अझहर शेख
फूड डिलिव्हरी ॲप हे आता प्रत्येक हातातल्या प्रत्येक फोनपर्यंत पोहचले आहेत. ऑर्डर केली विविध ऑनलाइन ॲपवाले घरपोच पदार्थ आणून देतात. ते मुख्यत्वे पुरुषच असतात. काही मिनिटांत गाडी दामटत वेळ गाठत ऑर्डर पोहचवण्याचं काम एखादी महिलाही करते तेव्हा? आणि ती उच्चशिक्षित असून हा पर्याय निवडते तेव्हा? त्याचीच ही गोष्ट नाशिकच्या एका फूड डिलिव्हरी रायडर वूमनची गोष्ट!
सोपं नसतंच रायडर होणं मग तुम्ही हा निर्णय कसा घेतला असं विचारलं तर नाशिकच्या रुपाली इंद्रसिंग पाटील सांगतात, बीसीएची पदवी घेत उच्चशिक्षण घेतले; मात्र ‘बॉसगिरी’ची झंजट नको, म्हणून एसी कार्यालयाची नोकरी न पत्करतामी थेट दुचाकी हाती घेत ‘ऑनलाइन फूड डीलिव्हरी रायडर विमेन’ होणे पसंत केले. गेल्या दीड वर्षापासून शहरात महिला रायडर म्हणून ऑन रोड त्या दिसल्या की अनेक भुवया उंचावल्या जातात.
रुपाली पाटील यांचे पती हे सटाणा येथे एका खासगी बँकेत लिपिक म्हणून नोकरीला आहेत. त्यांना तीन वर्षांची एक मुलगीदेखील आहे. आई-वडिलांसह पतीचा पाठिंबा आहे म्हणून ऑनलाइन फूड डीलिव्हरीची कामं त्या करतात. दिवसभर मुलीचा सांभाळ त्यांचे आई-वडील करतात. दररोज सकाळी घरातील कामकाज आटोपून त्या फूड डीलिव्हरीची बॅग पाठीला अडकवतात अन् डोक्यावर हेल्मेट परिधान करीत आपल्या मोपेड दुचाकीच्या साथीने ‘ऑनलाइन’ होतात. दुपारी ‘लंच ब्रेक’ घेतल्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत त्यांची दुचाकी धावत असते. त्या सांगतात हे काम करताना ना कोणाला रिपोर्ट द्यावा लागतो, ना कोणाची कसलीही परवानगी घ्यावी लागते, ना सुटीसाठी कोणाला विचारण्याची गरज भासते. मुलगी दीड वर्षाची होती त्यामुळे तिलाही वेळ देणे गरजेचे होते, म्हणून हा ‘जॉब’ निवडला, असे त्या म्हणाल्या.
फूड डीलिव्हरी करताना आतापर्यंत चांगलाच अनुभव आला; मात्र, काही वेळा किरकोळ कारणावरून पुरुषांपेक्षा महिलांकडूनच अपमानास्पद वागणूक मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. केवळ ग्राहकच नाही, तर वेंडरदेखील महिला रायडर म्हणून सन्मानाची वागणूक देतात, असेही त्या आवर्जून सांगतात.या कामातूच स्वत:च्या पायावर उभे राहत मी माझी स्वत:ची नवी-कोरी मोपेड दुचाकी घेऊ शकले. तिच्या कर्जाचे हप्तेही मी यामुळे सुरळीत भरू शकते.
हा जॉब करताना मला आनंद वाटतो, असे सांगतानाच त्यांचा मोबाइल वाजतो अन् त्या म्हणतात ‘ऑर्डर’ पडली, मी निघते..