Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधार असणाऱ्या वडिलांना कॅन्सर झाल्याचं समजलं, पण त्यांनीच शिकवलं ‘उमेद’ काय असते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2023 14:45 IST

उमेद सपोर्ट ग्रुप : कॅन्सरवर मात करुन जगणाऱ्या कुटुंबाची गोष्ट.

सुवर्णा संदीप खताळ

होय, मी घाबरले होते. मी संगमनेर मध्ये सह्याद्री विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मी आणि माझी दोन मुलं तनिष्का आणि हर्षवर्धन मस्त मजेत राहात होतो. कधी-कधी माझे आई-वडीलही माझ्याकडे राहायचे. पतीचे निधन झाल्यापासून माझ्या वडिलांनी खूप मोठा आधार दिला.माझे वडील, श्री. विठ्ठल तबाजी रहाणे. आम्ही त्यांना ‘दादा’ म्हणतो. ते संगमनेरमध्ये गट समन्वयक अधिकारी होते. रिटायरमेंटनंतर ते माझा भाऊ सतीश  रहाणेकडे राहात होते. तो नाशिकला धुमाळ इंडस्ट्रीज मध्ये कार्यरत आहे. पण दादा कामसू, कष्टाळू, चपल वृत्तीचे असल्याने त्यांना घरात शांतपणे बसणे होईना. ते परत संगमनेरला आले. पेन्शनर असोशीएशनच्या ऑफिस मध्ये सहसचिव म्हणून काम बघू लागले. एवढेच नाही तर गावी एसी पोल्ट्री फार्मचे काम सुरू केले. धावपळ नको म्हणून चंदनापुरीला घरही बांधायला सुरुवात केली.अश्या ७२ वर्षाच्या तरुणाला मात्र दृष्ट लागली. अलीकडे त्यांच्यातील काटकपणा कमी होतांना दिसत होता. त्यांना भूक लागेना, जेवण नकोच म्हणायचे, अशक्तपणा जाणवत होता. अगोदर आम्हाला वाटले वय झाले म्हणून जरा थकले असावेत. पण अचानक एके दिवशी खूप पोट दुखू लागले. दवाखान्यात जाऊन आले तरी पोट दुखायचे काही थांबेना.

शनिवार, १७ जून रोजी भाऊ आणि दादा माझ्या घरी आले. भाऊ म्हणाला, “ताई, दादांना तू हॉस्पिटल ला घेऊन जा.” मी त्यांना माझी मैत्रीण डॉक्टर श्रद्धा वाणी यांच्या हॉस्पिटलला घेऊन गेले. डॉक्टर प्रतीक वाणींनी दादांना चेक केले. आधी सोनोग्राफी करायला सांगितली, त्याप्रमाणे केले. रिपोर्टस बघितल्यावर ते म्हणाले, “पित्ताशयावर गाठ दिसते आहे, ती कॅन्सर ची असण्याची दाट शक्यता आहे.” हे ऐकून मी सुन्न झाले, डोळ्यातून अश्रु वाहू लागले. मी बाहेर येऊन लगेच सतिशला फोन लावला. तो लगेच आला.  डॉक्टरांनी सी.टी. स्कॅन आणि काही रक्त तपासण्या करून घेतल्या. त्यावरून खात्री झाली की दादांना पित्ताशयाचा कॅन्सर झाले. आम्हा दोघांनाही खूप धक्का बसला, थोडी भीतीही वाटली. विश्वासच बसेन की दादा एवढे धडधाकट असतांना हा आजार कसा?आमच्या पायाखालची जमीनच सरकली.माझा भाऊ आणि मी दोघांनी एकमेकांना सावरत परिस्थितीला सामोरे जायचे असे ठरवले. पण दादा आणि घरच्यांना सांगायचे कसे हा प्रश्न होता.माझी बहीण साधना हैदराबादला असते. तिचे यजमान सचिन जाधव हे फार्मामध्ये असल्याने त्यांना फोन वर सगळी परिस्थिति सांगितली. तेव्हा नाशिक, पुणे आणि मुंबई येथी डॉक्टरचे सल्ले घेऊ असे ठरले.मी आणि भाऊ तातडीने नाशिकला निघालो. मानवता कॅन्सर हॉस्पिटल मध्ये डॉक्टर नगरकरांना भेटलो. त्यांनी सांगितले दादांना कावीळ खूप आहे, त्यामुळे पहिले ती कमी करावी लागेल, म्हणून त्यांना उद्या हॉस्पिटलला घेऊन या.ही धावपळ सुरू असतांना घरी असणारे माझे वडील, आई, वाहिनी, बहीण ह्यांना काहीच कल्पना नव्हती. त्यांना कसे सांगावे? भाऊ खंबीरपणे म्हणाला, “ताई, जे आहे त्याला आपल्याला सामोरे जाणे आहे. या परिस्थितीत घाबरून चालणार नाही.” मी म्हणाले की दादांना या वयात भीती वाटेल, हे ऐकून. तो म्हणाला, “ मी सांगतो त्यांना व्यवस्थित, फक्त तू खंबीर राहा. त्यांच्या समोर सगळे नॉर्मल आहे असेच चित्र उभे कर.”दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ जूनला त्यांना ॲडमिट करायचे असल्याने त्यांना सर्व सांगणे महत्वाचे होते, जेणेकरून त्यांच्या मनाची तयारी होईल. रात्री १० वाजता आम्ही हॉल मध्ये बसलो. दादांनी विचारले, “काय रे, काय झाले?” त्यावर भाऊ अगदी शांतपणे सांगू लागला. सगळे ऐकल्यावर वडील शांत झाले, त्यांना थोडी काळजी वाटू लागली. कॅन्सर झाला म्हणून नाही तर त्यांचे गावी राहून एसी पोल्ट्री फार्म चे स्वप्न आता अर्धवट राहील या विचारामुळे. पण आम्ही सगळ्यांनी हा काही मोठा आजार आहे हे न भासवता, आजकाल खूप कॉमन आहे, यावर इलाज आहेत, थोडाफार काय तो त्रास होईल ह्याची कल्पना दिली, ज्यामुळे ते नंतर घाबरणार नाहीत.दुसऱ्या दिवशी दादांना ॲडमिट केले. ओ. टी. मध्ये नेताना ते थोडे घाबरले पण आम्ही त्यांच्यासमोर हसून बोलायचो, “काय दादा, एवढ्या छोट्या बाबीला तुम्ही घाबरताय का?”, ते नॉर्मल झाले.त्याचबरोबर आई त्यांची अगदी वेळोवेळी काळजी घेते. वहिनी दादांना काय हवं, नको ते काळजीपूर्वक बघते. घरात नातवंडं त्यांच्याशी अगदी हसून खेळून राहतात, मस्ती करतात. या परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांनी एक पथ्य नेमाने पाळले, त्यांच्यासमोर आम्ही कोणी रडलो नाही. घरात आनंदी वातावरण ठेवल्यामुळे त्यांना काही आजार झालाय ह्याची जाणीवच होऊ देत नाही.त्यांच्या सारख्या पेशंटसचे मनोधैर्य वाढविण्यासाठी खरंतर मानवता हॉस्पिटल मध्ये उमेद पेशंट सपोर्ट ग्रुपने मोटीव्हेशनल सत्र आयोजित केले होते. त्यामध्ये हर्षल सर, सई मॅडम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कॅन्सर वर कशी मत करता येते यावर माहिती दिली, पेशंट आणि नतेवाईकांसाठी खूप पॉझीटीव एनर्जी तयार केली.या सर्वाचा दादांवर इतका सकारात्मक परिणाम झाला की ते केमो झाल्यानंतर अगदी फ्रेश होऊन घरी आले. आणि आता तर ते छान जेवण करतात, स्वतःचे छंद जोपासतात, सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर जातात. आत्तापर्यंत जे छंद / इच्छा पूर्ण केल्या नाहीत ते आता दादा खूप आनंदाने करतात.आता डॉक्टर श्रुती मॅडम यांनी तीन केमो झाल्यानंतर परत एकदा पेट स्कॅन करायला सांगितलं आहे. पुढील ट्रीटमेंट काय द्यायची हे त्या रिपोर्ट्स वर ठरेल.

अधिक माहिती आणि संपर्कHCG मानवता कॅन्सर सेंटर् उमेद पेशंट सपोर्ट ग्रुपumed.warriors@gmail.comफोन- 9145500381

टॅग्स :कॅन्सर जनजागृतीकर्करोगआरोग्य