आपल्या देशासाठी आपल्या आयुष्याची आहूती देणारी किती ध्येयवेडी माणसं असतात. त्यापैकीच एक अन्ना मणी. नव्या पिढीत अनेकांनी या महान शास्त्रज्ञ महिलेचं नावही ऐकलं नसेल, मात्र आज गुगलनं त्यांना सन्मानानं डूडल आदरांजली वाहिली आणि आपल्याच देशातील या महान शास्त्रज्ञ महिलेची ओळख देशवासियांना नव्यानं करुन दिली. विज्ञानाप्रती अत्यंत समर्पित आयुष्य तर त्या जगल्याच मात्र भारताच्या हवामान शास्त्र संशोधनालाही त्यांनी वेग दिला, शंभरहून अधिक उपकरणं तयार करत भारतीय हवामानाला पूरक ठरेल असे संशोधन केले. भारतीय हवामान आणि स्थानिक गरजा यांचा मेळ घालत संशोधन करत त्यांनी देशबांधणीतही स्वातंत्र्योत्तर काळात मोठे योगदान दिले.
२३ ऑगस्ट हा त्यांचा १०४ वा वाढदिवस. त्यानिमित्तानं गुगलने खास डूडल केले. अन्ना मणी या भारतातल्या पहिल्यावहिल्या मोजक्या महिला शास्त्रज्ञांपैकी एक. केरळमध्ये त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून वाचनाची त्यांना प्रचंड आवड होती. वडील अतिशय श्रीमंत, त्यांचे वेलचीचे मळे होते. लेकीनं चारचौघींसारखं सुखवस्तू आयुष्य जगावं असं त्यांना वाटत होतं. मात्र अन्ना यांना दोनच गोष्टींचा ध्यास होता एक म्हणजे भौतिकशास्त्र आणि दुसरं म्हणजे नृत्य. पण नृत्य शिकायला आणि त्यातच काम करायला कुटुंब परवानगी देणार नाही याचा त्यांना अंदाज होताच. भौतिकशास्त्राची कमालीची आवड होती मग त्यांनी त्यातच स्वत:ला झोकून दिले. मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात एका तरुणीनं भौतिकशास्त्रात संशोधन करायचं ठरवणं हेच आव्हानात्मक होतं. त्यांनी जिद्द सोडली नाही. १९४० साली त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्कॉलरशीप मिळाली आणि त्यांनी तिथं नोबेल पारितोेषिक विजेते महान शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामन यांच्याकडून शिक्षण घेतले.त्यानंतर त्या लंडनला शिकायला गेल्या. संशोधनाच्या अनेक संधी तिथं उपलब्ध असूनही देश स्वतंत्र झाल्यावर १९४८ साली त्या भारतात आल्या आणि त्याकाळी देशबांधणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्मिती होत असताना त्यांनी त्या कामात झोकून दिले. शंभरहून अधिक उपकरणं तयार करण्यात त्यांचा सहभाग होता. हवामान शास्त्रात त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. इंडिया मिटिओरॉजिकल डिपार्टमेण्टच्या उपसंचालक म्हणून त्या निवृत्त झाल्या. आयुष्यभर त्यांनी देशासाठी हवामान संशोधन हाच ध्यास घेऊन काम केलं.