‘गो चेस दॅट ड्रिम!’ असं म्हणत आनंद महिंद्रा यानी एक्सवर तिच्याविषयी एक पोस्ट लिहिली आणि त्यात मान्यही केलं की ही मुलगी मला आजवर माहिती नव्हती! त्यांनाच काय अनेकांना माहिती नव्हती त्यामुळे माध्यमांसह कोण ‘ती’ असं म्हणत तिच्याविषयी माहिती गुगल करु लागले आणि त्यातून चर्चेत आला एक तरुण चेहरा. तारा प्रसाद तिचं नाव.ही मुलगी स्केटर आहे. ऑनलाइन जाऊन पाहिलं तर तिचे स्केटिंग करतानाचे अनेक व्हिडिओ दिसतील, इतके सुंदर की डोळ्याचं पारणं फिटावं. ती भारतीय स्केटिंग चॅम्पिअन तर आहेच. आणि सध्या ती विण्टर ऑलिम्पिक २०२६ची तयारी जोमाने करते आहे.
मात्र ज्यामुळे त्या मुलीची इतकी चर्चा झाली ते कारण याहून बरंच वेगळं आहे.तारा जन्मली अमेरिकेत. जन्माने ती अमेरिकन नागरिक होती. तिचे तमीळ आईबाबा तिकडे स्थायीक झाले होते. तिची आई कविता रामस्वामी या अडथळयांची शर्यत या खेळात नॅशनल चॅम्पिअन हाेत्या. पुढे लग्न करुन त्या अमेरिकेत गेल्या. तारा जेमतेम ७ वर्षांची होती तेव्हापासून उत्तम स्केटिंग करु लागली. २०१९ म्हणजेच १९ वर्षांची होता होता तिने अनेक अमेरिकन स्केटिंग स्पर्धा गाजवल्या. भारतात आपल्या आजोळी ती येऊनजाऊन होतीच.
आणि त्याचकाळात या मुलीने ठरवलं की मला स्केटिंगमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करायचं आहे. भारतीय देशांतर्गत स्पर्धांतही खेळायचं आहे.आणि तिने एक मोठा निर्णय घेतला. तिने अमेरिकन नागरिकत्व साेडून दिलं.ज्या अमेरिकन नागरिकत्वासाठी जगभरातली माणसं जीव काढतात, तेच नागरिकत्व जन्माने मिळालेलं असताना आणि त्याअनुषंगिक फायदे अनगिनत असताना या तरुण मुलीने ठरवलं जिथं आपली मुळं त्या देशात रहायचं, त्या देशाचं प्रतिनिधित्व करायचं!तेच ती करते आहे.
राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पिअनशिप तिने आजवर तीनदा जिंकली आहे.मात्र २०२२ ते २०२३ या काळानं तिची परीक्षा पाहिली. तिला घोट्याला दचखापत झाली, पाठीच्या दुखापतीने छळलं. मात्र आता २०२५ मध्ये ती कमबॅक करते आहे. २०२६च्या विंटर ऑलिम्पिकची तयारी जोरात आहे..भविष्यात तारा प्रसाद हे नाव नव्या यशाचं नाव म्हणून चर्चेत यावं अशी आशा आहे.