Lokmat Sakhi >Mental Health > "स्व"च्या शोधात असलेली ती पन्नाशीच्या उंबरठ्यावरची स्त्री.. सगळं असूनही काय छळतं बरं तिला?

"स्व"च्या शोधात असलेली ती पन्नाशीच्या उंबरठ्यावरची स्त्री.. सगळं असूनही काय छळतं बरं तिला?

या वयोगटातील अनेकजणी खूप भावूक झालेल्या असतात. आयुष्याच्या मध्यावर आल्यावर, मुले मोठी झालेली असतात. नोकरी, नवरा, घर यांची जबाबदारी पेलायची सवय झालेली असते आणि त्याचा बाऊ जरा कमी झालेला असतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2025 15:12 IST2025-08-27T15:10:52+5:302025-08-27T15:12:19+5:30

या वयोगटातील अनेकजणी खूप भावूक झालेल्या असतात. आयुष्याच्या मध्यावर आल्यावर, मुले मोठी झालेली असतात. नोकरी, नवरा, घर यांची जबाबदारी पेलायची सवय झालेली असते आणि त्याचा बाऊ जरा कमी झालेला असतो.

A woman in her late fifties, searching for her "self". Despite everything, what is bothering her? | "स्व"च्या शोधात असलेली ती पन्नाशीच्या उंबरठ्यावरची स्त्री.. सगळं असूनही काय छळतं बरं तिला?

"स्व"च्या शोधात असलेली ती पन्नाशीच्या उंबरठ्यावरची स्त्री.. सगळं असूनही काय छळतं बरं तिला?

Highlightsतुमच्याकडे अनुभव आहे, समज आहे, आणि एक विलक्षण सहनशीलता आहे. वय हा अडथळा नाही, तर एक मोठी अनुभव संपन्न संपत्ती आहे.

आज ती सुखवस्तू कुटुंबातील पन्नाशीच्या वयोगटातली स्त्री आहे. नाव सामान्य, राहणीमान साधं, चेहरा हसरा आणि सोज्वळ, पण मनात विचारांचा एक खोल सागर! आता मुलं मोठी झाल्यामुळे कारमध्ये तिला तिच्या आवडीची गाणी ऐकता येतात आणि काही गाणी ऐकून तिचे डोळे काहीही कारण नसताना ओलावतात! तिची अवस्था अगदी संदीप खरे यांच्या गाण्यात योग्य शब्दात मांडली आहे. 
आताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येते
आताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते....

 

या वयोगटातील अनेकजणी खूप भावूक झालेल्या असतात. आयुष्याच्या मध्यावर आल्यावर, मुले मोठी झालेली असतात. नोकरी, नवरा, घर यांची जबाबदारी पेलायची सवय झालेली असते आणि त्याचा बाऊ जरा कमी झालेला असतो. तिला जरा भूतकाळात डोकावायला वेळ मिळतो. आई-वडिलांची लाडाची लेक, पण त्यांच्या स्वप्नांची वाहक. यथायोग्य कालगतीनुसार तिने सुशिक्षित, सन्मानित सुखवस्तू आणि आदरयुक्त पत्नीचे स्थान प्राप्त केलेले आहे. नवऱ्याची स्वप्न आपलीशी करून त्यांचा पाठपुरावा करताना "स्व" ला विसरून त्याच्या इच्छा आकांक्षामध्ये समरस झालेली ती अर्धांगिनी आहे. ती एक मुलांच्या प्रगती करता त्याग करणारी, सामाजिक आणि कौटुंबिक अपेक्षा आणि गरजा पूर्ण करणारी, मुलांच्या सुख-दुःखात, त्यांच्या गरजा पुरवण्यात, छोटीमोठी आजारपणं करण्यात स्वतःला विसरून गेलेली माता आहे. स्त्रीच्या कालावत सामाजिक आणि व्यावसायिक गरजा लक्षात ठेवून ती जमेल तसे अर्थार्जन करणारी लक्ष्मी पण आहे. ती तिच्या मागच्या पिढ्यांच्या स्त्रियांच्या तुलनेने शैक्षणिक आणि आर्थिकदृष्टया अनेक पटीने पुढे आहे. तिच्याकडे भौतिक सुख, अद्यावत यंत्र यांची सुबत्ता पण आहे, मग तिला या आयुष्याच्या टप्प्यावर काय खटकतं आहे? उत्तर आहे तिला झालेली आपण गमावलेल्या “स्व”ची जाणीव ! या टप्प्यावर आल्यावर मागे वळून पाहताना, आयुष्याचा आढावा घेताना “स्व”कडे दुर्लक्ष केल्याची जाणीव! स्वतःच्या मनस्थितीचे वर्णन संदीप खरे यांच्या कवितेत अगदी यथार्थ केले आहे. 

 

न कुठले नकाशे न अनुमान काही
कशी ही अवस्था कुणाला कळावी
कुणाला पुसावी कुणी उत्तरावे
कशी ही अवस्था कुणाला कळावी
कुणाला पुसावी कुणी उत्तरावे
किती खोल जातो तरी तोल जातो
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे
आताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते!

आजतागायत ती सतत कोणाच्या तरी गरजांमध्ये आणि अपेक्षांमध्ये गुंतलेली नाही तर गुंफलेली होती. आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आनंदात ती आनंद मनात होती आणि त्यांच्या यशात ती समाधानी राहत होती. या मायाजाळात, त्या कर्तव्याच्या आणि अपेक्षांच्या गुंतवणुकीत, ती स्वतःला हरवून बसली होती. आज ती ५० च्या उंबरठ्यावर उभी आहे. मुलं मोठी झाली आहेत, पालकत्वाच्या जबाबदाऱ्यांची स्वरूपं झपाट्याने बदलत आहेत. आई वडिलांचं वृध्दत्व पाहताना स्वतःच्या वार्धक्याचे विचार डोकावू लागले आहेत. ती कधी आरशात पाहून विचार करते — "मी कोण?" आई वडिलांना मानसिक आधार देणारी मुलगी? दोन पिढ्यांच्या कात्रीत अडकलेली आई? नवऱ्याच्या यशात स्वतःचं अस्तित्व पाहणारी बायको? चालीरिती, संस्कृती, पिढी पुढे नेणारी सून? आई वडिलांची जबाबदारी आपले कुटुंब सांभाळून कसे घ्यावे ह्यामध्ये गोंधळून गेलेली बहीण? की स्त्रीची बदललेली भूमिका स्वीकारायला झगडणारी एक मध्यमवयीन बाई?— या सगळ्या भूमिका ओळखीच्या आहेत तिच्या, पण तिचं “मी”पण हरवलं आहे. तिला आठवतं, तिला चित्र काढायला आवडायचं, कविता लिहायला आवडायचं, एकटी फिरायला आवडायचं, पुस्तक वाचत बसायला आवडायचं, … पण त्या सगळ्या गोष्टी कुठे हरवल्या?

 

आता ती स्वतःला विचारते — "आता मी काय करू?" आणि उत्तर हळूहळू तिच्या मनातून उमटतं — "मी स्वतःसाठी जगणार आहे." माझी हरवलेली ओळख मी शोधणार आहे. मी स्वतःचा शोध पुन्हा घेणार आहे, पन्नाशीच्या टप्प्यात मी नव्या दिशा, कला, नवे वास्तव आणि विश्वास यांचा स्वीकार करणार आहे. ती आता पुन्हा चित्र काढते, जुन्या डायऱ्या उघडते, कविता पुन्हा लिहते. ती मैत्रिणींशी मनमोकळ्या गप्पा मारते, एकटी फिरते, कधी एकटी चहा पिते आणि त्यातही आनंद शोधते. ती आता स्वतःला दोष देत नाही, तर स्वतःला समजून घेते. ती आता "स्वतःची" आहे — पूर्ण, स्वतंत्र, आणि सुंदर. "ती हरवली होती, पण ती हरवलेली नव्हती — ती फक्त थोडा वेळ दुसऱ्यांसाठी थांबली होती. आता ती पुन्हा चालायला लागली आहे — स्वतःच्या दिशेने, स्वतःच्या गतीने."

 

मैत्रिणींनो तुम्हाला हेच सांगावसं वाटतं पन्नाशीचा टप्पा म्हणजे आयुष्याचा संध्याकाळ नव्हे. तर एक नवा सूर्योदय. माझ्याकडे सध्या सबळ गोष्ट काय आहे? ह्याचा विचार केला तर तुमच्याकडे अनुभव आहे, समज आहे, आणि एक विलक्षण सहनशीलता आहे. वय हा अडथळा नाही, तर एक मोठी अनुभव संपन्न संपत्ती आहे. स्त्री ही केवळ व्यक्ती नाही, ती एक सर्जनशील शक्ती आहे. ती जीवन निर्माण करते, संस्कार रुजवते, आणि अडचणींमध्येही नव्या वाटा शोधते. पन्नाशीच्या टप्प्यावरही तुमचे सामर्थ्य, सौंदर्य, सर्जनशीलता थांबत नाही—तर अधिक समृद्ध होते. पण ती समृद्ध करायला एकमेकींना प्रेरणा दया . तुमच्याकडे निर्मितीची देणगी होती, आहे आणि ती कायम राहील याची स्वतःला आठवण करून द्या.  पुन्हा नव्याने शिका , नव्या स्वप्नांना आकार द्या आणि स्वतःच्या अस्तित्वाला नवा अर्थ द्या. तुमच्या निर्णयांमध्ये, स्वप्नांमध्ये आणि कृतींमध्ये पुढच्या पिढीचं भविष्य दडलेलं आहे. कारण तुमच्या हातात आहे नव्या जगाची, नव्या शक्यतांची आणि नव्या प्रेरणांची चावी. 

स्वतःच्या दिशेने, स्वतःच्या गतीने, स्वतःला आनंद होईल ते करत राहा आणि आनंदाच्या मार्गावर पुढे जात राहा.  

दीपाली कुलकर्णी - जोध
kdeepali@hotmail.com

 

Web Title: A woman in her late fifties, searching for her "self". Despite everything, what is bothering her?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.