थायलंडमध्ये सुरु असलेल्या मिस युनिव्हर्स २०२५ च्या पूर्व-कार्यक्रमात एक अनपेक्षित आणि संतापजनक प्रकार घडला. मेक्सिकोची स्पर्धक फातिमा बॉश हिच्याशी वर्तन करताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या अपमानकारक टिप्पणींमुळे संपूर्ण कार्यक्रमात तणाव निर्माण झाला. (Horrible incident at Miss Universe pageant, see what happened and how it went )मात्र त्याच्या उद्धट वक्तव्यानंतर घडलेला प्रकार फार प्रेरणादायी आणि समाधानकारक ठरला.
माहितीनुसार, हा ६० वर्षीय अधिकारी एका सत्रादरम्यान फातिमाशी बोलताना तिच्याकडे दुर्लक्ष करत होता, त्याने चालू कार्यक्रमातच तिला dumb म्हणजेच मूर्ख असे संबोधले. तो शब्द ऐकून अर्थातच फातिमाचा आत्मसन्मान दुखावला, केवळ फातिमा नव्हे तर उपस्थित सर्व स्पर्धक स्तब्ध झाले. कार्यक्रमानंतर फातिमाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “त्या अधिकाऱ्याने मला दिलेली वागणूक फार चुकीची होती. मी केवळ स्पर्धक नाही, तर एक व्यक्ती आहे अशा प्रकारे बोलणे अपमानास्पद आहे.”
अधिकाऱ्याचा उद्धटपणा सहन न करता फातिमा बॉश संतापाने कार्यक्रमातून बाहेर पडली. त्यानंतर तिच्या या निर्णयाचा सन्मान करत, इतर अनेक देशांच्या स्पर्धकांनी तिच्या बाजूने उभं राहायचे ठरवले. तिच्यामागून इतरही सर्व जणी बाहेर पडल्या. सोशल मीडियावर या मुलींच्या एकजुटीचं कौतुक होत आहे. एका स्त्रीच्या स्वाभिमानासाठी दुसरी स्त्री उभी राहते ही अत्यंत सुंदर गोष्ट आहे.
या घटनेमुळे मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनला परिस्थिती हाताळण्यासाठी पुढे यावे लागले. संस्थेने अधिकृत निवेदनात स्पष्ट केले की, “कोणालाही अशी वागणूक देणे अनुचितच आहे. अशा प्रकारच्या घटनेसाठी जबाबदार असलेल्या आयोजकावर कारवाई केली जाईल.” दरम्यान, संबंधित अधिकाऱ्याने माफी मागितल्याची माहिती पुढे आली आहे, परंतु कार्यक्रमाच्या आयोजनात आता अधिक पारदर्शकता आणि शिस्त आणण्याची गरज असल्याचे संघटनेने मान्य केले. फातिमा बॉशने अपमानाविरुद्ध आवाज उठवून केवळ स्वतःचा नाही तर प्रत्येक स्पर्धकाचा आत्मसन्मान जपला आहे. तिच्या पाठिशी उभ्या राहिलेल्या इतर स्पर्धकांनी दाखवून दिलं की सौंदर्याच्या व्यासपीठावर खरी ओळख केवळ रुपाने नाही, तर धैर्याने आणि एकतेने घडते. कारण फातिमाच्या एकटीच्या वॉक आऊटने काहीच फरक पडला नसता , तिला इतरांनी समर्थन केल्यामुळे मिस युनिव्हर्सच्या कमिटीलाही झुकावे लागले.
