Join us  

पन्नाशीत सुरू केली कंपनी, 8 वर्षात बनल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला! फाल्गुनी नायरची जबरदस्त गोष्ट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 5:00 PM

जिद्द आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्हीही गाठू शकता यश, पाहा काय म्हणते देशातील सेल्फ मेड श्रीमंत महिला...

ठळक मुद्देबँकेतील उच्च पदावरील नोकरी सोडून ५० व्या वर्षी त्यांनी केले व्यवसायात उतरायचे धाडससेल्फ मेड वूमन, देेशातील सर्वात श्रीमंत होण्याचा मान मिळवला फाल्गुनी नायर यांनी

वयाची पन्नाशी गाठली की उत्साह काहीसा कमी होतो. शरीर, मन थकते आणि सेकंड इनिंगविषयीचे प्लॅन्स सुरु होतात. पण फाल्गुनी नायर या त्याला अपवाद ठरल्या आहेत. वयाच्या पन्नाशीत त्यांनी नायका (Naykaa) ही ब्यूटी प्रॉडक्ट कंपनी सुरु केली. विशेष म्हणजे केवळ कंपनी सुरु करुन त्या थांबल्या नाहीत तर ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर त्यांची ही कंपनी अवघ्या ८ वर्षात भारतीय शेअर बाजारात नामांकित झाली आहे. तुम्ही मनापासून प्रयत्न केले तर यश तुम्हाला गवसणी घातल्याशिवाय राहत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. फाल्गुनी नायर या स्वत:च्या जोरावर काम करत नाव कमावलेल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. आता हे काही एका रात्रीत झाले नाही, तर त्यामागे आहे त्यांनी केलेली मेहनत आणि जिद्द. 

( Image : Google)

फाल्गुनी नायर नायका ब्रँड सुरु करण्याआधी इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम करत होत्या. २०१२ मध्ये म्हणजे अवघ्या ८ वर्षापूर्वी त्यांनी नायका कंपनीची सुरुवात केली आणि आता त्यांची कंपनी राष्ट्रीय शेअर बाजारात नामांकित झाली आहे. आपले करीयर सोडून या क्षेत्राकडे वळण्याविषयी त्या २ कारणे सांगतात, एक म्हणजे मेकअप विषयी असणारे प्रेम आणि ऑनलाइन मार्केटींग प्लॅटफॉर्ममध्ये असणारी ताकद. फाल्गुनी या गुजराती कुटुंबातून आल्या असून त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता. त्यामुळे कमी वयात त्यांच्यात व्यवसायाचे बीज रोवले गेले होते. स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंग हे त्यांच्या घरातील नेहमीचे विषय असल्याने त्यांना हे समजणे फारसे अवघड गेले नाही. कोणत्याही क्षेत्रात सुरुवात करायची म्हटल्यावर प्रेरणा लागतेच, फाल्गुनी म्हणतात, UTV चे मालक रॉनी स्क्रूवाला आणि PVR सिनेमाचे अजय बिजली हे आपली प्रेरणा आहेत. या दोघांचा आत्मविश्वास आणि जोखीम पत्करण्याची तयारी यामुळे आपण प्रेरीत झालो असे त्या म्हणतात. 

ब्यूटी प्रॉडक्ट ब्रँड तयार करण्याविषयी त्या म्हणतात, परदेशात ब्यूटी प्रॉडक्टच्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्या केवळ आपली उत्पादने विकत नाहीत तर त्या आपल्या ग्राहकांना त्याविषयी योग्य ती माहितीही देतात. भारतातही अशाप्रकारे ब्यूटी प्रॉडक्टविषयी ग्राहकांना योग्य ती माहिती मिळावी असे वाटत होते. केवळ पुरुषांसाठी किंवा इतर स्त्रियांना दाखवण्यासाठी नाही तर स्वत:साठी सुंदर दिसावे असे वाटणाऱ्या महिलांसाठी मला काहीतरी करायचे होते. भारतीय महिला यासाठी तयार असून यासाठीच त्या नायकाला पसंती देतात. महिला सक्षमीकरणाचा एक भाग असल्याचेही फाल्गुनी म्हणतात. त्या म्हणतात, महिलांनी आपल्या कोशातून बाहेर येऊन आपले प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ दोन्ही आत्मविश्वासाने सांभाळायला हवे. दृढ निश्चय असलेली महिला इच्छाशक्तीच्या जोरावर ठरवलेले उद्दीष्ट नक्कीच साध्य करु शकेल. नायकामध्ये महिलांच्या करीयरसाठी बऱ्याच संधी असल्याचेही त्या नेहमी सांगतात. 

( Image : Google)

२०१४ मध्ये पहिले नायका स्टोअर सुरु झाल्यानंतर २०२१ पर्यंत त्याची संख्या ८० पर्यंत गेली आहे. ही ८० स्टोअर देशातील ४० शहरांमध्ये आहेत. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत इतके मोठे ध्येय गाठणाऱ्या या सेल्फ मेड वूमनचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. तर ५ कोटीहून अधिक लोकांनी नायकाचे अॅप्लिकेशन डाऊनलोड केले आहे. या कंपनीचा अर्धा हिस्सा नायर यांच्या मालकीचा असून आता त्यांच्याकडे ६.५ अरब डॉलर इतकी संपत्ती आहे. २०२० मध्ये १६.३ कोटी रुपयांनी तोट्यात असलेली नायका कंपनी २०२१ मध्ये ६१.९ कोटी रुपये नफ्यात आली. याचे श्रेय कंपनीच्या संस्थापक फाल्गुनी नायर यांना आणि त्यांच्या टीमला जाते. राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजमध्ये नामांकित होणारी महिला नेतृत्व करत असलेली ही भारतातील पहिली कंपनी असल्याचे म्हटले जात आहे. फाल्गुनी यांनी आयआयएम अहमदाबाद येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. एएफ फर्ग्युसन आणि कंपनीमधून त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात केली आणि त्यानंतर १८ वर्षे त्या कोटक महिंद्रा बँकेत विविध अधिकारी पदावर काम केले. १९८७ मध्ये फाल्गुनी यांनी संजय नायर यांच्याशी विवाह केला. तर त्यांचा मुलगा आणि मुलगी नायकाचे स्टोअर चालवतात. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीशेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगव्यवसाय