पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आणि लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ (pervez musharraf) यांना एक दुर्मिळ आजार (amyloidosis) झाला असल्याची बातमी गेल्या दोन दिवसांपासून आपण सगळेच वाचत आहोत. मागील ३ आठवडयांपासून मुशर्रफ दुबईमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. पण एकाएकी त्यांना झालेला आजार नेमका काय आहे? तो कशाने होतो आणि हा आजार झाल्यावर व्यक्तीला नेमका काय त्रास होतो हे समजून घेणे आवश्यक आहे. शरीरात काही प्रकारची प्रथिने वाढल्याने होणाऱ्या या आजाराविषयी विस्ताराने जाणून घेऊया...
हा आजार नेमका काय आहे?
आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी आणि पोषण मिळण्यासाठी प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, स्निग्ध पदार्थ, फायबर, कार्बोहायड्रेटस अशा सर्व गोष्टींची आवश्यकता असते. मात्र यातील काही घटक कमी किंवा जास्त झाले तर शरीराचे कार्य बिघडते. अॅमिलॉइड हे एकप्रकारचे प्रोटीन असून त्याची जास्त प्रमाणात वाढ झाल्यास हा आजार होतो. यामध्ये व्यक्तीची पचनक्रिया बिघडते. त्यामुळे खाल्लेले अन्न पचन होण्यात अडचणी येतात. शरीरातील हृदय, किडनी, रक्तपेशी, मेंदू यांसारख्या भागांमध्ये प्रथिनांची वाढ होते. अशाप्रकारे प्रथिनांची वाढ झाल्याने या अवयवांच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. कालांतराने अवयव निकामी होण्याचा धोका असतो.
आजाराची लक्षणे कोणती?
१. प्रचंड थकवा येणे
२. वजन कमी होणे
३. पोट, पाय यांना सूज येणे
४. हाता-पायांना मुंग्या येऊन ते बधीर होणे
५. त्वचेचा रंग बदलणे
६. जीभेला सूज येणे त्यामुळे अन्न गिळण्यास त्रास होणे
७. श्वसनास त्रास होणे
यावर उपचार काय ?
१. सुरुवातीच्या टप्प्यात असला तर हा आजार बरा होऊ शकतो, मात्र उपचारांना उशीर झाल्यास गुंतागुंत वाढत जाते.
२. दुर्मिळ मानला जाणारा हा आजार पूर्णपणे बरा होणे शक्य नसल्याने रुग्णाला बऱ्याच उपचारांतून जावे लागते.
३. या आजाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अनुवंशिक दोष असल्याने या आजाराचा सामना करावा लागत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.