lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Inspirational > माधुरी दीक्षितच्या लेकाला जमलं, आपल्याला जमेल? हे दान करायला पैसे नाही, दानत हवी..

माधुरी दीक्षितच्या लेकाला जमलं, आपल्याला जमेल? हे दान करायला पैसे नाही, दानत हवी..

कॅन्सरसह जगणाऱ्या महिलांना आणि मुलांच्या आत्मविश्वासाचा बळी घेतात ते गळणारे केस! त्यांच्यासाठी विग मिळणं ही एक मोठी मदत ठरते. त्या मदतीसाठी आता अनेकजण केशदान करतात, त्या आगळ्या दानाची ही गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 05:05 PM2021-11-08T17:05:56+5:302021-11-08T17:09:41+5:30

कॅन्सरसह जगणाऱ्या महिलांना आणि मुलांच्या आत्मविश्वासाचा बळी घेतात ते गळणारे केस! त्यांच्यासाठी विग मिळणं ही एक मोठी मदत ठरते. त्या मदतीसाठी आता अनेकजण केशदान करतात, त्या आगळ्या दानाची ही गोष्ट.

Will you get what Madhuri Dixit's Leka got? It doesn't cost money to 'donate'. | माधुरी दीक्षितच्या लेकाला जमलं, आपल्याला जमेल? हे दान करायला पैसे नाही, दानत हवी..

माधुरी दीक्षितच्या लेकाला जमलं, आपल्याला जमेल? हे दान करायला पैसे नाही, दानत हवी..

Highlightsआता माधुरी दीक्षितच्या लेकाने हेअर डोनेशन केलं आहे म्हंटल्यावर तरी याविषयातली जनजागृती अधिक वाढावी..

माधुरी दीक्षितच्या लेकाची बातमी एव्हाना वाचलीच असेल तुम्ही. तिच्या लेकाने, रियानने दोन वर्षे केसच कापले नाहीत. उत्तम लांबसडक वाढवले आणि ते केस दान केले. कॅन्सर पेशण्टसाठी त्यानं हे हेअर डोनेशन केलं असं माधुरीने पोस्ट केलेला व्हीडिओ सांगतो. एवढ्या लहान वयात तिच्या मुलानं दाखवलेली ही सामाजिक जाणीव काैतुकास्पद आहेच. मात्र काय असतं हे हेअर डोनेशन, ते कॅन्सर पेशण्ट्साठी का महत्त्वाचं असतं?
खरं तर केस कापणं, उत्तम हेअरस्टाइल करणं हा तसा अत्यंत व्यक्तिगत मामला आहे. कुणाला लांब केस आवडतात, कुणाला नको वाटतो डोक्यावर केसांचा भार म्हणून मग केस लहान ठेवले जातात. बाकी केसांचं गळणं, आणि विरळ होणं, झाडूसारखे कोरडे होणं, त्यांना चमक नसणं हे सारे तर वैश्विक प्रश्न असल्यासारखे जिला तिला छळत असतात. त्यावर उपाय म्हणून अनेकदा लांब केस सरसकट कापून टाकले जातात. केस कापले की ते सरळ पार्लरच्या कचऱ्यात जातात.


मात्र आपले हे केस कुणासाठी तरी लाखमोलाची मदत ठरू शकतात, हे लक्षातही येत नाही. आता मात्र मुंबईसह देशभरात अशा अनेक संस्था आहेत ज्या ‘हेअर डोनेशन’च्या जनजागृतीसह विग तयार करण्याचं काम करतात आणि ते विग ते गरजू, गरीब, वंचित समाजातल्या कॅन्सर महिलांना मोफत देतात.
कॅन्सरचं निदान झाल्यानंतर सुरुवातीचा काळ कुणाही रुग्णासाठी अत्यंत अवघड असतो. त्यात किमोथेरपीत डोक्यावरचे केस जातात. पुरुषांचे केस थोडे वाढले तरी ते पुन्हा सहज वावरु लागतात, मात्र बायका डोक्यावरचं टक्कल घेऊन घराबाहेर पडायला कचरतात. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे कॅन्सरसह जगणाऱ्या  अनेकजणींना विगची आवश्यकता भासते. आर्थिक स्थिती उत्तम असेल तर बाजारातून आपल्या रंगरुपाला, आवडीला साजेसा विग सहज विकत घेता येऊ शकतो मात्र हातात पैसा नसेल तर विग घेणंही परवडत नाही. अशा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास स्तरातील महिलांना मोफत विग मिळावेत असा प्रयत्न कॅन्सर रुग्णांना मदत करणाऱ्या संस्था करत असतात आणि त्यासाठी त्यांना हवं असतं ते केशदान. अर्थात हेअर डोनेशन.
मात्र केस कापले आणि दान म्हणून देऊन टाकले, आपण काहीतरी ‘दिलं’ याचं समाधान कमावलं इतकं हे प्रकरण सोपं नाही. कारण एक विग बनवायचा तर साधारण 12 ते 15 इंच उत्तम प्रतीचे केस लागतात. आणि एकाच व्यक्तीच्या केसांपासून विग बनत नाही तर 4- 5 जणांचे केस एकत्र केले तर एक विग बनतो, तो ही साधारण 8 ते 12 इंच केसांचा असतो. भारतीय बायका सहसा लहान केस ठेवत नाहीत, निदान छोटी वेणी, पोनी घालता येइल इतपत म्हणजे किमान 12 इंच केसांचा तरी विग बनवणं आवश्यक असतं. त्यामुळे कमी उंचीचे, उत्तम प्रतीचे, ब्लिच, कलरींग न केलेले असे केसच उत्तम केशदान ठरू शकतात.
नैसर्गिक केसांची किंमत खूप जास्त असते. त्यामुळे गरीब रुग्णांना महागडे विग घेणं परवडत नाही. त्यांच्यासाठी काही संस्था हे हेअर डोनेशन आणि विग बनवण्याचं काम करतात.

२०१९ साली लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यावसायिक विग मेकर यतीन देशंपांडे यांनी सांगितले होते की, ते टाटा कॅन्सर रुग्णालयाशी सलग्न असलेल्या ‘वूमन्स कॅन्सर एनिशिटीव्ह’ या संस्थेमार्फत ते गरजू, दारिद्रय रेषेखालील महिलांना मोफत विग देतात.  हल्ली हेअर डोनेशन हा सुद्धा एक इव्हेण्ट होऊ लागला आहे. मात्र जे केस दान म्हणून मिळतात, त्याचं पुढे काय होतं, त्यातून किती विग बनले, ते कुणाला देण्यात आले, त्यांचा दर्जा काय असेही प्रश्न विचारायला हवेत. कॅन्सरसह जगणाऱ्या महिलांसाठी विग ही एक अत्यंत महत्वाची गरज आहे. पुरुषाच्या डोक्यावर थोडे केस वाढले तरी तो घराबाहेर पडतो, बायकांच्या डोक्यावर शेवटच्या किमोथेरपीनंतर 12 इंच केस यायला 15 ते 18 महिने लागतात. त्यामुळे त्यांना उत्तम विग मिळणं ही गरज आहे. मात्र आपल्याला केस कापायचेच आहेत, काहीतरी ब्लिच किंवा रिबाऊण्ड बिघडलं आहे म्हणून केस कापून टाकले आणि ते दान केले तर त्याचा काही उपयोग नाही. त्या कचऱ्याचा विगसाठी काहीही उपयोग होत नाही, त्यामुळे केशदान करायचंच असेल तर निगूतीनं केस वाढवून, उत्तम प्रतीचे 15 इंच केस तरी दान करायला हवेत!’
आपल्या डोक्यावरचे केस कुणाच्या तरी मदतीसाठी उपयोगी पडतात, आपण आपल्या शरीराचा भाग असलेलं काहीतरी चांगल्या भावनेनं देतो असं वाटणं हे खरंतर या ‘दानाचं’ मोल आहे.
केशदान-हेअर डोनेशन म्हणून आजची गरज आहे, मात्र ते देतानाही अधिक सजगपणो, विश्वासार्ह संस्थांनाच दिलेलं उत्तम!
आता माधुरी दीक्षितच्या लेकाने हेअर डोनेशन केलं आहे म्हंटल्यावर तरी याविषयातली जनजागृती अधिक वाढावी..

Web Title: Will you get what Madhuri Dixit's Leka got? It doesn't cost money to 'donate'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.