Join us

गणपती उत्सव विशेष 2025 : कुंडीतली माती घ्या आणि घडवा सुंदर गणेश मूर्ती! नको पीओपी आणि नको शाडू मातीही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2025 08:10 IST

गणपती उत्सव विशेष 2025  : कला आणि महिला ३ : पर्यावरणासाठी -निसर्गासाठी केलेली एक प्रेरणादायी गोष्ट. शाडू मातीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन होतानाही खूप अडचणी येतात. म्हणूनच तर दिपशिखा फाउंडेशनने एक अभिनव उपक्रम सुरु केला

ठळक मुद्देदरवर्षी ४ ते ५ हजार मूर्ती त्या याच पद्धतीने कार्यशाळांच्या माध्यमातून साकारत आहे. निसर्गसेवेत असे योगदान देत आहेत.

रुचिका सुदामे- पालोदकर

प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती पर्यावरणासाठी किती घातक आहेत, हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी शाडू मातीचे गणपती बनविण्याची कल्पना पुढे आली आणि ती लोकांनी यशस्वीपणे उचलून धरली. प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा शाडू मातीची मूर्ती महाग मिळते. पण तरीही निसर्गाची कदर म्हणून कित्येक लोक शाडू मातीच्या मूर्तीच विकत घेतात. पण मागच्या काही वर्षांपासून असं लक्षात येत आहे की शाडू मातीची गणेश मूर्तीही विसर्जित करणं पर्यावरण पूरक नाही.  विरघळलेली शाडू माती पुन्हा वापरणंही तितकंसं सोपं नाही. रोपांसाठी कुंडीत ती घालता येत नाही. यावर उपाय म्हणून कुंडीतलीच माती घेऊन घडवा गणपती असा ध्यास घेऊन छत्रपती संभाजी नगरच्या मनीषा चौधरी यांनी गेली ६ वर्षे एक खास उपक्रम सुरु केला आहे.

 

दिपशिखा फाउंडेशन ही मनीषा चौधरी यांची संस्था. शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत पाेहचत त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि १०० टक्के इकोफ्रेंडली गणपती बनविण्याचा उपक्रम हाती घेतला. मागच्या १६ वर्षांपासून मनिषा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दिपशिखातर्फे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा घेतल्या जातात. पण मागील ६ वर्षांपासून त्यांनी त्यामध्ये एक बदल केला आहे.

गणेशोत्सव: तळणीच्या मोदकासाठी परफेक्ट सारण कसं करायचं? घ्या रेसिपी- मोदक होतील खमंग, चवदार

तुमच्या घरातल्या कुंडीतली माती घ्या. तिचा गणपती घडवा आणि पुन्हा ती माती कुंडीतच टाकून तिच्यामध्ये झाड लावा, असा त्यांचा उपक्रम आहे. यासाठी कुंडीतली माती पाण्यात भिजत घालणे, नंतर खाली बसलेली माती वेचून घेणे, ती सुकवणे अशी बरीच मेहनत त्यासाठी घेतली जाते. कुंडीतल्या मातीला चिकटपणा नसतो. त्यामुळे मूर्तीला तडा जाऊ शकतो. असं होऊ नये म्हणून कडुलिंबाच्या पानांचा वापरही त्या मोठ्या खुबीने करतात. 

अशा पद्धतीने पुर्णपणे पर्यावरण पुरक मूर्ती बनविल्यानंतर तिला रंग देण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो. मुलतानी मातीमध्ये फूड कलर, शेंदूर, चंदन, हळद, कुंकू, गुलाल, बुक्का असे पदार्थ कालवले जातात आणि गरजेनुसार रंग तयार करून गणेश मूर्ती तयार केल्या जातात.

चहाचं पाणी 'या' पद्धतीने केसांना लावा! न्हाऊन होताच केसांच्या समस्या कमी झालेल्या दिसतील..

या मूर्ती जेव्हा तुम्ही पाण्यात विसर्जित करता तेव्हा त्याची पुन्हा माती तयार होते. ज्या कुंडीतून तुम्ही माती घेतली तिच्यात ती पुन्हा घालू  शकता किंवा मग ही माती सुकवून वेगळी साठवून ठेवू शकता आणि त्यापासून पुन्हा पुढच्यावर्षी गणेशमूर्ती तयार करू शकता. दरवर्षी ४ ते ५ हजार मूर्ती त्या याच पद्धतीने कार्यशाळांच्या माध्यमातून साकारत आहे. निसर्गसेवेत असे योगदान देत आहेत.

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीगणपती उत्सव २०२५गणेशोत्सव 2025