डॉ. वृषाली नंदवाळकर, धुळे
५ सप्टेंबर २०१९. त्या दिवशी दुपारी अनोळखी क्रमांकावरून एक कॉल आला. माझ्या पाच वर्षाच्या मुलाने कॉल घेतला आणि पळतच फोन द्यायला आला. म्हणाला,"तुझी कुणीतरी मैत्रीण बोलतेय गं!" मी फोन घेतला. बोलायला सुरुवात करताच तिकडून गोड आवाज आला,"वृषाली बोलतेय ना? मी पल्लवी." मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण तब्बल २३ वर्षानंतर मी पल्लवीचा आवाज ऐकत होते. कारण ती आता एक साधारण मुलगी नाही तर एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नावारुपाला आलेली आहे. तिने मला स्वत:हून इतक्या वर्षांनी फोन केला यावर माझा विश्वासच बसत नव्हता.
पल्लवी पाटील. तिला आता आपण अनेक सिरिअल्समध्ये उत्तम काम करताना पाहतो. पण माझी आणि पल्लवीची भेट १९९६ साली झाली ती सरस्वती विद्यालय, शिंदखेडा इथे! इयत्ता पहिलीच्या वर्गात. पल्लवी तिच्या मावशीकडे शिकायला आलेली. गोरीगोमटी, शांत स्वभाव, बॉबकट असलेली, कोमल आवाज असणारी पल्लवी खूप मनमिळाऊ होती. अभ्यासात हुशार, प्रेमळ स्वभाव असल्यामुळे ती वर्गातील सर्वच मैत्रिणींना आवडायची. पल्लवी आणि मी सोबतच शाळेत जायचो. तिच्या मावशीचे घर माझ्या घरापासून थोड्या अंतरावर होते. आम्ही रोज सोबतच शिकवणीला जायचो, खेळायचो, राहायचो.
आम्ही लहान असताना दर नवरात्रात पल्लवीची मावशी आम्हा मुलींना कुमारिका म्हणून जेवायला बोलवायची. आम्हीही मस्त नट्टापट्टा करून तिथे यथेच्छ जेवायला जायचो. छान खेळायचो. मस्ती करायचो. मी देखील माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मैत्रिणींना घरी (आईला न सांगता) बोलवायचे. स्टुडिओमध्ये ग्रुप फोटो काढायला जायचो. त्यात पल्लवी आणि मी पुढेच असायचो. दर दिवाळीला, नवीन वर्षाच्या निमित्ताने मी आणि पल्लवी ग्रीटिंग कार्ड स्वतः हाताने बनवून एकमेकींना द्यायचो. अजूनही मी ते माझ्याजवळ सांभाळून ठेवले आहेत.
१९९७ साली इयत्ता दुसरीत असताना शाळेच्या स्नेहसंमेलनात आम्ही "रेल में छन न न होय रे" या गाण्यावर नृत्य केले होते. तेव्हा माझ्या पायाला थोडी इजा झालेली असल्याने मला थोडा त्रास व्हायचा. तेव्हा पल्लवीने मला खूप धीर दिल्याचे मला अजूनही आठवते. पल्लवी खूप छान नृत्य करायची. त्यामुळे मला तिच्याकडून खूप शिकायला मिळायचे. सुट्टीच्या दिवशी पल्लवी माझ्या घरी खेळायला यायची. आम्हा दोघींना माझ्या आईच्या हाताचे लोणचे बरणीतून (गुपचूप) काढून त्या फोडी मस्त चघळत बसणे खूप आवडायचे. मी शाळेत जाताना डब्यात जास्त लोणचे घेऊन जायचे ते केवळ पल्लवीसाठी. अशा कितीतरी गोड आठवणी आहेत.
एकदा पल्लवी आणि मी माझ्या घरी खेळत होतो. माझ्या घरात कापूस गच्च भरलेला होता. सर्व खोलींमध्ये कापूसच कापूस! मग आता खेळायचं काय? आम्ही चढलो त्या कापसाच्या ढिगाऱ्यावर आणि लागलो उड्या मारायला! काय मज्जा येत होती! मला अजूनही आठवते. त्यात तिथे कापसाची बोंडेही पडलेली होती, मला पल्लवीने विचारले हे काय आहे? "कापसाचं बोंड" असं मी सांगताच पल्लवी इतक्या जोरात हसायला लागली की तिचे हसून हसून पोट दुखायला लागले आणि तिला बघून माझंही हसू आवरेना. कदाचित तिने पहिल्यांदाच तो शब्द ऐकला असेल. असं आमचं बालपण गेलं. खरंच वाटतं, " गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी". किती सुंदर होते ते लहानपणाचे दिवस
१९९९ साली इयत्ता तिसरी नंतर पल्लवी पुन्हा तिच्या गावी आई-वडिलांकडे निघून गेली. मला खूप सुनं वाटू लागले. माझी प्रिय मैत्रीण मला सोडून निघून गेली होती. मला तिची खूप आठवण यायची. पण तेव्हा कुणाकडे फोनही नसायचे. त्यानंतर भरपूर मैत्रिणी मिळाल्या तरी मनाच्या कोपऱ्यात माझी बालमैत्रीण पल्लवी कायमच राहात होती. नंतर मी पल्लवीला खूप शोधायचा प्रयत्न करत राहिले. २०१९ मध्ये एकदा माझ्या मैत्रिणीचा कॉल आला की तुझी ती मैत्रीण होती ना ती आता एक लोकप्रिय मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. मग काय तर लगेचच गुगलवर सर्च केले आणि बघताक्षणी माझा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण मला माझी प्रिय बाल मैत्रीण परत मिळाली होती.
त्यानंतर मी तिच्या मावशीकडे जाऊन शहानिशा करून तिचा फोन नंबर मागितला तर त्यांनी तो आधी द्यायचा नाकारला. कारण ती आता अभिनेत्री होती आणि तिच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी मला तिचा फोन नंबर देण्याचे टाळले. मग मी त्यांना माझा नंबर पल्लवीला द्या अशी विनंती केली. बस मग मी रोज तिच्या फोनची वाट पाहू लागले. या दिवसात मी तिचे सर्व चित्रपट पाहून टाकले. क्लासमेट्स, 702 दीक्षित, शेंटीमेंटल, बस्ता, तू तिथे असावे, सविता दामोदर परांजपे अशा कितीतरी चित्रपटात तिने कौतुकास्पद काम केले आहे. किती पुढे निघून गेली. मला खूप अभिमान वाटत होता. ती आज एक लोकप्रिय मराठी चित्रपट अभिनेत्री होती..
आणि मग तो दिवस उजाडला. पल्लवीचा खरंच फोन आला. तासभर आमच्या मस्त गप्पा रंगल्या. सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तिलाही शाळा, आमच्या मैत्रिणी, आमचे घर, रस्ते सर्व काही आठवू लागले. तिच्यात काहीही बदल वाटत नव्हता. तीच ती २३ वर्षांपूर्वीची पल्लवी. मी पल्लवीला खूप मनापासून शुभेच्छा दिल्या. तिनेही माझ्या कुटुंबाची विचारपूस केली आणि आपण नेहमी संपर्कात राहू आणि लवकरच भेटू अशी इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली,"वृषाली, तूच तर माझी एकमेव बालमैत्रीण, तुला कसे काय विसरू मी!"
अशी ही मैत्रीची गोष्ट!