lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Inspirational > ‘जे झाले ती एक वॉर्निंग बेल समजायची आणि..!’ -कॅन्सरसह जगताना एक आई जेव्हा खंबीर होते.

‘जे झाले ती एक वॉर्निंग बेल समजायची आणि..!’ -कॅन्सरसह जगताना एक आई जेव्हा खंबीर होते.

उमेद सपोर्ट ग्रुप : कॅन्सरसह जगणाऱ्या एका आईच्या हिमतीची आणि जिद्दीची गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 04:05 PM2023-06-14T16:05:13+5:302023-11-07T15:02:31+5:30

उमेद सपोर्ट ग्रुप : कॅन्सरसह जगणाऱ्या एका आईच्या हिमतीची आणि जिद्दीची गोष्ट.

story of cancer survivor Mother, her fight & will power, cancer patients support group umed based at nashik | ‘जे झाले ती एक वॉर्निंग बेल समजायची आणि..!’ -कॅन्सरसह जगताना एक आई जेव्हा खंबीर होते.

‘जे झाले ती एक वॉर्निंग बेल समजायची आणि..!’ -कॅन्सरसह जगताना एक आई जेव्हा खंबीर होते.

-एक कॅन्सर पेशंट
नमस्कार. मी एक कॅन्सर पेशंट, मध्यमवर्गीय त्रिकोणी कुटुंब. सरकारी नोकरी, मुलाचा अभ्यास, घरातल्या जबाबदाऱ्या पार करणे. नुकतीच चाळीशी पार केलेली. तशी “हेल्थ कॉन्शस”. रोज सकाळी वेळ काढून फिरायला देखील जाणारी. पण अचानक आयुष्यात वादळ आलं. घरातलं वातावरण बदललं. 
मुलगा शिक्षणासाठी बाहेरगावी गेला त्याची सगळी तयारी केली त्याला सोडवून आले. आईची ट्रीटमेंट मानवता हॉस्पिटलमध्ये घेण्यासाठी तिला डे केअर मध्ये ऍडमिट केलं आणि शरीरात एक दोन महिन्यापासून जाणवणारा बदल काही वेगळा तर नाही ना हे डॉक्टर नगरकर यांना कन्सल्ट करायला एकटीच गेले. चेकिंग झाल्यावर त्यांनी सोनो मेमोग्राफी, त्यानंतर त्याच दिवशी बायप्सी, आणि इतर चाचण्या लगेच केल्या. ते झाल्यावर आईचा डिस्चार्ज घेऊन तिच्या इतर मेडिकल फॉर्मलिटी पूर्ण करून आई-वडिलांना कारमधून घरी घेऊन आले. माझ्या टेस्टचा रिपोर्ट काही वेगळा येईल असे वाटलेच नाही. 

माझे मिस्टर बाहेरगावी होते. त्यांना फक्त सांगितले अशा टेस्ट केल्या आहेत. तीन दिवसांनी हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट घेण्यासाठी गेले. आईची ट्रीटमेंट मानवतामध्येच चार वर्षापासून चालू असल्यामुळे तेथील डॉक्टर, स्टाफ सर्वांचा चांगला परिचय होता. रिपोर्ट काय आहे हे विचारण्यासाठी काटे मॅडमकडे गेले. त्यांचा माझा चांगला परिचय होता त्यांनी शांततेने माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. मी एकदम हादरून गेले. कसे व्यक्त व्हावे हेच समजेना. माझ्याबरोबर माझे वडील ज्यांची नुकतीच बायपास झाली होती ते होते. 
मॅडमनी मला तेव्हा जे सांगितले ते मला अजून लक्षात आहे, “तुला आता स्ट्रॉंग - खंबीर व्हावे लागेल...”.
त्यानंतर मिस्टरांना बोलवून घेतले. दुसऱ्या दिवशी पेट स्कॅन झाले इतर टेस्ट झाल्या ट्रीटमेंट प्लॅन झाली. आठ केमो, ऑपरेशननंतर रेडिएशन असा प्लान झाला. पहिल्या केमोला माझ्याबरोबर घरातले सगळेजण येण्यास तयार होते. बहिणदेखील बाहेरगाहून आली होती. सासूबाई, सासरे, मिस्टर, बहीण आणि मी केमोसाठी हजर. प्रचंड मानसिक टेन्शन. डे केअर मध्ये केमो सुरू झाली तेव्हा मला भेटायला कॅन्सरची ट्रीटमेंट घेतलेल्या सई बांदेकर, वंदना अत्रे आल्या. त्यांच्याशी बोलून खूप हलके वाटले. माझे केस जाणार हे डॉक्टरानी सांगितले होते. हे सांगणं वेगळं, पण ज्यांनी हे अनुभवलं ते त्यांनी मला अशा पद्धतीने सांगितले, त्यांचे केस नसतानाचे फोटो दाखवले, हे मला खूप महत्त्वाचे वाटते त्यामुळे मनाची तयारी झाली. दुसऱ्या केमोनंतर केस जास्त जायला लागले आणि नंतर ते सगळे गेले पण त्यांचे फोटो किंवा त्या माझ्याशी ज्वर पद्धतीने व्यक्त झाल्या ते फार महत्त्वाचे आहे. ही एक माझी फेज आहे त्यातून मलाच बाहेर पडायचं आहे हे मी माझ्या मनाशी पक्के ठरवले.
केमोमुळे होणारे त्रास, त्यामुळे मन कितीतरी वेळा हळवं झाले, त्यावेळी माझे मिस्टर, आई-वडील, सासू-सासरे, माझी बहिण यांनी खूप सावरलं. पहिल्या दोन केमोपर्यंत मुलाला मी आजारी आहे हे माहिती नव्हतं. नंतर त्याला सांगितल्यावरही ही गोष्ट त्यांनी धीराने तर घेतलीच पण माझ्याशी फोनवर बोलून तो मला धीर द्यायचा. केमो घेताना शारीरिक, मानसिक त्रास होतो तेव्हा एच. सी. जी. मानवता हॉस्पिटल मधील डॉक्टर श्रुती काटे मॅडम, सायकॉलॉजीस्ट श्वेता मॅडम यांनी काऊन्सिलिंग केले. आठ केमो झाल्यावर डॉक्टर राज नगरकर यांनी उत्तम सर्जरी केली नंतर वीस रेडीएशन पूर्ण केले. हा सगळा प्रवास सात ते आठ महिन्यांचा होता पण मला खूप काही शिकवून गेला, जसं, नोकरी, मुलगा, घर इतर जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःला प्रथम प्राधान्य, महत्त्व दिले पाहिजे. आपलं शरीर काय म्हणते आहे हे ऐकलं पाहिजे. ट्रीटमेंट चालू असताना आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. योग्य आहार, विहार, श्वसन, प्राणायाम, आध्यात्मिक गोष्टी जसे नामस्मरण त्याच्यामुळे ही ट्रीटमेंट घेण्यास मदत होते. प्राप्त परिस्थिती स्वीकारून आहे त्या परिस्थितीला धीराने तोंड देण्यासाठी एच. सी. जी. मानवता हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स, नर्स, इतर सर्व स्टाफ यांची मोलाची मदत झाली आणि होत आहे.
आहे तो क्षण आनंदाने जगता आला पाहिजे. फार मागचा पुढचा भूतकाळ -भविष्यकाळ याचा विचार न करता वर्तमानात सकारात्मक विचार केला की आजार व उपचाराचे साईड इफेक्ट यांची दाहकता कमी होते. कोणी अमर पट्टा घेऊन आलेलं नसतं. सगळ्यांना जायचेच आहे, तर झाले ते बरे झाले ही वॉर्निंग बेल समजायची ज्या गोष्टी करायच्या आहेत शिकायच्या आहेत त्या करायला आता वेळ आहे. माझ्यासारखे किंवा माझ्यापेक्षा जास्त आजारी आहेत त्यांना उमेदच्या माध्यमातून खूप मदत होत आहे. डे केअर मध्ये चित्रकला, संगीत, गाणे यांच्या ॲक्टिव्हिटी पेशंटसाठी ‘उमेद’च्या माध्यमातून राबवल्या जातात त्यामुळे पेशंटच्या मनातील उत्तम जीवन जगण्याची उमेद जागी ठेवली जाते. एच. सी. जी. मानवता कॅन्सर सेंटर मध्ये उमेद च्या माध्यमातून पेशंटला म्युझिक थेरपी डान्स थेरपी याचा उपयोग होत आहे. पेशंटचं मन यामुळे शांत होतं आणि सर्व त्रासाची दाहकता कमी होते. ‘उमेद’ च्या माध्यमातून आयुर्मान वाढवणे बरोबरच पेशंट आनंदी कसा राहील याकडे लक्ष दिले जाते.

अधिक माहिती आणि संपर्क
HCG मानवता कॅन्सर सेंटर् उमेद पेशंट सपोर्ट ग्रुप
umed.warriors@gmail.com
फोन- 9145500381

Web Title: story of cancer survivor Mother, her fight & will power, cancer patients support group umed based at nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.