भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकला आणि भारतभर त्याचे कौतुक झाले. भारतीय महिला क्रिकेटसाठी हे वर्ष फारच यशस्वी ठरले आहे यात काहीच वाद नाही. कारण या विजयाला चार चाँद लावत आणखी एक वर्ल्डकप भारतात आला. भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने पहिला Blind Women’s T20 World Cup जिंकत इतिहास रचला. (India won Blind Women’s T20 World Cup, the journey wasn't easy, but girls did it anyways )नेपाळविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने अतिशय आत्मविश्वासपूर्ण खेळी खेळून विजय मिळवला आणि देशाचे नाव जगभर उज्ज्वल केले.
ब्लाइंड वूमन क्रिकेट हा भारतात अद्याप फारसा प्रकाशझोतात न आलेला खेळ. परंतु या विजयानंतर खेळाकडे देशाचे लक्ष वेधले गेले. संघातील महिला विविध सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतून आलेल्या असल्या, तरी प्रत्येकाजवळ जिद्द, कठोर मेहनत आणि खेळाप्रती अविचल समर्पण आहे. मैदानावर चेंडूचा आवाज, टिममेटचे संकेत आणि स्वतःची संवेदनशीलता याच्या आधारे ते खेळतात. दृष्टी नसूनही त्यांची प्रतिक्रिया, धावांची समज, गोलंदाजीचा अंदाज आणि फिल्डींग करण्याची क्षमता आश्चर्यचकित करणारी ठरते. त्यांच्या मेहनतीला खरंच सलाम आहे.
आपल्या आयुष्यात आपण अनेकदा फारच छोट्या गोष्टींमुळे उदास होतो. कामात चूक झाली, एखादी गोष्ट वेळेवर जमली नाही, कुणी काही बोललं किंवा एक दिवस जरा अवघड गेला, की आपण लगेच निराश होतो. पण या मुलींच्या आयुष्यातली अडचण ही आपल्या तक्रारींपेक्षा कितीतरी मोठी होती. तरी त्यांनी एकही दिवस स्वतःवर दया केली नाही. त्यांनी सराव केला, स्वतःला मजबूत केलं आणि प्रत्येक सामन्यात न घाबरता उतरल्या.
त्यांचं यश हे शिकवतं की जिंकणं हे नशिबाने होत नाही, तर रोज केलेल्या प्रयत्नांनी होतं. मनात धैर्य असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी मार्ग मिळतो. जे दिसत नाही तेही साधता येतं. फक्त प्रयत्न आणि सातत्य हवं.
आपल्या आयुष्यातही थोडा धीर, थोडी सकारात्मकता आणि थोडा संयम ठेवला तर अनेक गोष्टी सोप्या वाटू लागतात. काही वेळा दिवस वाईट जातो, पण त्याचा अर्थ आयुष्य वाईट आहे असं होत नाही. अडचण आली म्हणजे मार्गच बंद झाला असं नसतं. त्या अडचणीवर मात करण्यासाठी जिद्द हवी, ही शिकवण या भारताच्या वाघिणींनी दिली.
अंध महिला क्रिकेट संघाने हेच दाखवून दिलं—की यश तेव्हाच मिळतं, जेव्हा माणूस थांबत नाही. त्यांना ना जास्त कोणी प्रोत्साहन द्यायला गेले नाही कोणी फार त्यांच्यावर विश्वास दाखवला. तरी त्या खेळल्या आणि अशा खेळल्या की सगळा देश पाहत राहीला. त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही, परिस्थितीला दोष दिला नाही. त्यांनी जे होतं त्यातूनच सर्वोत्तम साध्य केलं आणि म्हणूनच त्या जग विजेत्या ठरल्या. या मुली सगळ्यांसाठीच आदर्श आहेत.
