Join us  

‘स्वत:चा जीव वाचवायचा असेल तर स्वयंपाक करा!’- नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी करतात रोज स्वयंपाक, म्हणतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 2:12 PM

नोबेल पुरस्कार विजेते, अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक अभिजित बॅनर्जी (economist abhijit banerjee) रोज नियमित स्वयंपाक करतात यावर विश्वास ठेवाल तुम्ही? ते म्हणतात, ‘कुकींग टू सेव्ह युवर लाईफ’(‘Cooking to Save Your Life’)

ठळक मुद्दे‘कुकींग टू सेव्ह युवर लाईफ’(‘Cooking to Save Your Life’) या नावाचं पुस्तक नुकतंच प्रसिध्द केलं आहे. ते आपल्या खाण्या-खिलवण्याच्या, स्वयंपाकाच्या, भारतीय स्वयंपाककला, आहाराविषयी भरभरुन बोलतात...

नोबेल पुरस्कार विजेते, अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक अभिजित बॅनर्जी (economist abhijit banerjee) रोज नियमित स्वयंपाक करतात यावर विश्वास ठेवाल तुम्ही? ते रोज स्वयंपाक तर करतातच, पण स्वत: स्वयंपाक करुन पदार्थ खाण्यात मजा असते असं ते इतरांनाही सांगतात. अर्थशास्त्राचा गंभीर अभ्यासक स्वयंपाक घरात काय करतो असं अजिबात समजू नका, मस्त चुरचुरीत शैलीत त्यांनी नुकतंच एक पुस्तकही लिहिलं आहे. त्यात ते आपल्या खाण्या-खिलवण्याच्या, स्वयंपाकाच्या, भारतीय स्वयंपाककला, आहाराविषयी आणि स्वयंपाक करताना होणाऱ्या आनंदाविषयीही फार ‘खमंग’ कहाणी सांगतात.

मॅसॅच्युसेटस इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या बॅनर्जी यांना स्वयंपाक करायला फार आवडतो. जगरनॉट प्रकाशनाने त्याचं ‘कुकींग टू सेव्ह युवर लाईफ’(‘Cooking to Save Your Life’) या नावाचं पुस्तक नुकतंच प्रसिध्द केलं आहे. एवढा मोठा अर्थशास्त्रज्ञ आणि रोज स्वयंपाक करतो, वेळ तरी कसा मिळतो असा प्रश्न पडलाच असेल तर बॅनर्जी सांगतात, स्वयंपाक तुम्हाला जी स्पेस देतो ती जगण्याचे अनेक रंगगंध तुमच्या आयुष्यात परत भरते.

(Image : Google)

बॅनर्जी सांगतात, मी वयाच्या १५ वर्षांपासूनच स्वयंपाक करतो. आम्ही कोलकात्यात रहायचो, माझी आई नोकरी करायची. कामानिमित्त आईला बराच प्रवास करावा लागत असे. (त्यांची आई मराठी-महाराष्ट्रीय आहे.) त्यामुळे बंगाली पदार्थांसह-मराठी पदार्थ घरात नेहमी केले जात. मात्र आई घरात नसली की बाहेरुन काही मागवणं किंवा घरातील मदतनीसाने जे केलं आहे ते नेहमी खाणं यापेक्षा अभिजित स्वत: स्वयंपाकघरात जाऊन विविध पदार्थ करुन पाहू लागले. त्यांना विचारा कोणता भारतीय पदार्थ तुमच्या सगळ्यात आवडीचा.

ते सांगतात, डाळ! भारतीय पदार्थांत काही करायला साधेसोपे पदार्थ वाटतात. पण ते पदार्थ आहेत फार चवदार. बुद्धीबळ आणि शून्य यासह मानवी संस्कृतीत ‘डाळ’ नावाचा हा पदार्थ भारतानं जगाला दिलेलं मोठं योगदान आहे.  मला फार आवडते डाळ. डाळभात अती प्रिय.  त्यातही बंगाली पध्दतीची मुगाची डाळ. बंगाली जेवणात लिंबू पिळून केलेल्या मुगाच्या डाळीची रेसिपीही ते सांगतात. तीच नाही तर भारतातील बहुतांश भागात वेगवेगळ्या पद्धतीने केली जाणारी वरणं, आमटी किंवा डाळही त्यांना आवडते.

ते म्हणतात, मी रोज स्वयंपाक करतो. कॉलेजमधून आल्यानंतर हे काम म्हणजे माझ्यासाठी रिलॅक्स होण्याचे सर्वात मोठे माध्यम आहे. ६.३० वाजता कॉलेजमधून आल्यावर मी स्वयंपाक करतो आणि ७ दिवसांपैकी ३ दिवस मी भारतीय पदार्थ रांधतो.’

इतकी वर्षे परदेशात राहूनही भारतीय पदार्थांबद्दल त्यांच्या मनात प्रेम आहेच, पण ते फक्त मनात नाही तर ते ताटातही असते, रोज स्वत: केलेल्या पदार्थांत दिसते. जगरनॉट प्रकाशनाच्या सहसंस्थापक चिकी सरकार यांनी अभिजीत यांचे स्वयंपाक करतानाचे काही फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या रेसिपींबरोबरच अभिजीत यांचा स्वयंपाक करतानाचा फोटोही जोडण्यात आला आहे. अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना स्वयंपाक म्हणजे काहीतरी वेगळे, घरापुरते असं त्यांना वाटत नाही, हे अभिजित यांचे वैशिष्ट्य. हे पुस्तक आपल्या कामाशीच निगडित आहे असं त्यांचं मत आहे. ते म्हणताना,  पुस्तक लिहीताना आम्ही स्वयंपाकाचे सामाजिक परिणाम शोधण्याचा देखील प्रयत्न केला. नुसत्या रेसिपी लिहीणं कंटाळवाणं झालं असतं म्हणून या लिखाणाला थोडा मसालेदार फ्लेवर देण्यासाठी प्रत्येक लेखाला सामाजिक शास्त्राशी निगडीत एक प्रस्तावना देण्यात आली आहे.

स्वयंपाक आणि अर्थशास्त्र, भूक आणि पैशाचं गणित, घरी जेवणं आणि बाहेरुन ऑर्डर करणं यातला पैसा आणि खर्च हे सारं बॅनर्जी अत्यंत खुसखुशीतपणे सांगतात. आणि भेटतात, एक नव्याच रुपात.. ‘नोबेल’ स्वयंपाककलाउपासकाच्या!

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अभिजित बॅनर्जी