डॉ. किशोर अतनूरकर (स्त्री रोग, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आणि समुपदेशक)
डॉक्टर किंवा समुपदेशक जोडप्यांची प्रामुख्याने दोन वर्गात विभागणी करतात. एक म्हणजे पूर्वी एकही गर्भधारणेचा अनुभव न घेतलेली जोडपी आणि दुसरं म्हणजे गर्भधारणा आणि अपत्यजन्माच्या संदर्भात काही अप्रिय घटनांचा अनुभव घेतलेली जोडपी. ज्या जोडप्यांना लग्न होऊन एक-दोन वर्ष झाले पण एकदाही गर्भधारणा झालेली नाही त्यांच्यात वंध्यत्व संदर्भात काही तपासणी अथवा उपचार झाले किंवा नाही याची माहिती घेतली जाते. दुसऱ्या गटात, पुर्वीचे काही वारंवार होणारे गर्भपात, पूर्वीचं सिझेरियन, पूर्वीच्या गर्भधारणेत बीपी वाढलं होतं किंवा नाही, पूर्वीचं एखादं बाळंतपण नऊवा महिना लागण्याच्या आतच झालं का, अशी सगळी माहिती घेऊन पुढच्या गर्भधारणेचं नियोजन करावं लागतं.
१. रक्तक्षय (ॲनिमिया) किंवा हिमोग्लोबिनची कमतरता ही भारतीय महिलांमधील सर्वसामान्य समस्या आहेत. ॲनिमियाच्या अवस्थेतच कितीतरी महिला गर्भवती होतात. ॲनिमियामुळे आईच्या प्रकृतीला तर धोका असतो. बाळाची वाढ खुंटते. कमी दिवसाचं आणि कमी वजनाचं बाळ जन्माला येऊ शकतं म्हणून गर्भधारणेपूर्वीच प्रत्येक महिलेने आपलं हिमोग्लोबिन तपासलं पाहिजे आणि ते कमी असल्यास, लोह आणि फोलिक ॲसिड मिश्रित गोळ्या घेऊन, आहारात आवश्यक ती सुधारणा करून मगच गर्भधारणा राहू द्यावी.
२. गर्भधारणेपूर्वीच्या या चिकित्सा भेटीत जी उद्या आई होणार आहे तिची आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांबद्दलची माहिती(Family History) विचारली जाते. उदा. तिच्या आई-वडिलांपैकी कुणाला मधुमेह अथवा उच्चरक्तदाबाची समस्या आहे का हे पाहिलं जातं. तिला स्वतःला मधुमेह, उच्चरक्तदाब, थायरॉईडचा आजार आहे किंवा नाही याची तपासणी केली जाते. असल्यास त्यावर उचार करूनच मग गर्भधारणेचा ' चान्स ' घेण्याचा सल्ला दिला जातो. बीपी वाढलेलं असल्यास बाळाची वाढ खुंटते, आईला झटके येण्याची शक्यता असते, मधुमेहाचा इलाज न केल्यास जन्मदोष असलेलं बाळ जन्माला येऊ शकतं. थायरॉइडची समस्या असताना गर्भ राहिल्यास आणि तिला याबाबतीत वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास बाळाच्या बौध्दिक वाढीवर परिणाम होऊ शकतो. या प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या असून, त्याची जर कल्पना पेशंट किंवा डॉक्टरला नसताना गर्भ राहिल्यास अपत्यजन्मासंबंधी गुंतागुंत होऊ शकते. याची कल्पना अगोदरच असल्यास ती टाळता येऊ शकते.
३. रक्ताच्या नात्यात लग्न झालं आहे का, एखादं मतिमंद बाळ जन्माला आलं आहे का, कुणाला वंध्यत्वाची समस्या होती का ही माहिती देखील समुपदेशनाच्या दृष्टिकोनातून महत्वाची असते. रक्ताच्या नात्यात झालेल्या लग्नानंतर होणाऱ्या गर्भधारणेत जन्मदोषांसहित जन्माला येणाऱ्या बाळाचं प्रमाण जास्त असतं. काही स्पेशल तपासण्या कराव्या लागतात.
४. गर्भधारणेपूर्वी चिकित्सा किंवा समुपदेशनासाठी आलेल्या जोडप्यांच्या कुटुंबात कुणाला थॅलेसेमिया, सिकल सेल अनेमिया, डाउन्स सिंड्रोम सारखे अनुवांशिक आजार आहेत किंवा नाहीत याची देखील चौकशी केली जाते. असल्यास या जोडप्यापैकी कुणाला असा आजार आहे याची तपासणी करूनच मग गर्भधारणेसाठी ' परवानगी ' दिली जाते.
५. एखादी मुलगी किंवा स्त्री जर लठ्ठ असेल तर तिने अगोदर वजन कमी करावं आणि मगच गर्भ राहू द्यावा. गर्भवती स्त्री लठ्ठ असेल तर गर्भधारणेच्या कालावधीत, बीपी वाढणं, मधुमेह होणं, जास्त वजनाचं बाळ होणं, रक्ताभिसरणात गुठळ्या तयार होऊन गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. अशा महिलांमध्ये सिझेरियन होण्याची शक्यता पण जास्त असते. यासाठी वजन कमी करूनच मग ' चान्स ' घेणं योग्य. वजनाने खूप कमी असलेल्या महिलांनी देखील, ' तुमचं स्वतःचं वजन वाढावा आणि नंतर गर्भधारणा राहू द्या ' अशी सुचना द्यावी लागते. गर्भधारणेपूर्वी, लग्न जवळच्या नात्यात झालं आहे किंवा नाही हे पाहिलं जातं.
(लेखक स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. MD OBGY, Ph D. Social Sciences, MS counseling & Psychotherapy)
atnurkarkishore@gmail.com
Mob : 9823125637