ओजस सु. वि. (स्तनपान सल्लागार)
करिअर नुकतच सुरू होत आहे किंवा ऐन बहरात आहे आणि त्याचवेळी ‘ गुड न्यूज’ ही समजली की हसावं की रडावं कळत नाही अशी अनेकींची स्थिती असते. अनेकदा बेबी प्लॅन करत असताना करिअरमध्ये नक्की किती ब्रेक घ्यायचाय ते समजत नाही. बाळ झालं की काही जणींना लगेच कामावर जाण्याची घाई झालेली असते. तर काही जणींना बाळ सोडून कामावर जायचं ही कल्पनाही नको वाटते. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या निर्देशानुसार बाळाला किमान सहा महिने आईचे दूधच दिले गेले पाहिजे. एक वर्षानंतर पुरक आहारासोबत आईचे दूध हाच पोषणाचा मुख्य स्रोत आहे. बाळाच्या रोगप्रतिकारशक्ती, मानसिक विकास, बुद्धिमत्ता विकास आणि सामाजिक जडणघडण यासाठी बाळाच्या किमान दुसऱ्या वाढदिवसापर्यंत स्तनपान दिले गेले पाहिजे.
समाजातील अनेक नवमातांना तर आपले काम सुटले तर खायचीच भ्रांत आहे, अशीही स्थिती असते. तसे मात्र असू नये. प्रत्येक नवमातेला पूर्ण पगारी मातृत्व रजा मिळणे हा तिचा आणि नवजात बाळाचा हक्क आहे. तो प्रत्येक कामाच्या ठिकाणी दिला गेला पाहिजे.
स्तनपानाची उद्दिष्ट साध्य करायची की आपलं करिअर सांभाळायचं? यापैकी एकाचीच निवड आईला करावी लागते का? तर तसे अजिबात नाही. आई आपले करिअर चालू ठेऊनही बाळाला सुयोग्य स्तनपान करत मातृत्वाचा पुरेपूर आनंद घेऊ शकते. करिअरची गाडी पुन्हा कधी रुळावर आणायची हा प्रत्येकीचा स्वतंत्र निर्णय आहे आणि असावा.
करिअर आणि मातृत्व यांचे संतुलन साधण्यासाठी काय करता येईल?
१. काम सुरू करण्यापूर्वी आपण शारीरिक दृष्ट्या सक्षम झालोय का हे बघावं. प्रसूतीमध्ये शरीराची झीज झालेली असते. ती भरून काढण्यासाठी आईने पुरेशी विश्रांती घ्यावी. सकस आहार घ्यावा. डॉक्टरांनी दिलेली औषधे, सप्लीमेंट्स व्यवस्थित घ्याव्यात. बाळ सांभाळणे आणि काम करणे ह्या दोन्हीसाठी आपण सक्षम झालोय ना ते स्वतःला विचारावे.
२. शक्यतो कामाच्या ठिकाणी बाळाला सोबत घेऊन जावे (कामाचे ठिकाण धोक्याचे नसल्यास). किंवा बाळाचे पाळणाघर कामाच्या अगदी जवळ असावे, जेणेकरून बाळाला गरजेनुरूप स्तनपान देता येईल. घरूनच काम करता आल्यास सर्वात सोपे.
३. बाळापासून आई दूर जाणार असल्यास बाळाच्या गरजेनुसार ब्रेस्टमिल्क काढून फ्रीजमध्ये स्टोअर करावे. ब्रेस्टपंपच्या सहाय्याने किंवा हाताने ब्रेस्टमिल्क काढणे आईने शिकून घ्यावे. कधी व किती वेळा ब्रेस्टमिल्क काढायचे व सुरक्षित कसे ठेवायचे यासाठी वेळेचे नियोजन करण्यासाठी स्तनपान सल्लागारांचा सल्ला घ्यावा.
४. स्तनपान देणे शक्य नसते त्यावेळी बाळाला आईचे काढलेले दूध चमचा- वाटीने किंवा कपने प्यायला द्यावे. बाटलीची सवय बाळाला लावू नये.
५. आई कामावर जाणार असेल त्याआधी बाळाला हळूहळू आई काही काळ नसेल याची सवय करून देण्यासाठी आधी थोडा थोडा वेळ मग एखादा तास, मग काही तास असे सांभाळणाऱ्यांकडे एकट्याने राहण्याची सवय करून द्यावी. आई परत येते याची खात्री बाळाला झाली की बाळ निश्चिंत होते नाहीतर अचानक आई खूप काळ सोबत नसेल तर बाळावर ताण येतो.
६. आई कामावर जायला लागल्यावर बाळ आईकडे दुधाची खूप मागणी करू लागते. खरतर ती दुधाची मागणी नसून, आईच्या स्पर्शाची मागणी असते. बाळाला आई ही सर्वात जवळची व्यक्ती असते. तिची ऊब बाळाला सर्वात हवीहवीशी असते. आई कामावरून परत येते तेव्हा बाळाला दुरावा भरून काढायचा असतो त्यामुळे बाळ सतत आईला दूध मागते. अशावेळी आईने कामावरून परत आल्यावर बाळाला पुरेसे दूध पाजून झाल्यावर त्याला आपल्या कडेवर, छातीवर शक्य तितका वेळ धरून ठेवावे. बाळाशी भरपूर गप्पा माराव्यात.
७. बाळाची वाढ सुरुवातीची दोन-तीन वर्षे सर्वाधिक होणार असते. त्यानंतर ते स्वतंत्र होणार असते. त्यामुळे त्याकाळात आईने कामाला हळूहळू सुरुवात करावी. ताण येत आहे असे वाटल्यास थोडा काळ कामातून ब्रेक घ्यावा आणि आत्मविश्वासपूर्वक आपला प्राधान्यक्रम ठरवावा.
https://www.instagram.com/themilkyway_ojas/
http://linktr.ee/ojas.sv.lc
contact: 94035 79416