अश्विनी बर्वे
प्रपंच परमार्थ चालवी समान! - वारीत भेटलेल्या स्त्रियांची आठवण लिहिताना बहिणाबाईंची ही ओळ सारखी समोर येत होती. वारीमध्ये पुरुषांबरोबर हजारो स्त्रिया चालतात. वारीला जायचं ठरवलं आणि आपलं आपलं गाठोडे भरून त्या निघाल्या असं झालं असेल का? किती मागचं पुढचं बघावं लागलं असेल. याच विषयावर बोलत होतो तर परभणीहून आलेल्या गंगाबाई म्हणाल्या. ‘पोरगी माहेरी आली आहे, तिला वाटलं आई यावेळेस वारीला जाणार नाही. मला कळत नव्हतं काय करावं ते? पण दिवस जसा जसा जवळ येऊ लागला तसतशी ओढ वाढू लागली. शेतीची कामं संपत नाहीत, पण निघाले. त्याआधी कांदा मार्केटला पाठवला. भाव कधीच नसतो पण करावं लागतंच ना?’मनावर घरच्या लोकांचे ओझे, मागे ओढणारे काम अशा अनेक गोष्टी घेऊन त्या आणि त्यांच्या मैत्रिणी वारीत आल्या होत्या. त्या दहा वर्षापासून वारी करतात. “पहिल्या वर्षी फार भीती वाटली होती.” त्यांची मैत्रीण सुनीता म्हणाली. “अहो सगळे माऊली माऊली म्हणतात, पण आपल्याला आपल्या शरीराची जाण असतेच ना? पण हळूहळू सगळ्याबरोबर चालण्याची सवय झाली. कोणाचं कोणाकडे लक्ष नसतं याचा अनुभव घेतला.” या दोघी फारशा शिकलेल्या नाहीत, पण त्यांचे पाठांतर भरपूर. त्या गावातील भजनी मंडळात अभंग म्हणतात. त्यांना संत जनाबाईंचे बरेचसे अभंग पाठ होते.
एक डॉक्टर होत्या. त्या दरवर्षी सेवा करण्यासाठी वारीत येतात. स्त्रियांना पाळी, स्वच्छता, स्त्रियांचे इतर आजार याविषयी समजून सांगतात. त्यांना विचारले तर त्या म्हणाल्या, “मी माझ्या पुस्तकी ज्ञानातून आरोग्याची माहिती देत असले तरी वर्षभर या स्त्रिया ज्या ज्या अडचणींना धैर्याने तोंड देतात ते बघून मला माझ्याही मानसिक आरोग्याची काळजी वाटते. या स्त्रिया तरी इथे वारीत मोकळ्या होतात. मी त्यांच्यासारखी पदर खोचून नाचू शकत नाही. टाळ वाजवू शकत नाही. मला कसली तरी लाज वाटते. भीती वाटते. या स्त्रियांना ती वाटत नसणार किंवा त्या त्यावर मात करायला शिकल्या असणार. त्यांचे हे रूप मला वर्षभर आठवत राहते आणि मी ही हळूहळू मोकळी होत जाते.’कितीतरी जणी भेटतात. कुणी शिकलेल्या कुणी अल्पशिक्षित, अशिक्षित. पण त्यांना भेटल्यावर कळतं की शिक्षण हे ज्ञान मिळवण्याचे साधन असले तरी तेच एकमेव साधन आहे, असे नाही. कारण शिक्षण नसतानाही अनेक स्त्रियांनी जो विचार केला, त्यासाठी संघर्ष केला त्यात त्यांच्या अनुभवाचाही वाटा मोठा आहे. वारीत अनेक संतांचे अभंग, भारूड, गौळणी आपल्या कानावर पडतात. त्यातील एखादी ओळ कायम लक्षात राहते. कधी कधी ती ओळच आपल्याला जगण्याचा अर्थ सांगते. तो अर्थ समजून घेतच नाही तर जगतही अनेक जणी चालत असतात.अर्थात स्त्रिया वारीला जावोत की अजून कुठे कामाला त्यांना प्रपंच सुटत नाहीच. तरीही त्या आपल्याला मिळणाऱ्या थोड्याशा वेळातून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. जगण्याचा अर्थ शोधत राहतात. आपल्या अवतीभोवतीच्या माणसांचं जगणं अधिक सुखाचं, समाधानाचं होईल, असंही बघतात. आपल्या कुटुंबाचा करून आपल्या इच्छांची वाट चालतात.बहिणाबाई म्हणतातच ना...प्रपंच परमार्थ चालवी समान, तिनेच गगन, झेलियले...
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)ashwinibarve2001@gmail.com