महेश गलांडे
बार्शीसारख्या ग्रामीण भागात बालपणाची पाऊलवाट तुडवल्यानंतर एक दिवस अमेरिकेतील न्यूयॉर्क फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करत 'मराठी पाऊल पुढे पडलेच'. बार्शीसह महाराष्ट्राची छाती अभिमानाची फुगावी असा हा विलक्षण आनंदी क्षण. कधीकाळी शेंद्रीच्या मातीत, बार्शीतील रस्त्यावर चालणाऱ्या मराठमोळ्या पायलची झनकार साता समुद्रापार पोहोचली. अर्थात, बार्शी ते न्यूयॉर्क हा प्रवास सोपा नव्हता, अथडळ्यांची शर्यत होती. पण, ध्येयात अखंडीत असं सातत्य होतं, अनेकांची साथ होती, मनात आत्मविश्वासाची बात होती. म्हणूनच पायल मंडेवालकर यांनी फॅशन क्वीन होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं. 'एक्स्ट्रीम थ्रील टू बी पार्ट ऑफ न्यूयॉर्क फॅशन वीक....' हे त्यांचंच वाक्य त्यांच्या आजपर्यंतच्या 'पॅशेनेबल' प्रवासाची टॅगलाईन म्हटले तरी वावगं ठरणार नाही.
पायल मंडेवालकर या मूळच्या बार्शी तालुक्यातील शेंद्री गावच्या कन्या. त्यांचं माहेरचं नाव ज्योती प्रकाशराव जहागिरदार. वडील बार्शीतील एमएसईबीच्या अकाऊंट विभागात नोकरीला असल्याने त्यांचे प्राथमिक शिक्षण बार्शीतील सुलाखे हायस्कूल येथेच झाले. तर, बारावीपर्यंतचे शिक्षण श्री शिवाजी महाविद्यालयात पूर्ण केलं. पुढील शिक्षणासाठी बार्शी सोडून मायानगरी मुंबईत जावं लागलं. स्वप्ननगरीनं पायलला मोठी स्वप्न पाहायच अन् सत्यात उतरायचं पॅशन दिलं. तेथूनच 'फॅशन क्वीन'च्या पॅशनेबल जर्नीला सुरूवात झाली.
मला बालपणापासूनच फॅशन आवडत होती, त्यासाठी माझे वडिलच कारणीभूत. कारण, तेच मला लहानपणी फॅशनेबल बनवत, माझा हटके ड्रेस, शाळेत जाण्यापूर्वीची हेअरस्टाईल आणि सुंदर दिसणारा लूक करत. मात्र, मुंबईतील एसएनडीटी कॉलेज येथे इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला, तिथेच माझ्यातला फॅशनचा किडा सुरू झाला. कारण, मी आता बॉलिवूड इंडस्ट्रीजच्याजवळ आले होते, गावाला कोसो दूर सोडून स्वप्ननगरीत पोहोचले होते. जुहूला कॉलेज असल्याने सलमान, आमीर, शाहरुख हे बडे सिनेस्टार जवळून पाहता आले. एकदा आमच्या कॉलेज फॅशन शोमध्येही बिपाशा-जॉन हे फॅशन जजेस म्हणून आले होते. त्यातूनच, फॅशनबद्दल अधिकच पॅशेनेट होता आलं.
मॉडेलिंग वर्ल्डसाठी माझा लूक, शरीरयष्टी सूट होणारी नव्हती. प्राधान्याने मॉडेल बनण्यासाठी मी मॉडेलिंग एजन्सीला एप्रोच झाले. पण, त्यांच्या रिक्वारमेंटनुसार 5.6 किंवा त्याहून जास्त उंची अपेक्षित असल्याने माझं रिजेक्शन झालं. मात्र, मी माझ्या फॅशनची जिद्द ब्लॉगिंगमधून, सोशल मीडियात फोटो अपलोड करुन लोकांसमोर ठेवली. त्यातून, प्रतिसाद मिळत गेला, मी पुढे जात गेले अन् वाट दिसत गेली. त्यातच, 2018 नंतर मला या क्षेत्रात काही बदल दिसून आले, केवळ आपली सुंदरता, उंची किंवा शरीरयष्टीच महत्त्वाची नाही. तर, आत्मविश्वास, सकारात्मक एटीट्यूड, कॅमेरा फेसिंग, फॅशनचं पॅशन, कॅटवॉक याच गोष्टी महत्वाचं असल्याचं प्रकर्षणाने जाणवलं.
मी साडी मॉडेलपासून, लोकल डिझायनरच्या शोंमधून करिअरची सुरुवात केली. 3 ते 4 फॅशन कोरिओग्राफरकडून मी ट्रेनिंग घेतलं. लुबना आदम, मनिष मल्होत्रा यांच्या भेटीनंतर माझ्यातील मॉडेल बनण्याचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला. मी जिंकते की हारते हे महत्त्वाचं नसून मी रॅम्पच्या मैदानात माझं 'बेस्ट' देऊन उतरते, हे महत्वाचं आहे. मी कुठल्याही प्रकारची साडी केवळ 2 मिनिटांत परिधान करू शकते, कारण मला साडी मॉडेल खूप आवडतं. मूळात ग्रामीण भागातून आल्याने साडी हे महिलेचं प्रतिबिंबच असल्याचं मला वाटतं. फॅशन वर्ल्डमध्ये तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जातो. तुमच्यात निराशावाद असल्यास तुम्ही फॅशन वर्ल्डमध्ये न येणंच चांगलं. चालताना, बोलताना आणि रॅम्प वॉक करताना तुमच्या बॉडी लँग्वेजमध्येही तो आत्मविश्वास झळकला पाहिजे, असे पायल यांनी म्हटले.
मिसेस एशिया वर्ल्ड 2021 'एलिट'चा खिताब जिंकण्याचं कारणही मी आत्मविश्वासाने दिलेलं उत्तरच होय. E & T टीमध्ये इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर फॅशन वर्ल्डमध्ये करिअर करणं म्हणजे थ्री इडिएट चित्रपटातील फरहानला फॉलो करण्यासारखंच. त्यातच, लग्नानंतर मॉडेलिंगचा उत्साह कमी झाला, बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांच्या शरिररचनेत नैसर्गिक बदल होतोच, त्यामुळे पुन्हा पूर्वीप्रमाणे फिगर मेन्टेन करणं थोडं कठीण काम. पण, म्हणतात ना, इच्छे तिथे मार्ग.... असतो. घर, मुलं आणि फॅशनची पॅशन सांभाळणं अवघड बनलं होतं. पण, माझे पती माझी ताकद बनले, तेच माझी सपोर्ट सिस्टीम झाले. मुलांचा घरात सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. म्हणून, मी घराबाहेर पडू शकले, फॅशन शो आणि शुटींगला जाऊ शकले. माझ्या कुटुंबीयांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्यच नव्हतं, असे पायल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
बार्शी ते न्यूयॉर्क हा प्रवास संस्मरणीय, इंटरेस्टींगच. कारण, लहानशा गावातून मोठी स्वप्न पाहात, हार्डवर्क आणि अडथळ्यांची शर्यंत पार करत मी इथपर्यंत पोहोचले. तुम्ही तुमच्या पॅशनवर प्रेम केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या करिअरशी पॅशेनेट असलं पाहिजे. मग, तुमच मन आणि आत्मा हे सकारात्मक काम करत जातं. अगर किसी चीज को सच्चे दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुम से मिलाने में लग जाती है... हे खरंच !
तुम्ही कोठून येता, कसे दिसता, कोणती भाषा बोलता इट डसन्ट मॅटर, फक्त तुमचे प्रयत्न किती प्रामाणिक आहेत, तुमच्या पॅशनसाठी तुम्ही किती कष्ट घेता, तुमच्या स्वप्नांचा पाठलाग किती सातत्याने करता हेच महत्वाचं असतं. जगभरातील महिलांना मला हेच दाखवून द्यायचंय. माझाही प्रवास एका लहानशा गावातून सुरू झाला होता, तो जगात 4 थ्या क्रमांकाच्या 'न्यूयॉर्क फॅशन वीक' शोपर्यंत पोहोचलाच, माझ्या प्रवासातून मी हेच शिकले, हाच धडा मिळाला. म्हणूनच, पायल मंडे'वॉकर'चा रॅम्प वॉक, मराठीच नाही, तर भारताच्या ग्रामीण भागातून उंच भरारी घेण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कोट्यवधी भारतकन्येंसाठी ऊर्जा अन् ध्येयवादी स्फुर्ती निर्माण करणारी 'बार्शी टू न्यूयॉर्क' जर्नी आहे.
