Join us  

समाज सेवेचं व्रत घेतलेल्या औरंगाबादच्या सुनीता तगारे! लहान मुलं ते ज्येष्ठ नागरिक- सगळ्यांनाच दिला आधार....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 9:13 AM

नवरात्र स्पेशल: लहान मुलांमध्येच मन रमतं, त्यांच्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे, असं सांगत आहेत सुनीता तगारे (Sunita Tagare)

ठळक मुद्देनवरात्रात आपल्या आराध्य देवीचं स्मरण करतो, तिची उपासना करतो... सुनीता तगारे यांच्यासारख्या समाजसेवेचं व्रत घेतलेल्या अनेक जणी निराधारांसाठी एखाद्या देवदुतापेक्षा कमी नाहीत.. 

काही जणी असतातच अशा.... आपलं घर, आपली मुलं, आपला संसार यापेक्षा खूप खूप पुढचं पाहणाऱ्या आणि विचारांच्या- कामाच्या कक्षा रुंदावून सगळ्यांसाठीच झटणाऱ्या, लढणाऱ्या... औरंगाबादच्या सुनीता तगारे (Sunita Tagare, Aurangabad) यादेखील अशा महिलांपैकीच एक. समाजसेवेचं कार्य अगदी मनापासून करणाऱ्या आणि त्यातच स्वत:ला रमवून घेणाऱ्या. वर्षानुवर्षे स्वत:ला या कार्यात झोकवून घेणं आणि त्यातच आपला आनंद शोधणं असं त्यांच्या कार्याचं वर्णन करता येईल. अगदी तरुण वयापासूनच त्यांच्या या कामाला अगदी सहज म्हणून सुरुवात झाली आणि हळू हळू त्यांनी तीच वाट निवडली.

 

समाज सेवा करायची म्हणून केली जात नाही. किंवा ती ठरवूनही होत नाही. कारण त्यासाठी जी समज लागते, समोरच्याला किंवा समोरच्या व्यक्तीच्या अडचणी समजून घेण्याची क्षमता लागते ती प्रत्येकातच असते असे नाही. पुणे येथे महाविद्यालयात असताना कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत त्या कै. डाॅ. अच्युतराव आपटे यांच्याकडे काम करायच्या. यातूनच हळूहळू समाजसेवेचा एक एक कंगोरा उलगडत गेला. यानंतर कुटूंब व बाल कल्याण हा विशेष विषय घेत त्यांनी एम. एस. डब्लू चे शिक्षण पुर्ण केले. ३५ वर्षांपेक्षाही अधिक काळापासून त्या महिला व बालविकास या विभागात कार्य करत आहेत.

 

निराधार बालके, मतिमंद बालके, निराधार महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांसोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे. याविषयीचा त्यांचा अनुभव सांगताना त्या म्हणातात की त्या प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत. खरंतर या तिन्ही घटाकांसाठी काम करण्याची खूप गरज आहे. पण तरीही त्यांच्या दृष्टीने बालकांसाठी खूप अधिक प्रमाणात काम होणं गरजेचं आहे. बालकांसोबत त्यांनी खूप अधिक काळ काम केलं असून मी मनापासून बालकांमध्येच रमते, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. आपल्या समस्या सोडविण्यासाठी, आपल्या अडचणींमध्ये धावून येण्यासाठी आपण नवरात्रात आपल्या आराध्य देवीचं स्मरण करतो, तिची उपासना करतो... सुनीता तगारे यांच्यासारख्या समाजसेवेचं व्रत घेतलेल्या अनेक जणी निराधारांसाठी एखाद्या देवदुतापेक्षा कमी नाहीत.. 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीसमाजसेवक