Lokmat Sakhi >Inspirational > आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांचा ध्यास घेत ती वयाच्या १८ व्या वर्षी बनली सीईओ! चले तारों से आगे..

आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांचा ध्यास घेत ती वयाच्या १८ व्या वर्षी बनली सीईओ! चले तारों से आगे..

लहानपणी पाहिलेलं ताऱ्यांनी सजलेलं आकाश जगण्याचं ध्येय ठरतं आणि त्यातून सुरु होते वाटचाल..श्वेता कुलकर्णी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2025 15:26 IST2025-03-08T15:16:10+5:302025-03-08T15:26:02+5:30

लहानपणी पाहिलेलं ताऱ्यांनी सजलेलं आकाश जगण्याचं ध्येय ठरतं आणि त्यातून सुरु होते वाटचाल..श्वेता कुलकर्णी.

women's day special : story of a young 18 year old astrologer, pune, shweta kulkarni | आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांचा ध्यास घेत ती वयाच्या १८ व्या वर्षी बनली सीईओ! चले तारों से आगे..

आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांचा ध्यास घेत ती वयाच्या १८ व्या वर्षी बनली सीईओ! चले तारों से आगे..

स्नेहल बनसोडे शेलुडकर

लहानपणीपासून तिला ग्रह ताऱ्यांची, खगोलशास्त्राची आवड. प्रोत्साहन आणि पाठिंबा देणारे आई वडील. अक्षरनंदनसारखी प्रयोगशील शाळा. आपणही अंतराळयानात बसून मिशनवर जावं आणि अंतराळातून भारत कसा दिसतो हे विचारलं तर राकेश शर्मांसारखंच उत्तर द्यावं- सारे जहां से अच्छा! ही तिची लाडकी फॅन्टसी. ही मुलगी अभ्यास करत, वाचत, लिहित, अनुभव घेत पुढे गेली आणि वय वर्ष

फक्त असताना तिने स्वत:ची कंपनी काढली. ती त्या कंपनीची सीईओ झाली. ती कंपनीसुद्धा साधीसुधी नाही, तर खगोलशास्त्राला वाहिलेली जगातली पहिली ई लर्निंग कंपनी.- AstronEra . आणि त्या तरुणीचंं नाव आहे श्वेता कुलकर्णी.

श्वेता कुलकर्णीचे वडील आयएएस अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी तर आई राजश्री कुलकर्णी पर्यावरणपूरक स्वच्छता उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीच्या संस्थापक—सहसंचालक. वडिलांच्या शासकीय नोकरीमुळे श्वेताची बालपणीची दहा वर्षं विदर्भात- प्रामुख्याने अमरावतीत गेली. नंतर पुण्यात आल्यावर अक्षरनंदनसारख्या मुलांच्या उपजत गुणांना प्राधान्य देणाऱ्या प्रयोगशील शाळेत तिच्या पालकांनी तिला घातलं.


 

श्वेता सांगते, “आई वडील एक्सप्लोअर ॲण्ड एक्सिपिरिअन्स या तत्त्वावर विश्वास ठेवणारे असल्याने बालपण खूप समृद्ध गेलं. वाचन, खेळ, जंगलनिरीक्षण आणि माझा नैसर्गिक कल ज्याकडे होता ते अवकाश निरिक्षण असं सगळं भरपूर करायला मिळालं. ड़ॉ. जयंत नारळीकरांची पुस्तकं, स्टार गेझिंग कॅम्प्स या सगळ्यातून मला बेसिक राशी नक्षत्रं ग्रह ओळखता येऊ लागले. १६ व्या वाढदिवसाच्या वेळी मी आई बाबांना टेलिस्कोप गिफ्ट करण्याचा हट्ट धरला. आई बाबांनी तो विचारांती पुरवला.  माझा पहिला टेलिस्कोप- ज्याचं नाव मी ‘ब्लॅक ब्यूटी’ ठेवलं होतं तो माझ्या आयुष्यात आला. मी रात्र रात्र टेलिस्कोपमधून अवकाश निरिक्षण करत बसायचे. टेलिस्कोप मिळाल्यानंतर महिनाभराच्या आतच खग्रास चंद्रग्रहण होतं. मग माझ्या उत्साहाला उधाण आलं आणि मित्र- मैत्रिणी, शेजारी- पाजारी नातेवाईक यांना मी माझ्या टेलिस्कोपमधून चंद्रग्रहण पाहायला येण्याचं निमंत्रण दिलं. त्यासाठी हाताने पोस्टर तयार करून सोसायटीत लावली. आणि माझ्या पहिल्याच इव्हेंटला आमच्या गच्चीत शंभराहून जास्त लोक ग्रहण पाहायला जमले. त्यांना मी टेलिस्कोपमधून ग्रहण तर दाखवलंच पण ग्रहण म्हणजे काय, ते कसं घडतं असं सगळं नीट समजावूनही सांगितलं. आपल्याला ही माहिती समजावून सांगायला आवडते आणि ती छान सांगता येते, हे माझं कौशल्य त्या दिवशी मी नोटीस केलं.”

यानंतर ती अवकाशदर्शनाचे कॅम्प्स नियमित आयोजित करायला लागली. दरम्यान तिची बारावी झाली, वाचन आणि खगोलशास्त्रातला रस वाढतच चालला होता. श्वेताला खगोलशास्त्रातूनच पदवी घ्यायची होती, पण भारतात तेव्हा अशी सोयच नव्हती. बारावीनंतर खगोलशास्त्रात काय करता येईल याचा शोध घेण्यासाठी तिने चक्क एक वर्षाची शैक्षणिक गॅप घेतली. भारत फिजिक्स/ मॅथेमॅटिक्स मध्ये बीएससी करून मग अस्ट्रोफिजिक्समध्ये मास्टर्स करायचं, एवढा एकच पर्याय उपलब्ध होता. त्याचदरम्यान तिला माहिती मिळाली ती युनायटेड किंगडममधल्या सेंट्रल लॅक्शर युनिव्हर्सिटीची. तिथं अस्ट्रॉनॉमीची पदवी तिला डिस्टन्स लर्निंगमधून मिळू शकणार होती, पण तो अभ्यासक्रम अतिशय खोलातला आणि ही पदवी मिळवण्यासाठी तब्बल आठ वर्षं लागणार होती. श्वेताने ही संधी अर्थातच सोडली नाही आणि ती हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करतेय. या वर्षी २०२५ साली तिचा हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण होईल.
२०१६ मध्येच मी एक यू ट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्यावर खगोलशास्त्रातल्या बेसिक प्रश्नांची उत्तरं देणारे छोटे छोटे व्हिडिओ बनवायला लागलो. How to buy my first Telescope? Where do we stand in the Universe? अश्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी व्हिडिओ तयार करत होते. यात स्क्रिप्ट लिहिणं, कॅमेरा सेट करणं, घरीच टेलिप्रॉम्प्टर तयार करणं, कॅमेऱ्यावर बोलणं, एडिटिंग अशी सगळी कामं मी स्वत:च करायचे असं श्वेता सांगते.

“दरम्यान 2016 मध्येच यूकेमध्ये एका अस्ट्रॉनॉमिकल यूथ कॅम्पसाठी माझी निवड झाली होती, तेव्हा मी तिथे गेले असता, तिथे सहभागी होणाऱ्यांपैकी अनेकांनी माझे व्हिडिओज ऑलरेडी पाहिले होते, हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. त्यांनीच मला सुचवलं की नुसती माहिती देण्यापेक्षा UDEMI सारख्या पोर्टलवर अस्ट्रॉनॉमीशी संबंधित काही ऑनलाईन कोर्सेस सुरू कर, ते जास्त आवडेल. याचनंतर भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अन्ड टेक्नॉलॉजी कडून फंडिंग मिळालं- अस्टऑनॉमी फॉर द बिगिनर्स या नावाने ऑनलाईन कोर्स बनवायला सुरूवात केली आणि परत आल्यावर UDEMI वर मी कोर्सेस अपलोड करणं सुरू केलं, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ते पाहून आम्ही विचार केला की आपलं स्वत:चंच पोर्टल का बनवू नये? जे अस्ट्रॉनॉमीसाठी वन स्टॉप सोल्युशन असेल , खगोलशास्त्राशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरं जिथं सहज मिळतील. आणि मग त्यातून AstronEra SHS या स्वयंसेवी संस्थेची स्थापना मी 2018 साली केली. आधी फंडिंगचा विचारच केला नव्हता, सुरूवातीला स्वयंसेवी संस्था म्हणून काम करत असताना- शासनासोबतही काम केलं, त्याच्यातून काही पैसा उभा राहिलेला होता, तोच अस्ट्रॉन इरा कंपनी म्हणून चालू करताना गुंतवला. 2018 मध्ये Women start up प्रोग्राममध्ये भारतभरातील विज्ञान क्षेत्रात वेगळं काम करणाऱ्या शंभर महिलांमध्ये माझी निवड झाली. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता. नागपूर आणि बंगलोर आयआयएमने घेतलेल्या इनक्युबेशन कार्यक्रमात उद्योजकतेची पायाभरणी झाली आणि अस्ट्रॉनइरा प्रॉफिट मेकिंग कंपनी म्हणून उभी राहिली.”

याचदरम्यान श्वेताचा सेंट्रल लॅंक्शर युनिव्हर्सिटीतला पदवी कोर्स सुरू झाला होता, सोबत अस्ट्रॉनइरा पण चालूच होतं. खगोलशास्त्राचं आणि वैज्ञानिक विचारसरणीच्या प्रसाराचं श्वेताचं हे काम पाहून तिच्या युनिव्हर्सिटीतल्या तिच्या एका प्राध्यापिकेने रॉयल अस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, लंडनची फेलोशिप मिळवून देण्यासाठी शिफारस केली आणि श्वेताला अत्यंत मानाची ही फेलोशिप अतिशय लहान वयात मिळाली. श्वेताच्या अस्ट्रॉनइरा खगोलशास्त्रातील इ लर्निंग कंपनीच्या माध्यमातून आजवर, जगभरातील 120 देशातील 600 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन कोर्सस केले आहेत तर दहाहजार विद्यार्थ्यांनी श्वेता आणि टीमकडून अवकाशनिरिक्षणाचे प्रत्यक्ष ज्ञान घेतलेले आहे. 

श्वेता सांगते, “ मी स्टार गेझिंग करताना ज्याप्रमाणे ग्रीक मायथॉलॉजीच्या कथा सांगते, तश्याच भारतीय पुराणातल्या कथा पण सांगते. मृग नक्षत्र म्हणजे काय? हरणाचा आकार कसा दिसतो, त्याला व्याधाचा बाण कुठे लागलाय? त्याचं रक्त कुठे सांडलंय? तसंच ग्रीक कथातला ओरान द हंटर- त्याचे खांदे, डोकं कुठंय? कमरेचा पट्टा कुठंय? कुत्रा कुठंय हे ही सगळं मी सांगत असते. त्यामुळे ऐकणाऱ्यालाही मजा येते आणि भरपूर माहिती मिळते. आणि माझं निरिक्षण असं आहे की शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मुलांना या सगळ्या गोष्टींची खूप उत्सुकता असते. त्यांच्याकडून जास्त चांगले, जिज्ञासू प्रश्नही येतात. कोविडनंतरच्या काळात नाशिक- सटाणा भागातील आदिवासी मुलांना आम्ही टेलिस्कोप हाताळण्याचे, अवकाशदर्शनाचे जे धडे दिले त्यातून भविष्यात ही मुलं स्वत: स्टार गेझिंगचे कार्यक्रम आयोजित करू शकतील, अस्ट्रो गाईडस म्हणून काम करू शकतील. आदिवासी आणि ग्रामीण भागात लाईट पोल्युशन अत्यंत कमी असते. त्यामुळे तिथं ग्रह ताऱ्यांचं निरिक्षण जास्त चांगल्या प्रकारे करता येतं. शिवाय आदिवासींच्या आपापल्या अश्या ग्रह ताऱ्यांशी निगडित गोष्टी, लोककथा आहेत. त्याच्या दस्तावेजीकरणाचे आमचे कामही सध्या सुरू आहे.”
अशी ही अस्ट्रॉलॉजीची विद्यार्थिनी आणि खगोलशास्त्र लोकांपर्यंत पोहोचवण्याची पॅशन असलेली, अद्याप तिशीही न गाठलेल्या तरुणींची ताऱ्यांच्या शोधातली गोष्ट.

(पूर्व प्रसिध्दी -श्रेष्ठ महाराष्ट्र)
 

Web Title: women's day special : story of a young 18 year old astrologer, pune, shweta kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.