- सोनाली जोशी (आर्ट थेरपीस्ट)
Color Therapy : रंग हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. आयुष्य हे जर नुसत्या काळ्या पांढऱ्या रंगाचे असते तर आयुष्याला रंगत आलीच नसती. आयुष्यात रंगत येते ती केवळ रंगांमुळे. आपल्या प्रत्येक भावनेशी रंग निगडित आहे. प्रत्येक भावनेचा रंग आहे. भावना आपल्या मनावर आणि शरीरावर परिणाम करतात. म्हणूनच रंगाचा थेट परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. शारीरिक आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर मानसिक आरोग्य उत्तम हवं. मानसिक आरोग्यात रंगाची भूमिका महत्वाची आहे.
Image: Google
रंगांची साथसोबत
शारीरिक आरोग्य बिघडलेले असल्यास, मानसिक ताण आलेला असल्यास डाॅक्टर सकाळी बाहेर जाऊन चालण्याचा सल्ला देतात. निसर्गातला हिरवा रंगं अनुभवण्यासाठी हा सल्ला दिलेला असतो. हा हिरवा रंग पाहून आपण फ्रेश होतो. ताजे तवाने होतो. यामागचं शास्त्रीय कारण म्हणजे निसर्गातला हिरवा रंग आपल्यावर परिणाम करतो.मानसिकता बदलायला, मन शांत व्हायला त्याने मदत होते. दैनंदिन जीवन जगताना, दु:ख, त्रागा, राग या ज्या भावना टिपेला पोहोचलेल्या असतात त्या शांत व्हायला हिरव्या रंगामुळे मदत होते. तीव्र झालेल्या भावना हिरव्या रंगामुळे नियंत्रित होतात. त्यामुळे बाहेर जाऊन 10 मिनिटं जरी चालून आलो तरी छान ताजंतवानं वाटतं ते यामुळेच. रंगांचा आपल्या जगण्यावर खोलवर परिणाम होत असल्यामुळेच मानसिकता सकारात्मक आणि आनंदी करण्यासाठी कलर थेरेपीचा विचार गांभिर्यानं करायला हवा. मानसिकता बदलण्यास मदत करणारी कलर थेरेपीच्या ट्रिक्स आपण सहज करु शकतो. आपल्या भवतालातले रंग वापरुन आपण आपलं आयुष्य अधिक सकारात्मक , आनंदी आणि रंगतदार करु शकतो.
Image: Google
रंगांचा उपचार म्हणून उपयोग करताना..
जगताना आपण पावलोपावली रंगांचा वापर करत असतो. कपडे घालताना, जेवताना, घराची सजावट करताना, आपला काही व्यवसाय असल्यास त्यासंबंधीचा लोगो तयार करताना रंगांचा विचार प्रामुख्यानं केला जातो. जगताना आपण रंग सोबतीला घेऊनच जगत असतो. या रंगाकडे बघण्याचं भान अधिक सजग केलं, विस्तारलं तर रंगामुळे जीवनात आनंद तरंग निर्माण होतील हे नकी !!
Image: Google
1. कलर थेरेपीमध्ये रंगांचं वर्गीकरण केलेलं आहे. कलर थेरेपी इंद्रधनुष्याच्या सात रंगांवर आधारित आहे. सात रंगाचा वापर कलर थेरेपीमध्ये अशा पध्दतीनं केला आहे की त्याचा उपयोग आपण आपली मानसिकता सुधारण्यासाठी करु शकतो. लाल, नारंगी, पिवळा हे उष्ण रंग आहे. त्यात खूप ऊर्जा आहे. प्रत्येक रंगाची सकारात्मक बाजू आहे तशीच नकारात्मक बाजूही आहे. हिरवा रंग हा न्यूट्रल म्हणजे तटस्थ रंग म्हणून ओळखला जातो. निळा, जांभळा आणि पांढरा हे शीत रंग आहेत. हे सात रंग सात भावनांशी जोडलेले आहेत.
Image: Google
2. उष्ण रंग वापरल्याने/ त्याकडे बघितल्याने आपोआपच आपल्यात ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो. उष्ण रंगांचा मनावर परिणाम होवून त्याचं ऊर्जेत रुपात्ंर होतं. लाल, पिवळा आणि नारंगी हे उष्ण रंग सकारात्मकता वाढवतात. त्यामुळे जेव्हा मनात दु:ख, उदासी अशा भावना निर्माण होतात तेव्हा उष्ण रंगांचा वापर करावा. लाल/ पिवळ्या / नार्ंगी रंगाचे कपडे घालावेत. त्या रंगाचे पदार्थ खावेत.
Image: Google
3. रंगांच्या वापराची एक उलटी बाजू देखील आहे. म्हणजे मनात तीव्र स्वरुपाच्या भावना निर्माण झाल्या असतील तर या भावनांना शांत करणं गरजेचं असतं. मनात उत्साह खूप असतो,पण शरीरानं शांत राहाणं इष्ट किंवा गरजेचं असतं अशा वेळी शीत रंग वापरावेत. निळा, जांभळा, पांढरा हे शीतरंग वापरले तर मन शांतं होतं, जिवाला स्वस्थता लाभते. . तसेच हिरवा रंग हा न्यूट्रल रंग असल्यानं त्याचा वापर तर कोणत्याही भावनेच्या वेळी केला तरी त्याचा सकारात्कच परिणाम होतो. कोणत्याही तीव्र स्वरुपाच्या भावनेवर नियंत्रण करण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर महत्वाचा ठरतो. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी शीत रंगांचा उपयोग होतो. म्हणूनच आजारी असताना मुद्दाम निळा, जांभळा, हिरवा रंग वापरण्याचा सल्ला दिला जातो.
Image: Google
4. रंगांचा वापर मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी, आनंदी राहाण्यासाठी करताना रोज सकाळी उठल्यानंतर आपण स्वत:ला आपला मूड कसा आहे? आपल्याला कसं वाटतंय हा प्रश्न विचारायला हवा. मी आज आनंदी आहे की उदास की हताश? हे आपलं आपण तपासायला हवं. जर एखाद्या दिवशी खूपच राग आलेला आहे असं वाटत असेल, चिडचिड होत असल्यास त्या दिवशी मुद्दाम शीत रंगं वापरावेत. निळ्या रंगाचे कपडे घालणं, आकाशाकडे बघणं असे उपाय करता येतात. चिडचिड होत असल्यास पालेभाज्या खाव्यात. कारण पालेभाज्या हिरव्या असतात. त्यामुळे भाज्यांचा वापर करुनही नकारात्मकतेचं रुपांतर सकारात्मकतेत करता येतं. रंगांमध्ये हिलींग पाॅवर असल्यानं रंगांचा वापर आपण आपली मानसिकता सुधारण्यासाठी करु शकतो. फक्त त्यासाठी आपण आपला रोजचा मूड, मानसिकता ओळखून रंगांचा वापर करायला हवा. आपला रोजचा मूड सुधारण्यासाठी आपली मानसिकता ओळखून सात रंगांचा वापर करायला हवा, त्यासाठी आपला मूड कसा ते ओळखून रंग ठरवा हे सांगितलं आहे.
- शब्दांकन: माधुरी पेठकर