Join us

माझी आईच माझ्यासाठी सुपरसखी! आईने घडवलं आणि सावरलंही, तिच्यासारखी तीच!-लेकाचा आईला नमस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2025 17:37 IST

Womens Day Special Super sakhi : लोकमत सुपरसखी, महिलादिन विशेष स्पर्धा, बक्षिस विजेता लेख : एका लेकानं सांगितलेली आपल्या आईच्या जिद्दीची गोष्ट.

माझी अतिशय प्रिय आई.

- रचित राजेंद्र बोढारे

माझ्या आयुष्यातील 'ती' म्हणजे माझी 'आई'. चार काका, पाच आत्त्या, आजी आणि भावंडांमध्ये लहानाची मोठी झालेली माझी आई. सर्व भावंडांमध्ये सर्वात हुशार असणारी माझी आई. अतिशय छोट्या खेडेगावात (हरसुल ता. चांदवड) जन्माला आली. माझी आई, शेती काम, घरकाम तसेच गुरे सांभाळणे, यासारखी कामे करत शाळा शिकली. कुठलाही अतिरिक्त शिकवणी न लावता मुबलक वह्या, पुस्तके नसतांना दहावीच्या वर्गात तिसरी तर बारावीला तालुक्यात पहिली आली. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत तिने आपले शिक्षण पूर्ण केले. बारावीनंतर वैजापुर येथे डी. एड्चे शिक्षण पुर्ण केले.

लग्नानंतर घराची सर्व जबाबदारी तिने अतिशय छान सांभाळली. माझ्या जन्मानंतर एकुलत्या एक मुलाची सांभाळण्याअभावी होणारी तारांबळ तिला बघविली नाही आणि  शेवटी नोकरी सोडली. बाबांचे परदेशात सतत दौरे असत त्यामुळे सगळं घर आईने तोलून धरलं.आईने माझ्यासाठी नोकरी सोडली खरी पण, नियतीने येथून पुढे तिची खरी कसोटी बघण्याचे ठरविले. बाबांना परदे‌शात असतांनांच एका असाध्य आजाराने ग्रासले. त्यांच्यावर घरी झोपून राहण्याची वेळ आली. बाबा आजारी घरी झोपून; मी लहान. शाळा चालू. खूप वाईट परिस्थिती ओढवली. त्यातच बाबांची कंपनी बंद पडली. नोकरी गेली, दुसरी मिळेना. परंतु, आई डगमगली नाही. मोठ्या धिटाईने ती उभी राहीली. सकाळी दोन तास रात्री दोन तास अशी ती बाबांची रोज सेवा करून, मला शाळेत नेणे आणणे करत तिने सारे घर सावरले.

पुढे बाबांनी नवीन छोटासा कारखाना सुरु केला. तो स्थिर होतो कोठे नाही तर लगेचच कोरोना नावाचा राक्षस समोर उभा ठाकला. कारखान्यात एकही कामगार येत नसल्याने आई स्वतः दररोज बाबांबरोबर काम करू लागली. संपूर्ण कोविडचा काळ ती बाबांबरोबर उभी राहिली. माझेही तेव्हा बारावीचे वर्ष होते. बारावी म्हटल्यावर अतिशय महत्त्वाचे वर्ष. आईने मला शालेय जीवनात कधीही कोणतीही अतिरिक्त शिकवण लावण्याची वेळ येऊ दिली नाही. अगदी लहानपणापासून तिने मला स्वतः खूप छान शिकवणी दिली. आज मी एक आयआयटी इंजिनिअर असून स्वतःच्या पायावर उभा आहे. तसेच एक स्वतःचा कारखाना ही चालवतो आहे.

माझ्या आईने माझ्यावर इतके छान संस्कार केले की मला आजपर्यंत कशाचेही व्यसन नाही. हे सारं करु माझी आई गेली २० वर्षे स्वत:चा व्यवसाय सांभाळते आहे. संपूर्ण भारतभर स्वतःचा माल पोहचवतेय. कुटुं‌बासाठी नेहमी खचता खाणारी, हाल अपेष्टा सहन करणारी माझी आई सर्वांनी पाहिली पण आतल्याआत नेहमी रडणारी, न खचता, न तुटता कुटूंबासाठी नेहमी खंबीर उभी राहणारी माझी 'सुपर आई'फक्त मीच पाहिली. अशी ही आमची त्रिकोणी कुटुंबाची ढाल, सुपर आई म्हणजे सौ. राजश्री राजेंद्र बोढारे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीमहिला दिन २०२५