lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Pregnancy > महिलांची वयानुसार घटणारी जननक्षमता आणि AMH लेव्हल, मूल होण्यासाठी हे का महत्त्वाचं ठरतं?

महिलांची वयानुसार घटणारी जननक्षमता आणि AMH लेव्हल, मूल होण्यासाठी हे का महत्त्वाचं ठरतं?

वय तीस पूर्ण होण्याच्या आत गर्भधारणा प्लॅन करणे उत्तम पण काही कारणाने ते शक्य नसेल तर मग निदान AMH ही तपासणी करून जननक्षमतेचा अंदाज घेणे संयुक्तिक आहे. गर्भधारणेच्या बाबतीत स्त्रीचे वय हा सर्वात महत्वाचा आणि मोठा घटक आहे ही गोष्ट लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:32 PM2021-07-02T16:32:20+5:302021-07-02T16:37:03+5:30

वय तीस पूर्ण होण्याच्या आत गर्भधारणा प्लॅन करणे उत्तम पण काही कारणाने ते शक्य नसेल तर मग निदान AMH ही तपासणी करून जननक्षमतेचा अंदाज घेणे संयुक्तिक आहे. गर्भधारणेच्या बाबतीत स्त्रीचे वय हा सर्वात महत्वाचा आणि मोठा घटक आहे ही गोष्ट लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.

women fertility age and AMH levels, what you should know..what AMH levels means | महिलांची वयानुसार घटणारी जननक्षमता आणि AMH लेव्हल, मूल होण्यासाठी हे का महत्त्वाचं ठरतं?

महिलांची वयानुसार घटणारी जननक्षमता आणि AMH लेव्हल, मूल होण्यासाठी हे का महत्त्वाचं ठरतं?

Highlightsगर्भधारणा वेळेवर होणे हे महत्त्वाचे आहेच पण एक कोवळा जीव या जगात आणण्याधी पतीपत्नींचे नाते परिपक्व आहे ना आणि भोवतालची परिस्थिती अनुकूल आहे ना हे तपासून बघणे या गोष्टींना पर्याय नाही.

डॉ. शिल्पा चिटणीस जोशी

"डॉक्टर ,आमच्या लग्नाला आता सहा वर्षे होताहेत.. इतके दिवस प्रेग्नन्सी चा विचार नव्हता पण आता आम्ही याबद्दल सिरियसली विचार करतोय. म्हणून आधी तुम्हाला भेटायला आलो"
"ठीक आहे, तुमची वयं किती दोघांची?"
माझं आता ३४ पूर्ण होईल आणि याचं ३६ आहे वय.."
"ओके..गेली सहा वर्षे तुम्ही काही गर्भनिरोधक वापरत होतात?"
"नाही डॉक्टर.. आम्ही सुरवातीचे सहा महिने सोडले तर कधीच गर्भनिरोधक नाही वापरलं.."
"तरीही या सहा वर्षात प्रेग्नन्सी कधीच राहिली नाही?"
"नाही राहिली प्रेग्नन्सी मॅम.. आम्हालाही थोडं आश्चर्य वाटलं पण आम्हाला नकोच होती प्रेग्नन्सी म्हणून दुर्लक्ष केलं आत्तापर्यंत.
पण गेले वर्षभर पाळी थोडी मागेपुढे होतेय आणि ब्लीडिंग कमी कमी व्हायला लागलंय असं वाटतं"
अशी केस हिस्ट्रीअसलेली जोडपी आजकाल खूप वेळा भेटतात आम्हाला क्लिनिक मध्ये.
त्याची वयं लक्षात घेऊन आता अजून वेळ घालवण्यात अर्थ नसतो. मग भराभर तपासण्या आणि रिपोर्ट्स केले जातात. बऱ्याच वेळा रिपोर्ट्समध्ये या मुलींची Serum AMH लेवल? कमी येते आणि मग टेन्शनची सुरवात होते.


 
काय आहे बरं ही AMH लेवल? जरा नीट समजावून घेऊया.

स्त्रीच्या ओटीपोटात गर्भाशय, अंडाशय म्हणजे ओवरी आणि गर्भनलिका असे मुख्य अवयव असतात. यामध्ये अंडाशयातून दर महिन्याला एक स्त्रीबीज परिपक्व होऊन बाहेर पडणे अपेक्षित असते. हे स्त्रीबीज अंडाशयातून बाहेर पडून गर्भनलिकेत जाते. लैंगिकसंबंधा नंतर शुक्राणू योनीमार्गातून गर्भाशयात येतात. तिथून ते गर्भनलिकेत स्त्रीबीजाकडे जातात. तिथे फलन होऊन गर्भ तयार होतो आणि गर्भाशयात येऊन रुजतो.
या सगळ्या प्रक्रियेत अंडाशय म्हणजे ओवरीत पुरेशी स्त्रीबीजे असणे अत्यावश्यक आहे. मुलगी जन्माला आल्यापासून पाळी सुरू होइपर्यंत या अविकसित स्त्रीबीजांची संख्या भरपूर असते. नंतर मात्र ही संख्या कमी होण्यास सुरुवात होते. साधारणपणे स्त्रीची पाळी थांबेपर्यंत ओवरीत असलेली स्त्रीबीजे तिला पुरतात पण काही स्त्रियांमध्ये ही स्त्रीबीजांची संख्या खूप झपाट्याने कमी होते. आणि त्यामुळे जननक्षमता उतरणीला लागते. भारतीय स्त्रियांमध्ये ही जननक्षमता वयाच्या तीस वर्षांपासून कमी होऊ लागते आणि पस्तिशीनंतर वेगाने घसरणीला लागते.
Serum AMH ही तपासणी आपल्याला स्त्रीच्या जननक्षमतेची नेमकी कल्पना देते.AMH म्हणजे antimullerian hormone. हा हॉर्मोन स्त्रीबीजांची संख्या कमी होऊ नये म्हणून धडपडत असतो. त्यामुळे त्याचे प्रमाण कमी झाले की स्त्रीबीजे वेगाने कमी होतात. दुसरीकडे पॉलिसिस्टिक ओवरीज(लक्षणे :अनियमित पाळी, चेहऱ्यावर अनावश्यक केस,फोड,लठ्ठपणा,ओवरीचा मोठा आकार ) ही व्याधी असलेल्या स्त्रियांमध्ये अर्धवट अविकसित स्त्रीबीजांची संख्या खूप जास्त असते त्यामुळे AMH चे प्रमाण खूप वाढलेले दिसते. या स्त्रियांनासुद्धा गर्भधारणेला समस्या येतात. त्यामुळे AMH चे प्रमाण योग्य असणे हे स्त्रीच्या जननक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहे.
ही तपासणी तशी अलीकडच्या काळातली आहे पण अल्पावधीतच ही खूप महत्त्वाची ठरली आहे कारण बाकी सगळ्या गोष्टी नॉर्मल दिसत असताना स्त्री गर्भार न राहण्याचे कारण या तपासणीमुळे आपल्याला कळू शकते.
तसंच वारंवार गर्भपात होण्याचे एक कारण स्त्रीबीजाचा खराब झालेला दर्जा हे असू शकतं. अश्या स्त्रीयांची पण AMH लेवल कमी आढळून येते.

AMH चे प्रमाण कमी झाले असेल तर ते वाढविण्यासाठी काही थोडीफार औषधे आहेत पण त्याचा फार उपयोग होईलच असे नाही. पाळी बंद होण्याआधी जवळपास तेरा ते चौदा वर्षं AMH कमी होण्यास सुरुवात होते.यामध्ये काही प्रमाणात जनुकीय कारणे ही असू शकतात. AMH लेवल कमी झालेल्या स्त्रियांची पाळी इतर स्त्रियांच्या मानाने लवकर थांबते.
AMH ची लेव्हल एका प्रमाणाबाहेर खाली गेली तर IVF तंत्रज्ञान वापरून देखील गर्भधारणा अवघड होऊन बसते कारण पुरेशी स्त्रीबीजे च मिळू शकत नाहीत.अश्यावेळी दुसऱ्या स्त्रीची स्त्रीबीजे आणि नवऱ्याचे शुक्राणू वापरून गर्भ तयार करता येतो आणि गर्भधारणा हवी असलेल्या स्त्रीच्या गर्भाशयात तो रुजण्यासाठी सोडला जातो. यामध्ये बाळ स्त्रीच्या पोटातच तिचं म्हणूनच वाढणार असतं. तरीही जनुकीय पालकत्व हवे असल्यामुळे खूप स्त्रिया हा उपाय नाकारतात. खरंतर तिच्या शरीरातल्या रक्तामासावर वाढलेलं हे बाळ सर्वार्थाने तिचंच असतं हे समजून घेतलं तर बऱ्याच स्त्रियांची मानसिक व्यथा कमी होईल.
हल्ली IVF तंत्रज्ञानामध्ये AMH कमी असलेल्या स्त्रियांच्या ओवरीतूनही जास्तीत जास्त स्त्रीबीजे मिळवण्यासाठी काही नवीन संशोधन आणि उपाय उपलब्ध आहेत.त्याचाही वापर करता येऊ शकतो.
या सगळ्या माहितीचा उपयोग करून तरुण मुली आणि जोडपी काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. आजकाल लग्न उशिरा होताहेत. तरुण जोडप्यांची लगेच मूल होऊ देण्याची इच्छा नसते. पण अतिउशीर हानिकारक ठरू शकतो. वय तीस पूर्ण होण्याच्या आत गर्भधारणा प्लॅन करणे उत्तम पण काही कारणाने ते शक्य नसेल तर मग निदान AMH ही तपासणी करून जननक्षमतेचा अंदाज घेणे संयुक्तिक आहे. मात्र गर्भधारणेच्या बाबतीत स्त्रीचे वय हा सर्वात महत्वाचा आणि मोठा घटक आहे ही गोष्ट लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.
एखाद्या स्त्रीला परिस्थितीमुळे गर्भधारणा शक्य नसेल तर IVF तंत्रज्ञान वापरून स्त्रीबीजे काढून घेऊन गोठवून ठेवणेही आजकाल शक्य आहे. तरुण वयात झालेल्या कॅन्सरच्या उपचारांमुळे ओवरी आणि स्त्रीबीजे यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असेल अश्या केसेस मध्ये सुद्धा स्त्रीबीजे गोठवणे शक्य आहे. अशी स्त्री तिच्या सोयीनुसार नंतर गर्भधारणा प्लॅन करू शकते. ही प्रक्रिया साहजिकच बऱ्यापैकी खर्चिक आहे. पण काही स्त्रियांसाठी हे वरदान ठरू शकते.
हल्ली मूल होण्यासाठी उपचार घेणाऱ्या बऱ्याच जोडप्यांना याबाबतीतल्या तपासण्या माहीत असतात. माझं AMH कमी आहे असं ही सांगणाऱ्याही पेशंट्स असतात .पण AMH म्हणजे नक्की काय आणि ते का कमी होतं याबद्दल माहिती नसते. वरील माहितीचा अश्या जोडप्यांना आणि नुकतेच लग्न झालेल्या जोडप्यांना उपयोग होईल अशी आशा करते.
शेवटी एक महत्वाची गोष्ट..गर्भधारणा वेळेवर होणे हे महत्त्वाचे आहेच पण एक कोवळा जीव या जगात आणण्याधी पतीपत्नींचे नाते परिपक्व आहे ना आणि भोवतालची परिस्थिती अनुकूल आहे ना हे तपासून बघणे या गोष्टींना पर्याय नाही बरं का!! नाहीतर एकमेकांशी पटत नसलेल्या जोडप्यांना एक मूल होऊन जाऊदे असा भीषण बुरसटलेला सल्ला देणारे कमी नाहीत आपल्या समाजात..पटतंय का तुम्हाला?

(लेखिका स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: women fertility age and AMH levels, what you should know..what AMH levels means

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.