Join us  

३१ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा, ८ वर्षे लेकराबाळांची भेट नाही, पण त्या म्हणतात मी लढणार, हरणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2023 6:28 PM

नोबेल पुरस्कार जाहीर झालेल्या नर्गिस मोहम्मदी यांच्या जिद्दीची गोष्ट

ठळक मुद्देतुरुंगात कोंडलेलं आयुष्यच त्यांच्या वाट्याला आलं आहे.

नर्गिस मोहम्मदी. इराणमधल्या आंदोलक. इराणमधील मानवी हक्क आणि स्त्रियांवरील अन्यायाविरुध्द इराण सरकारला खडे बोल सुनावणाऱ्या कार्यकर्त्या.  इराण सरकारने त्यांना वर्षानुवर्षं तुरुंगात डांबून ठेवलं. तुरुंगाच्या भिंतीआड त्यांच्या आयुष्याची ३१ वर्षं गेली. इराणमधल्या जुलमी राजवटीला उलथवून टाकण्यासाठी, लोकांना त्यांच्या नागरी आणि मानवी हक्कांबद्दल जागरुक करण्यासाठी त्यांनी आपलं करिअर, आपलं कुटुंब, आपलं जगणं सगळंच पणाला लावलं. आजही त्या तुरुंगातच आहेत. नुकताच त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला.  तुरुंगवास आणि वेदनादायी फटके यांना घाबरुन शांत बसण्याचा नर्गिस मोहम्मदी यांचा स्वभाव नाही. त्यांना १६ वर्षांंची जुळी मुलं ( मुलगा आणि मुलगी) आहेत. पण आपल्या मुलांशी फोनवर बोलून त्यांना वर्षं झालंय. गेल्या आठ वर्षांपासून नर्गिस  यांना आपल्या मुलांच्या डोक्यावरुन साधा मायेचा हातही फिरवता आलेला नाही. नर्गिस यांचे ६३ वर्षांचे पती ताघी रहमानी हे देखील लेखक आणि कार्यकर्ते आहेत. त्यांनीही १४ वर्षं तुरुंगात काढली आणि आता फ्रान्समध्ये आपल्या जुळ्या मुलांसमवेत ते निर्वासित म्हणून राहात आहेत.

(Image : google)

आण्विक भौतिकशास्रातून पदवी मिळवलेल्या नर्गिस इंजिनिअर झाल्या. काॅलेजमध्ये असताना त्यांनी विद्यार्थीनींचं संघटन करुन त्यांना नागरी हक्कांबाबत जागरुक केलं. शिक्षा म्हणून ३१ वर्षं तुरुंगात राहिल्या. २०२३ मध्येही त्यांच्यावर आणखी ३ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या शिक्षेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  जवळपास अख्खी हयात तुरुंगात गेली.नर्गिस  यांच्या मुलाला आपली आई जे काम करतेय त्याचा अभिमान वाटतो. पण मुलगी कियाना मात्र आईचा सहवासच नसल्याने वैतागली आहे. तुम्हाला जर आयुष्यभर चळवळ करायची होती तर मग तुम्ही मुलांना जन्म का दिला अशी तिची तक्रार आहे. वाढदिवस, सुट्या आणि सणाच्या दिवशी मुलांना आपल्या जवळ आपली आई नाही याचा जास्त त्रास होतो. रहमानी यांनाही नर्गिस यांनी कुटुंबासोबत राहायला हवं असं मनापासून वाटतं. पण तुरुंगात कोंडलेलं आयुष्यच त्यांच्या वाट्याला आलं आहे.

टॅग्स :इराणप्रेरणादायक गोष्टीमहिला