Lokmat Sakhi >Inspirational > ‘तिला’ काय कळणार पैशांचे व्यवहार, करायची लाखाचे बारा हजार; महिलांना असे टोमणे का मारले जातात?

‘तिला’ काय कळणार पैशांचे व्यवहार, करायची लाखाचे बारा हजार; महिलांना असे टोमणे का मारले जातात?

why people think that a women knows nothing about financial management? : independence day 2025 : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वत:ला विचारू, आपण आर्थिक स्वतंत्र आहोत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2025 17:51 IST2025-08-14T17:47:45+5:302025-08-14T17:51:38+5:30

why people think that a women knows nothing about financial management? : independence day 2025 : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वत:ला विचारू, आपण आर्थिक स्वतंत्र आहोत का?

why people think that a women knows nothing about financial management? | ‘तिला’ काय कळणार पैशांचे व्यवहार, करायची लाखाचे बारा हजार; महिलांना असे टोमणे का मारले जातात?

‘तिला’ काय कळणार पैशांचे व्यवहार, करायची लाखाचे बारा हजार; महिलांना असे टोमणे का मारले जातात?

अश्विनी बर्वे (मुक्त पत्रकार)

काळ बराच बदलला, आता महिला शिक्षण, व्यवसाय, नोकरीत नवनवीन उंची गाठताना दिसतात. काही उत्तम करिअर करतात, तर काहींचं हातावर पोट-रोजंदारीचं काम असंही टोकाचं चित्र आहेच. (why people think that a women knows nothing about financial management?)हातावर पोट असणाऱ्या अनेकींसाठी तर त्यांना मिळणारं उत्पन्न हे घरातले एकमेव उपजिविकेचं साधन आहे. काही घरात दोघे कमावतात. मात्र अनेकदा असं दिसतं की मिळवत्या महिलेचाही तिच्या मिळकतीवर अधिकार नसतो. म्हणजे तिला आर्थिक स्वातंत्र नसतं. घरासाठी खर्च करताना ती मागेपुढे बघत नाही. पण स्वतःसाठी, स्वतःच्या आवडीनिवडीसाठी खर्च करताना; मात्र तिच्या मनावर दडपण असतं. आपणच कमावलेला पैसा आपल्या निर्णयानं वापरायची हिंमत महिलाही करत नाही. अनेकींना वाटतं की मला काय कळतं त्यातलं, काही पैशाचा घोळ झाला तर? अशा प्रकारच्या दडपणामुळे मग ते जोडीदाराचे असो किंवा पालकांचे असो, त्यामुळे तिचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तसेच तिच्या निवडीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येतात आणि एखाद्या संकटाच्या काळात तिला असुरक्षित वाटू शकतं.


महिला कमवत असूनसुद्धा असं होतं त्याला अनेक कारणं आहेत. त्यांना काम करून पैसे कमवण्याचंं स्वातंत्र्य आहे; पण ते खर्च करण्याचं, त्या संदर्भात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य बहुतेक ठिकाणी नाही. स्त्री अविवाहित असो, विवाहित असो, विधवा असो, विभक्त असो किंवा अनाथ असो. आर्थिक स्वातंत्र्य ही तिच्यासाठी कमावण्याच्या अधिकारातून मिळणारी गोष्ट नाही. त्यासाठी तिला अनेकवेळा इतरांना पटवून द्यावे लागते. प्रसंगी खोटे बोलावे लागते.
काही ठिकाणी तर नको बाई जबाबदारी, पैशाचं काम आपलं चुकलं तर काय या भीतीतूनही महिला पैशाचे व्यवहार करत नाही. कारण त्यांना मनात हे खोलवर असतं की आर्थिक सत्ता हे बाईचं कामच नाही. मात्र आर्थिक निर्णय स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचं असतं, ते प्रत्येकीला मिळायला हवं.

आर्थिक निर्णय स्वातंत्र्य का महत्त्वाचं?
१. जेव्हा एखादी स्त्री स्वतःचे पैसे कमवते, बचत करते आणि आपल्या पैशाचे नियोजन स्वतः करते तेव्हा तिच्यात एक आत्मविश्वास आपोआप येतो. पण तिने कुठे आणि कशी बचत करायची, स्वतःच्या पैशाचे नियोजन कसे करायचे हे तिच्या हातात नसेल तर आर्थिक अवलंबित्व कमी होत नाही.
२. खरेतर कोणत्याही व्यक्तीला अर्थात पुरुषांनाही आर्थिक व्यवहार प्रसंगोपरत्वे शिकून घ्यावे लागतात. डिजिटल व्यवहारही माहिती करून घ्यावे लागतात. चुकलं तर काय असं ते म्हणत नाही. पण केवळ स्त्री आहे म्हणून तिला ते जमणार नाही असं कुणी म्हणणं, आणि बायकांनीही आपलं चुकलं तर काय म्हणून घाबरणं योग्य नाही. स्त्री आणि पुरुषांना व्यवहार शिक्षण घ्यावे लागतेच.
३. कोणतीही गोष्ट तुम्ही वारंवार केली तर ती सगळ्यांना जमू शकते. अनेक स्त्रिया जेव्हा बँकेचा फॉर्म, एखादी स्लिप, चेक भरताना घाबरतात किंवा त्यांना ते जमत नाही, जमणार असे म्हणतात. तेव्हा त्यांना घरच्यांची, वडील किंवा नवऱ्याची भीती वाटत असते. ती भीती टाळून त्यांच्या मदतीने आर्थिक व्यवहार ज्ञान कमवायलाच हवे.
४. आर्थिकदृष्ट्या सक्षम याचा अर्थ केवळ उत्पन्न मिळवणं असा होत नाही तर त्याबाबत येणारे नियोजन, निर्णयाचे स्वातंत्र्य हे सुद्धा येते. अशावेळी हातावर पोट असणाऱ्या अनेक स्त्रिया डोळ्यासमोर येतात. त्या अनेकवेळा आपल्या मैत्रिणीसोबत बँकेत जातात आणि इतरांच्या मदतीने स्लिप भरून घेतात, शिकतात व्यवहार. काही स्त्रिया या बचत गटात काम करतात आणि स्वतःचे पासबुक सांभाळतात. आपल्या व्यवसायाचे निर्णय स्वतःच्या हिमतीवर घेताना दिसतात. त्याउलट काही स्त्रिया स्वत:चं बँक अकाउंटही ऑपरेट करत नाहीत. त्यांचे व्यवहार त्यांचे नवरेच सांभाळतात.
५. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र स्त्री विशेषतः आई मुलांसाठी एक उत्तम उदाहरण ठरते. आर्थिकदृष्ट्या जागरूक असलेली, स्वतंत्र असलेली आई मुलांनाही बचत ते गुंतवणूक, पैशाची किंमत, जबाबदारी आणि स्वातंत्र्य सहज शिकवते. तिच्याकडे पाहून मुलं शिकतात. ही केवळ ‘पुरुषांची जबाबदारी’ नाही हे मुलांना कळते. अशा वातावरणात वाढलेली मुलं त्यांच्या भावी जोडीदाराच्या आर्थिक हक्कांचा विचार करण्याची जास्त शक्यता असते.
६. म्हणूनच स्त्रियांनी पैसे कमविण्यासाठी स्वतःसाठी आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळविणे आवश्यक आहेच. घरात समान आर्थिक स्वातंत्र्य आवश्यक आहे. महिला सामान्यतः त्यांच्या वेतन आणि अटीबद्दल वाटाघाटी करताना पुरुषांइतक्या स्पष्ट आणि ठाम नसतात. त्याचमुळे त्या स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्याबद्दल बऱ्याचवेळा निष्काळजीपणा दाखवतात. हे सारं बदललं पाहिजे.
७. यंदा स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्या आर्थिक स्वातंत्र्याचा, त्यासोबत येणारी जोखीम आणि जबाबदारी आत्मविश्वासानं शिकून घेण्याचा नक्की विचार करू.

मागे मागे का राहता?

आर्थिक विषयातलं मला काही कळत नाही, हे महिला स्वत:हूनच ठरवून टाकतात. एकीकडे देशाच्या अर्थमंत्र्यांपासून मोठमोठ्या कंपन्यात महिला मोठ्या पदांवर दिसतात दुसरीकडे साधं यूपीआय पेमेंट करताना, डिजिटल व्यवहार करताना अनेकजणी गांगरतात.
आर्थिकबाबतीत काहीच न बोलण्याच्या तिच्यावर असलेला परंपरेचा दबाव तिला तिच्या आर्थिक स्वातंत्र्यापासून रोखत असतो. खरंतर स्त्री उत्तम आर्थिक नियोजन करू शकते, रोजच्या जगण्यात करतही असते. पण बाहेर जाऊन व्यवहार करताना आपण चुकू ही भीती तिला अडवते, पण प्रत्येक माणूस अनुभवाने ते शिकत जातो. म्हणूनच स्त्रियांनी सुद्धा स्वतःचे आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य घेऊन अधिक सक्षम होण्याकडे वाटचाल करणे गरजेचे आहे.

ashwinibarve2001@gmail.com

Web Title: why people think that a women knows nothing about financial management?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.