Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Inspirational > मुलींनी कशाला शिकायला हवं? असं म्हणणाऱ्या गावात जेव्हा मुली शिकू लागतात..

मुलींनी कशाला शिकायला हवं? असं म्हणणाऱ्या गावात जेव्हा मुली शिकू लागतात..

See Story about girls education, Education is very important for women : मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या ‘एज्युकेट गर्ल्स’ या संस्थेला यंदाचा रेमन मॅगॅसेसे पुरस्कार जाहीर झाला, त्यानिमित्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2025 15:31 IST2025-09-17T15:30:30+5:302025-09-17T15:31:39+5:30

See Story about girls education, Education is very important for women : मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या ‘एज्युकेट गर्ल्स’ या संस्थेला यंदाचा रेमन मॅगॅसेसे पुरस्कार जाहीर झाला, त्यानिमित्त...

See Story about girls education, Education is very important for women | मुलींनी कशाला शिकायला हवं? असं म्हणणाऱ्या गावात जेव्हा मुली शिकू लागतात..

मुलींनी कशाला शिकायला हवं? असं म्हणणाऱ्या गावात जेव्हा मुली शिकू लागतात..

प्रियदर्शिनी हिंगे ( मुक्त पत्रकार)

मुलींसाठी शिक्षण का महत्त्वाचे? हा प्रश्न जुना असला तरी त्याची उत्तरं अजूनही द्यावी लागतातच. आजही मुलींचं शिक्षण हा विषय काळजीचा आहेच आणि त्यासाठी काम करणंही गरजेचं आहे. (See Story about girls education, Education is very important for women )अशाच एका कामाचा गौरव आणि भारतासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे ‘एज्युकेट गर्ल्स’ या स्वयंसेवी संस्थेला २०२५ म्हणजे यंदाचाच आशियातील सर्वोच्च मानला जाणारा रेमन मॅगॅसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा सन्मान केवळ एका संस्थेचा नाही, तर शिक्षणाच्या अधिकारासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येक ग्रामीण मुलीचा आहे. शिक्षण म्हणजे मुलींना स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार असंच या पुरस्कारासंदर्भात म्हणायला हवं.
सन २००७मध्ये सफिना हुसेन यांनी या संस्थेची स्थापना केली. अगदी छोट्या पातळीवर सुरुवात झाली, तीही राजस्थानातील पाळी जिल्ह्यातील काही गावांत. गेल्या काही वर्षांत या कामाने एका चळवळीचं रुप घेतलं. आज हजारो गावांत शिक्षणाचा ध्यास या संस्थेनं पोहचवला आहे. सुरुवातीला उद्दिष्ट सोपं होतं. शाळेतून बाहेर गेलेल्या म्हणजेच शाळा सोडलेल्या, शाळाबाह्य मुलींना पुन्हा वर्गात आणणं. पण, मुलींना शाळेत आणणं हे काम सोपं नव्हतं, त्यात जसं काम वाढत गेलं, तसं त्यांची गरजही लक्षात आली आणि क्षेत्र विस्तारू लागलं.
आज ‘एज्युकेट गर्ल्स’ने ३० हजारांहून अधिक गावांमध्ये पाऊल टाकलं आहे. या उपक्रमातून तब्बल दोन दशलक्ष मुली शाळेत परतल्या आहेत. इतकंच नव्हे, तर नियमित उपस्थिती आणि शिकणं यांवरही संस्थेनं लक्ष केंद्रित केलं आहे. शाळेत आलेल्या मुलींचं शिक्षण पुन्हा सुटू नये म्हणूनही प्रयत्न केले जातात. ग्रामीण भागातील पालकांशी संवाद साधून त्यांची मानसिकता बदलणं, मुलींना शिक्षणाचं महत्त्व समजावून देणं आणि शाळेतील सोयी-सुविधांबाबत स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधणं, या तिन्ही पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले.
या कामाला मोठं बळ दिलं ते ‘टीम बाळिका’ या स्थानिक स्वयंसेवकांनी. आज २० हजारांहून अधिक तरुण या उपक्रमात सहभागी आहेत. प्रत्येक स्वयंसेवक आपल्या गावात घरोघरी जाऊन शाळेबाहेर असलेल्या मुली शोधतो, त्यांच्या कुटुंबांशी संवाद साधतो. मुली शाळेत दाखल होईपर्यंत पाठपुरावा करतो. समाजातील लोकशक्तीवर आधारलेलं हे मॉडेल संस्थेच्या यशामागचं खरं गुपीत आहे.

विद्या आणि प्रगती
संस्थेचे दोन प्रमुख कार्यक्रम आहेत. विद्या आणि प्रगती.
त्यात विद्या उपक्रमांतर्गत ६ ते १४ वर्षांच्या मुलींचा शाळेत पुनःप्रवेश आणि नियमित उपस्थिती सुनिश्चित केली जाते.
तर ‘प्रगती’ कार्यक्रमांतर्गत १५ ते २९ वयोगटातील तरुणींना ‘सेकंड चान्स’ ओपन स्कुलिंगची संधी दिली जाते. यामुळे अनेक मुलींना दहावी–बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करता आलं. त्यापैकी काहींनी तर पुढे उच्च शिक्षण व कौशल्याधारित रोजगाराच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
तसेच एज्युकेट गर्ल्सने शिक्षण क्षेत्रात जगातील पहिला ‘डेव्हलपमेंट इम्पॅक्ट बाँड’ राबवला. या पद्धतीत निधी थेट शैक्षणिक निकालांशी जोडला गेला. म्हणजे मुलींचा प्रवेश, उपस्थिती आणि शिकण्याचे मोजमाप साध्य झाले की, निधी दिला जायचा. या प्रयोगाने निधीचा वापर अधिक परिणामकारक पद्धतीने होऊ शकतो हे सिद्ध झालं.

मुलीचं शिक्षण म्हणजे पिढीचे शिक्षण

पुरस्कार जाहीर करताना मॅगॅसेसे समितीने म्हटलं आहे की, ‘एज्युकेट गर्ल्स ही केवळ शिक्षण देणारी संस्था नाही तर ती समाजाच्या विचारसरणीत बदल घडवणारी चळवळ आहे.”
हा सन्मान स्वीकारताना संस्थापक सफिना हुसेन म्हणाल्या, एका मुलीचं शिक्षण म्हणजे एका पिढीचं भवितव्य घडवणं! हा पुरस्कार आमच्या सर्व स्वयंसेवक, पालक आणि गावकऱ्यांचा आहे. भारताच्या ग्रामीण भागात मुलींचं शिक्षण थांबण्यामागे गरीबी, घरगुती जबाबदाऱ्या, लवकर लग्न, प्रवास–सुरक्षा अशा अनेक कारणांचा अडथळा असतो. पण, एकदा मुलगी शिकली की, तिचं आयुष्यच नव्हे तर संपूर्ण कुटुंब बदलतं. शिक्षित मुलगी आरोग्याची काळजी घेते, विवेकी आर्थिक निर्णय घेते, मुलांना शिकवते आणि समाजात आपलं स्थान निर्माण करते. त्यामुळे मुलींचं शिक्षण हे केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नाही तर सामाजिक न्याय आणि आर्थिक विकासाचं मूळ आहे.

मुलगी शिकली तर...

‘एज्युकेट गर्ल्स’ने पुढील काही वर्षांत आणखी काही दशलक्ष मुलींना शाळेत आणण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा व्यवस्थापन समित्या, तसेच उद्योग-समाज जबाबदारी यांचा आधार घेऊन काम पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. शाळांमधील सोयीसुविधा, डिजिटल साधनं, कौशल्य प्रशिक्षण आणि करिअर मार्गदर्शन या नवीन पातळ्यांवरही संस्था लक्ष केंद्रित करत आहे.
‘एज्युकेट गर्ल्स’चा प्रवास दाखवतो की, बदल घडवण्यासाठी सरकारपुरता प्रयत्न पुरेसा नसतो; समाजाची साथ आणि लोकशक्तीची ताकद आवश्यक असते. या संस्थेच्या कार्यामुळे लाखो मुलींचं जीवन बदललं, कुटुंबं उभी राहिली आणि गावोगावी जागृती पसरली.
मॅगॅसेसे पुरस्काराने हा प्रवास जागतिक पातळीवर अधोरेखित केला आहे. मात्र, खऱ्या अर्थानं हा सन्मान तेव्हा सार्थकी लागेल जेव्हा भारतातील प्रत्येक मुलगी शाळेत पोहोचेल आणि शिक्षण पूर्ण करून स्वतःचं भविष्य घडवेल. मुलगी शिकली तर केवळ कुटुंबच नव्हे तर संपूर्ण समाज उजळतो, हे ‘एज्युकेट गर्ल्स’ने कृतीतून दाखवून दिलं आहे.

Web Title: See Story about girls education, Education is very important for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.