? हे नॉर्मल म्हणावं की नाही? तर हे नॉर्मलच. याला म्हणतात फेस्टिवल फटिग!
सण साजरं करणं म्हणजे खरंतर निवांत होणं. रोजच्या चक्रातून बाहेर पडून आपल्या माणसांशी संवाद, खाणंपिणं, झोप, हसणं आणि सगळे ताण कमी करणं. बाहेरचा गोंगाट थोडा बाजूला ठेवून आपल्या मनाचंही ऐकणं. पण होतं काय की दिवाळी आली की घराघरात साफसफाई, फराळ, रोषणाई, भेटवस्तू,शॉपिंग यासाऱ्याची गडबड एकेक महिनाभर आधीच सुरू होतो. त्यात ऑफिसमध्येही कामाचा लोड वाढतो. डेडलाइन वाढतात. काम करकरुन जास्त दमछाक होते. आपण एकटेच काम करतोय ही भावना जास्त त्रास द्यायला लागते.
जगभरात अनेक माणसांचं असं होतं. सर्व मोठ्या सणांच्या संदर्भात होतं. काहींचा फेस्टिवल फटिग तर इतका वाढतो की अनेकदा त्यांना मानसोपचाराची गरज पडते.
पण हा ताण नेमका कशानं येतो?
सणाची तयारी, नियोजन, खरेदी, घरगुती जबाबदाऱ्या, पाहुणे, सोशल मिडियावर परफेक्ट फोटो अपलोड करायचा अनावश्यक ताण या साऱ्यानं अक्षरशः दमायला होतं. विशेषतः महिला. त्या तर या काळात दुप्पट जबाबदाऱ्या घेतात. कामं वाढतात. स्वतःसाठी वेळच उरत नाही. या धावपळीमुळे शरीर थकतंच पण मानसिक थकवाही येतो. त्यातून अनेकदा मग उदास वाटतं. एकटेपणा येतो. नैराश्य वाढतं. आणि काहीच करु नये अशी भावनाही तयार होते.
अनेकजण बोलत नसले तरी त्यांचा आर्थिक ताणही वाढलेला असतो आणि पैशाची सोंग आणता न आल्यानंही उदास वाटतं.
काहींची जवळची माणसं दूर देशात एकटी असतात. मुलं घरी येऊ शकत नाही. जीवाभावाचं माणूस गमावलेलं असतं किंवा पूर्वी गेलेल्या कुणा माणसाच्या आठवणींनी जीव कातर होतो.
पण असं वाटणं हा काही दोष नाही. ही एक अत्यंत नैसर्गिक भावना आहे. ती स्वीकारुन त्यातून स्वत:ला शांत ठेवणं हेच या अवघड काळातलं उत्तर असतं.
