Join us  

Lata mangeshkar : ‘रडत बसले नाही म्हणून..’-लता मंगेशकरांनी सांगितला होता जगण्याचा महामंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 1:10 PM

Lata mangeshkar : संघर्ष तर अटळ आहे, पण म्हणून त्याचा बोजा आयुष्यभर वाहणार का? आपण कसं जगायचं हे आपण ठरवायचं, असं सांगणाऱ्या लता मंगेशकरांची उमेदीची गोष्ट.

आज साऱ्या देशाच्या मनात आपण पोरके झाल्याची भावना आहे; विलक्षण दैवी गाणं, ज्या गाण्यानं आपल्या साऱ्या सुखदु:खाना शब्द दिले, आपल्या भावना व्यक्त करता करता जगणंच श्रीमंत केलं, आज तो श्रीमंती आवाज आपल्यातून गेला. लता मंगेशकर. आज डोळ्यात पाणी आणून त्यांच्या आठवणी काढतानाही त्यांचे शब्द जगण्याची उमेद देतात. त्या नेहमी सांगत, संघर्ष तर जगण्यात अटळ होता. माझ्याही होता. पण मी ‘रडकी’ नव्हे, जेव्हा जेव्हा वाट्याला दु:ख आलं तेव्हा तेव्हा ती वेदना मागे सारुन मी ‘हसणं’ स्वीकारलं, उमेद स्वीकारली. मला नेहमी वाटायचं की आजचा दिवस असेलही अवघड पण उद्या मात्र सोनेरी स्वप्न घेऊन येईल, भविष्य सुंदर असेल..-लतादीदींनी आपल्या ८८ व्या वाढदिवसाला आयएएनएस नावाच्या न्यूज एजन्सीला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत आपल्या जगण्याचा पट त्यांनी मांडला.

मुलाखतीत त्या म्हणाल्या, ‘ मला काही माझं वय जाणवत नाही. मला वाटतं मी अजूनही तरुण आहे. त्यामुळे भूतकाळात काय झालं, अमूकवेळी काय झालं, तमूक काय म्हणाला हे सारं विसरा. तेच ते काय बोलायचं. बोलायचंच असेल तर उमेदीविषयी, आनंद राहण्याविषयी बोलू. मी माझ्या तारुण्यात संघर्ष केला नाही का, तर केला. पण त्या संघर्षाचं ओझं घेऊन मी आयुष्य जगले नाही. ना त्याचा मी काही ताण घेतला. आयुष्यात संघर्ष अटळ असतात. माझ्याही आयुष्यात संघर्ष अटळच होते. सगळ्यांच्याच असतात. ते कुणाला चुकलं आहे. पण त्याचं ओझं आपण आयुष्यभर वहायचं नसतं. मी तरुणपणी झगडत होते, या स्टुडिओमधून त्या स्टुडिओत जात होते. काळ अवघड होता. दिवस दिवस मी उपाशी असायचे, पर्समध्ये पैसेही नसत. पण मजेचे, मस्त होत ते दिवस. कारण मनात उर्मी होती. वाटायचं, आज दिवस वाईट असतीलही पण हे दिवस उद्या राहणार नाही. भविष्यात सोनेरी स्वप्न दिसत. उद्या आपल्यासाठी आनंद घेऊन येईल असं वाटायचं.

ते ‘वाटणं’ इतकं जबरदस्त होतं म्हणून कदाचित लता मंगेशकर या नावानं अशी काही भूरळ साऱ्या जगभरातल्या माणसांना घातली की त्यांचं गाणं हा अनेकांच्या जगण्याचा आधार झाला. सर्व जातीभेद-धर्मभेद एवढंच काय देशांच्या सीमा पूसत त्यांचा आवाज परमेश्वरी कृपा असल्यासारखा साऱ्यांना आपलासा वाटला.

मात्र ज्या काळात लता मंगेशकर गात होत्या त्या काळात त्यांचं गाणं त्यांच्याशी सर्वस्व होतं. त्यापायी किती कष्ट घेतले हे लता मंगेशकर मुलाखतीत सांगतात. एकदा मुंबईचा उन्हाळ्यातला उकाडा. त्यात एसी नाही. पंखाही बंद पडला. त्यात त्यांनी रेकॉर्डिंग केलं. ते गाणं उत्तम झालं पण लताबाई चक्कर येऊन कोसळल्या. नौशाद  साहेंबासाठी त्या रेकॉर्डिंग करत होत्या.

ही आठवण सांगून लता मंगेशकर सांगतात, ‘अश्रू की हसू या दोन पैकी एक काही निवड असा माझ्यासमोर पर्याय असेल तर मी कायम हसू निवडलं. मी कधीच ‘रडकी’ नव्हते. रडत बसणंच मला मान्य नव्हतं. मी हसत हसत जगले. रडण्याची कारणं ना कधी मी स्वत:ला दिली ना इतरांना. सबबी कधी सांगितल्या नाहीत, रडगाणी गायली नाहीत. हसत जगले. फक्त माझे आईबाबा गेले तेव्हा मी खूप रडले. फक्त तेव्हाच. आज कुणी विचारलं की फार संघर्ष केला, आयुष्यात काही बदलायचं ठरवलं तर तुम्ही काय बदलाल.. माझं उत्तर एकच, मी काहीही बदलणार नाही. मी जगले, त्यात मी समाधानी आहे. आनंदाने जगले..

-लताबाई आईच्या मायेनं  आनंद आणि स्वरांचं दैवी लेणं आपल्या साऱ्यांना देत राहिल्या. त्यांचं गाणं तर आपल्या कायमच सोबत असणार आहे.. त्या म्हणतातच रहे ना, रहे हम.. महका करेंगे..

 

टॅग्स :लता मंगेशकरप्रेरणादायक गोष्टी