lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > कोरोना झाला तेव्हा आपलीच माणसं ‘परकी’ झाली, आपण एकटे पडलो असा तुमचा अनुभव आहे?

कोरोना झाला तेव्हा आपलीच माणसं ‘परकी’ झाली, आपण एकटे पडलो असा तुमचा अनुभव आहे?

कोरोनाकाळात मदत न मिळणे; जवळच्या माणसांनी अंतर राखणे, आर्थिक मदत ते डबा देण्यापर्यंतचे वाईट अनुभव आले, त्यातून कसं बाहेर पडाल? तेच मनात ठेवून जगणार आहात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 03:51 PM2021-05-26T15:51:56+5:302021-07-12T20:27:28+5:30

कोरोनाकाळात मदत न मिळणे; जवळच्या माणसांनी अंतर राखणे, आर्थिक मदत ते डबा देण्यापर्यंतचे वाईट अनुभव आले, त्यातून कसं बाहेर पडाल? तेच मनात ठेवून जगणार आहात का?

corona : relatives, friends don't help you, feeling alone and shattered? changing relationships | कोरोना झाला तेव्हा आपलीच माणसं ‘परकी’ झाली, आपण एकटे पडलो असा तुमचा अनुभव आहे?

कोरोना झाला तेव्हा आपलीच माणसं ‘परकी’ झाली, आपण एकटे पडलो असा तुमचा अनुभव आहे?

Highlightsआपण रोज व्यायाम करतो आणि शरीर तंदुरुस्त ठेवायचा प्रयत्न करतो, तसंच मनासाठी देखील वेगवेगळे डूज आणि डोण्ट्स आपण कसोशीने पाळले पाहिजेत.

प्राची पाठक

कोरोनामुळे घरातच विलगीकरण झालेले, हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागलेले, काहीच लक्षणं नसलेले, सगळे उपचार घेऊन, भरपूर खर्च होऊनही दगावलेले असे अनेक प्रकारचे उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. अजूनही कोणी कोरोनापासून सुरक्षित आहेत. तर कुठे कुटुंबच्या कुटुंब बाधित होत आहेत. आपण संकटात असतांना आपल्याला अनेक नात्यांना नव्याने समजून घ्यावं लागलेलं आहे. आज संकट नाही, परंतु उद्याचं काय, याची प्रचंड काळजी अनेकींना-अनेकांना आहे. कुणाकडे थोडीफार सपोर्ट सिस्टीम आहे. कुणाकडे पैसा आहे. पण वेळेला तो कामास येईल का, पुरा पडेल का, आपल्याला मदत लागलीच तर कोण आपल्यासाठी उभं राहणार, असे अनेक प्रश्न आहेत. कुणाच्या नोकऱ्या गेल्यात, कोणाचे पगार कमी झालेत. तर कोणी नोकरी आज जाईल की उद्या या भीतीखाली सतत वावरत असतात. नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे प्रॉब्लेम्स तर आणखीनच वेगळे आहेत. कामाच्या स्वरूपानुसार हजारो प्रकारची उदाहरणं आजूबाजूला आहेत. या सगळ्यांत एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे आपण संकटात असलो, तर आपलं कसं निभावेल. आपली जपलेली माणसं सुरक्षित राहतील ना? आपल्याला काही बरंवाईट सोसावं लागलं, तर आपल्यासाठी कोण असणार?
आपल्या आसपास कोणीतरी दगावतं आणि आपण मनातच स्वतःला ओरडतो, हे असे विचार मनात अजिबात यायला नको. अगदी शत्रूवर सुद्धा अशी वेळ यायला नको. अशी चुकीची इच्छा कोणाबाबत मनात आल्यामुळे मनातल्या मनातच आपण स्वतःवर अतिशय नाराज होतो. आजूबाजूला जगण्याची शाश्वती नसतांना मनात असे वेगवेगळे विचार येणं अगदी स्वाभाविक आहे. आपल्या मनात दुसऱ्याबद्दल वाईट विचारही येतात, म्हणून अगदी गिल्ट येणं हे सुद्धा मोठ्या मनाचं लक्षण आहे. भावनेत वाहून न जाता आपण नीट विचार करू शकतोय, ही चांगलीच गोष्ट आहे. असा सेल्फ टॉक आपण आपल्या आधारासाठी वापरायला हवा.


हे सगळं भीतीचं, अनिश्चिततेचं, अडचणीचं चक्र मनात सुरु असतांनाच कोरोनाच्या शंकेमुळे कोणी आपल्याला वाळीत टाकल्यासारखी वागणूक देतं. कुठे आपण कोणाला कोरोनाच्या शंकेमुळे दूर ठेवतो. साधं उदाहरण बघा. आपल्या घरात कोरोना रुग्ण असेल, भले तो हॉस्पिटलात बरा होऊन मग घरी आला असेल. तरी लोक जरा दुरून-दुरून आणि जपूनच व्यवहार करतात तुमच्याशी. अगदी जी माणसं आपण जपलेली असतात, मदतीला सहजच येऊ शकतील, असं आपल्याला वाटत असतं, ती माणसं आपल्याला दूर ठेवतात. टाळायला बघतात. ज्यांची कल्पना देखील केलेली नसते, असे लोक वेळेला धावून येतात. त्यावेळी आपल्या मनात नात्यांच्या एकूणच गुंत्याबद्द्दल फार उलटसुलट विचार येत असतात. कोरोनाच्या संभाव्य संसर्गापायी कोणाला कोणी दूर ठेवणं आपण समजून घेतलं पाहिजे. कदाचित त्यांच्याकडे संभाव्य रोगापेक्षा देखील करणारी माणसं नसणं हे भीतीचं कारण असू शकतं. संकटाशी लढायच्या आर्थिक पाठबळापेक्षा जमेल तितकं आपण दूरच राहू, असं काही त्यांनी ठरवलं असेल. भले तुम्ही नोंद घेऊन ठेवा. पण या विचारांमध्ये अडकत जाऊ नका. आपल्याला त्याक्षणी माहित नसतील अशी अनेक कारणं असू शकतात. त्यामुळे, कोणी आपल्याला वाळीत टाकल्यासारखं केलं आणि कोणी कसं पॉलिटिक्स खेळलं, याचा पसारा मनात फार मांडून बसायचा नाही. आपल्यावर भरोसा ठेवून बसलेले काही लोक आपल्याबद्दल देखील असेच बोलत असतात. त्यामुळे, हे सगळे नात्यांचे गुंते फार डोकं आणि वेळ घालवून सोडवत बसायचे नाहीत. "आज आणि उद्या" असे वर्तमान आणि भविष्य आपले आपण आखायला घ्यायचे. इतिहासाचा खासकरून नकोश्या इतिहासाचा कोळसा उगाळावा तितका काळाच निघतो. त्यापेक्षा हाताला आणि डोक्याला काहीतरी भरीव कामात गुंतवून ठेवायचं.

आपली आपल्या आजूबाजूला अशी काही सपोर्ट सिस्टीम आहे का?


१. ती सपोर्ट सिस्टिम आपल्यासाठी किती आणि कशी उभी राहू शकते, याची तयारी आपण संकट काळात नव्हे, तर इतरही वेळेत करून ठेवली पाहिजे. म्हणजे हाकेला किमान काहीतरी आधार आपल्यासाठी उपलब्ध असेल.

२. दुसऱ्यांवर आपले प्रश्न सोपवून देऊन त्यांनी त्यांच्या नजरेने आणि त्यांच्या सोयीने काढून दिलेली तय्यार उत्तरं आपल्या कामास येतीलच असं नाही. किंबहुना आपण स्वतःला अशी सवय लावून घ्यायचीच नाही. तरीही, आपल्याला लहान मोठी मदत लागू शकते. ती आपण लवकरात लवकर कशी आणि कुठून उभी करू शकतो, याची थोडीफार तरी तयारी आपली असायला हवी.
३.  खासकरून कामानिमित्त वेगळ्या गावी राहणाऱ्या, एकट्या-दुकट्या राहणाऱ्या स्त्री पुरुषांनी तर याची विशेषच जाण ठेवायला हवी. "सगळं काही गुगलवर नसतं". त्यामुळे, आजूबाजूच्या लोकांशी बोलणं शिकायला हवं. अगदी कोणाच्या गळ्यात पडायची गरज नाही. पण, क्वचित कधी तातडीची मदत लागली, तर जवळच्या जवळ मदतीचा हात देणारं कोणीतरी आपण जपलं पाहिजे. 

४. त्यांच्या मदतीसाठी आपणही उभं राहिलं पाहिजे. शेअरिंगने समस्या सुटल्या नाहीत, तरी लढायचं बळ येतंच. कोरोना काळात सगळी नातीच ढवळून निघालेली असतांना, कोण आपलं, कोण परकं असे प्रश्न सतत मनाला पोखरत असतांना, पोस्ट कोविड डिस्प्रेशन, उदासी अनुभव असतांना शरीराच्या प्रतिकार शक्ती इतकंच मनाच्या सहन करण्याच्या क्षमतेला देखील सक्षम बनवायला हवं. त्यासाठी स्टेप बाय स्टेप आपण काय काय करू शकतो, याची आखणी करायला हवी. जसा आपण रोज व्यायाम करतो आणि शरीर तंदुरुस्त ठेवायचा प्रयत्न करतो, तसंच मनासाठी देखील वेगवेगळे डूज आणि डोण्ट्स आपण कसोशीने पाळले पाहिजेत.

(लेखिका मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)
prachi333@hotmail.com

Web Title: corona : relatives, friends don't help you, feeling alone and shattered? changing relationships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.