Join us  

बस कंडक्टरची लेक ऑलिम्पिक खेळते, पंतप्रधानही पूर्ण करतात तिला दिलेलं वचन! मेरठच्या प्रियंकाची गोष्ट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2022 5:45 PM

एक यशस्वी खेळाडू होण्यासाठी घरची श्रीमंती असणं, भौतिक साधनांची रेलचेल असणं गरजेचं नसतं हेच प्रियंकानं आर्थिक अडचणींचा सामना करत स्पर्धेत यशस्वी होऊन सिध्द केलं आहे. प्रियंकाच्या कामगिरीतून खेळाडू होण्याचं स्वप्न पाहाणाऱ्या युवांना प्रेरणा मिळावी म्हणून पंतप्रधानांनी प्रियंकाचं उदाहरण दिलं होतं. हिच ती प्रियंका.

ठळक मुद्दे2020 टोक्यो ऑलिम्पिकमधे रेस वाॅकिंगमधे पात्र झालेली प्रियंका 17 व्या क्रमांकावर आली.2017 मधे प्रियंकानं इंडियन रेस वाॅकिंग ओपन चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली.20 कि.मी रेस वाॅकिंग स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरचं रेकाॅर्ड प्रियंकाच्या नावावर आहे.

रविवारी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'स्पोर्टस युनिव्हर्सिटी'चं भूमिपूजन झालं. हा बातमीचा मुख्य विषय होता पण पंतप्रधानांनी प्रियंका गोस्वामी आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. प्रियंकानं पंतप्रधानांना रामायण ग्रंथ भेट दिला. हा प्रसंग प्रियंका गोस्वामी हिच्यासाठी स्वप्नपूर्तीचा होता तर पंतप्रधान मोदी यांनीही देशातल्या छोट्या शहरातल्या या जिद्दी मुलीला दिलेलं वचन पूर्ण केल्याच्या आनंदाचाही!

Image: asianet newsable

प्रियंका गोस्वामी कोण हा प्रश्न नक्कीच  पडला असेल ?

2020 टोक्यो ऑलिम्पिकमधे रेस वाॅकिंगसाठी पात्र झालेली ,  या स्पर्धेत 17 व्या क्रमांकावर आलेली, वर्ल्ड चॅम्पियनशिपमधे पात्र ठरलेली , रेस वाॅकिंगमधे राष्ट्रीय पातळीवर 1 तास 28 मिनिटं 45 सेकंदाचा रेकाॅर्ड बनवणारी आणि याआधी 2017 मधे रेस वाॅकिंगची राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेली प्रियंका गोस्वामी. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले सर्व खेळाडू स्पर्धा संपवून भारतात आले तेव्हा 16 ऑगस्ट 2021मधे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व ऑलिम्पिक पात्र खेळाडूंना  आपल्या निवासस्थानी आमंत्रित करुन त्यांच्यासमवेत नाश्ता केला. प्रत्येकाशी वैयक्तिक संवाद साधला. त्यात रेस वाॅकिंग खेळाडू प्रियंका गोस्वामीही होती.

Image: Google

 पंतप्रधान मोदी यांनी या भेटीआधीही आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमातून तिचं  कौतुक केलं होतं. प्रियंकाच्या कामगिरीतून खेळाडू होण्याचं स्वप्न्ं पाहाणाऱ्या युवांना प्रेरणा मिळावी म्हणून पंतप्रधानांनी प्रियंकाचं उदाहरण दिलं होतं.

बक्षिस म्हणून एक स्पोर्टस बॅग आपल्यालाही मिळावी या उद्देशानं रेस वाॅकिंगचा सराव करणाऱ्या प्रियंका गोस्वामीने आपल्या  कठोर मेहनत आणि  जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय स्पर्धा जिंकली आणि राष्ट्रीय पातळीवर स्वत:चं रेकाॅर्ड तयार केलं. एक यशस्वी खेळाडू होण्यासाठी घरची श्रीमंती असणं, भौतिक साधनांची रेलचेल असणं गरजेचं नसतं हेच प्रियंकानं आर्थिक अडचणींचा सामना करत स्पर्धेत यशस्वी होऊन सिध्द केलं.  हिच ती प्रियंका. 

Image: Google

प्रियंका म्हणजे ॲक्सिडेण्टल रेस वाॅकर

मूळची उत्तरप्रदेशातील मुझ्झफूरनगर येथील प्रियंका. घरातील आर्थिक परिस्थिती अगदीच सामान्य. वडील बस कंडक्टर आणि आई गृहिणी. पण प्रियंकाच्या हुशारीच्या आड घरातील आर्थिक विवंचना कधीच मधे आली नाही. अभ्यासात हुशार असलेल्या प्रियंकाला शाळेत सर्व गोष्टीत भाग घ्यायला आवडायचा. शाळेतल्या शिक्षकांनाही तिच्यातले हे गुण माहिती होते.  ती सहावीत असताना शाळेतील शिक्षकांनी तिला विचारलं खेळात भाग घेशील का? प्रियंका लगेच होच म्हटली. मग सरांनी तिला मेरठ येथील मैदानावर सरावासाठी बोलावल. तेव्हा तिला कळलं, की इथे आपण जिमनॅस्टिक शिकणार आहोत. नंतर जिमनॅस्टिकच्या प्रशिक्षणासाठी तिला लखनौ येथील प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात आले.  तिथे शारीरिक क्षमतेची चचणी घेण्यात आली. त्यासाठी तिला धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्यास सांगितला आणि तिथे ती पहिली आली. तेव्हापासून तिला जिमनॅस्ट होण्यापेक्षा ॲथलिट होण्यात रुची निर्माण झाली. तिला जिमनॅस्टिक सोडून धावण्याचा सराव करायचा होता, पण तिला तशी परवानगी नव्हती. शेवटी तिने जिमनॅस्टिकचं प्रशिक्षण सोडून घरी आली.

Image: Google

पुढचे तीन वर्ष तिने कसलाच सराव केला नाही. नंतर तिने जिल्हा पातळीवरील धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. 800, 1500 मीटर स्पर्धेत ती उतरली पण कशातच तिचा नंबर आला नाही. बाकी सर्व विजेत्या खेळाडुंना बक्षिस म्हणून ॲथलिटस किट बॅग मिळत होती. आपल्याला ही बॅग नाही मिळाली म्हणून ती हिरमुसली. ही बाब तिच्या शाळेतल्या शिक्षकांना लक्षात आली, शिवाय त्यांना प्रियंकाचं कौशल्यही माहित होतं. त्यांनी तिला तू रेस वाॅकिंगमधे भाग घे असं सूचवलं. तिने त्यात भाग घेतला तर ती त्यात तिसरी आली. तेव्हापासून तिनं रेस वाॅकिंगचा सराव करायला सुरुवात केली. पुन्हा हिंमत जुटवून् ती लखनौ येथील प्रशिक्षण केंद्रात गेली. आपण इथे आधी जिमनॅस्टिकच्या सरावाला आलो होतो , पण जिमनॅस्टिकपेक्षा मला रेस वाॅकिंगमधे रुची आहे, मला शिकवणार का? असं तेथील रेस वाॅकिंग प्रशिक्षकांना विनंतीपूर्वक विचारलं आणि त्यांनीही तिची विनंती मान्य करुन तिला रेस वाॅकिंगचं शिस्तबध्द प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.  घरुन आई वडिलांचा प्रियंकाला  पूर्ण पाठिंबा होता पण, नातेवाईकांचा विरोध होता. प्रियंकाच्या आई वडिलांनी तिच्या हुशारीवर आणि जिद्दीवर विश्वास ठेवला आणि तिला पुढे जाण्यास प्रोत्साहन दिलं. 

Image: Google

2012 मधे लंडन ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होती.  लखनौ येथील प्रशिक्षण केंद्रातील खेळाडुंनी आज तिथे रेस वाॅकिंग स्पर्धा आहे असं म्हटल्यावर प्रियंकाला ऑलिम्पिक नावाची स्पर्धा असते, तिथे रेस वाॅकिंगचाही समावेश होतो हे कळलं. तेव्हापासून तिच्यात ऑलिम्पिकमध्ये आपणही आपल्या देशाचं प्रतिनिधित्त्व करावी इच्छा निर्माण झाली.

आधी  प्रियंका  18 वर्षाखालील स्पर्धेत केवळ 3 कि.मी. 5 कि.मी रेस वाॅकिंगमधे सहभागी होत होती. तिला तर 20 कि.मीची रेस वाॅकिंग असते हे देखील माहित नव्हतं. सुरुवातीला तर 3 कि.मी मध्येही तिचा  दमसास टिकेनासा झाला.  पण प्रशिक्षकांनी तिला प्रेरणा दिली आणि तिनेही आढेवेढे न घेता , कष्टात कसूर न करता सराव केला. आपला दमसास वाढवत 20 कि.मी पर्यंत नेला. 2017 मधे राष्ट्रीय पातळीवरची रेस वाॅकिंग स्पर्धा तिने जिंकली/ 2020च्या फेब्रुवारीत तिने इंडियन रेस वाॅकिंग ओपन चॅम्पियनशिपमधे  20 कि.मीच्या रेस वाॅकिंगमधे 1 तास 28 मिनिटं 45 सेकंदाचा रेकाॅर्ड नोंदवला आणि याच  रेकाॅर्डवर तिची टोक्यो ऑलिम्पिकसाठी निवड झाली. याआधी 2019 मध्ये झालेल्या टोक्यो ऑलिम्पिक पात्रता फेरीपूर्वी तिला कोरोना झाला होता. बरी होवून ती या पात्रता फेरीत उतरली पण 36 सेकंदाच्या फरकामुळे ती अपात्र ठरली. 

Image: Google

प्रत्यक्ष टोक्यो ऑलिम्पिकमधे 8 कि.मी पर्यंत ती पुढे होती मात्र नंतर  ती मागे पडली . प्रियंकाने 1 तास  32 मिनिटं 36 सेकंदात  स्पर्धा पूर्ण करुन 17 वा क्रमांक राखला.  ऑलिम्पिकमधे पात्र होऊन, स्पर्धेत भाग घेऊन तिनं तिचं एक स्वप्न पूर्ण केलं. पण माझ्या स्वप्नांची मर्यादा इथवरच नाही हे तिने टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र झाल्यावरच सांगितलं होतं. त्यामुळेच प्रियंका गोस्वामी रेस वाॅकिंगमधे आपल्या देशाचं नाव जगात करेल हा विश्वास  आजही वाटतो. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीटोकियो ऑलिम्पिक 2021पंतप्रधाननरेंद्र मोदी