मानसी टेंभेकर
बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा श्रीगणेशाची मूर्ती घ्यायला जातो तेव्हा आपल्या हवी तशी गणेश मूर्ती नेमकी मिळत नाही. मग अशावेळी कुठेतरी मनाला मुरड घालावी लागते आणि त्यातल्या त्यात जी मूर्ती आवडली ती घेऊन घरी यावे लागते. पण असं होऊ नये म्हणून मागच्या ८ वर्षांपासून मी छत्रपती संभाजी नगर येथे कस्टमाईज गणेश मूर्ती तयार करून देण्याचा उपक्रम राबवत आहे. अविघ्न गणेश द्वारे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात मूर्तीचा रंग, रूप, पोशाख, दागिने हे कसे अपेक्षित आहेत हे भक्तांना आधी विचारलं जातं आणि मग त्यांच्या आवडीनुसार गणेशमूर्ती तयार करून दिली जाते.
माझ्या आईमुळे मला ही प्रेरणा मिळाली आणि खरंतर तिच्याच पुढाकाराने मी हा कस्टमाईज गणेश मूर्तींचा उपक्रम सुरू केला. सुरुवात तर कर, बघ कसा प्रतिसाद मिळतोय ते.. असं तिनेच मला सांगून बळ दिलं. कारण सोसायटीमध्ये, ओळखीच्या लोकांना मी दरवर्षी मूर्ती तयार करून द्यायचे. हा उपक्रम सुरू केल्यानंतर अगदी पहिल्याच वर्षी मी २८ मूर्ती तयार करून दिल्या आणि दरवर्षी ही संख्या थोडी थोडी वाढतच गेली. छत्रपती संभाजीनगरमध्ये कस्टामाईज मूर्तींंची संकल्पना मीच पहिल्यांदा सुरू केली याचा मला फार आनंद आहे. यावर्षी मला सोशल मिडियाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचता आलं.
अगदी बीड, जालना, परभणी, नांदेड, पैठण, चाळीसगाव, पुणे, मुंबई अशा अनेक ठिकाणांहून येऊन लोक माझ्याकडून मूर्ती घेऊन गेले आणि यंदा दुबईलाही मी तयार केलेली मूर्ती गेली आहे. या कामामध्ये मला भक्कम साथ मिळाली आहे ती माझ्या नवऱ्याची आणि माझी मैत्रिण प्रियंकाची. ती माझ्यासोबत गेल्या ७ वर्षांपासून काम करत आहे. दरवर्षी सुंदर सुंदर मूर्ती तयार करून देतांना मनाला एक वेगळाच आनंद मिळतो आणि लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून अगदी समाधान वाटते. मला गणपती बाप्पाच सगळी ताकद देतात आणि माझाकडून हे सगळं घडवून घेतात असं वाटतं.