Join us
Daily Top 2 Weekly Top 5

प्रेगन्सीमध्ये जंक फूड खाण्याचे डोहाळे लागलेत ? पण मग किती खावे, का, आणि कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 17:08 IST

प्रेगन्सीमध्ये लागणारे डोहाळे हा तर मोठाच चर्चेचा विषय. कुणाला कशाचे डोहाळे लागू शकतात, हे काही सांगता येत नाही. अशा काळात रसनातृप्ती करणारे जंक फूड आणि रस्त्यावर मिळणारे चटपटीत, चटकदार पदार्थही खूपच खावेसे वाटतात. पण चायनीज पदार्थ आणि जंक फूड अजिबात खाऊ नका, असे कानावर आलेले असते. खरेच तसे असते का ?

ठळक मुद्दे गरोदर महिलांचा आहार हा समतोल असला पाहिजे. तिखट, खारट, आंबट, गोड असे सगळेच पदार्थ त्यांनी दररोजच्या आहारात घ्यावेत.गरोदर महिलांनी काय खावे आणि टाळावे, याविषयीचे अनेक अभ्यास आहेत. त्यामुळे तब्येत सांभाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार आणि व्यायाम ठेवणे हे सर्वोत्तम

गरोदरपण सुरू होताच सुरूवातीचा तीन ते चार महिन्यांचा काळ काही गर्भवतींसाठी खूपच कठीण असतो.  उलट्या, मळमळणे, चकरा येणे असा त्रास सुरूवातीच्या काळात होत असल्याने अनेक जणी त्रस्त झालेल्या  असतात. त्यामुळे बऱ्याच जणींना या काळात विशेष काही खावेसे वाटतही नाही. अनेकींची तर खाण्यावरची वासना उडून जाते. साधारणपणे चौथा, पाचवा महिना सुरू झाला, की त्रास जरा कमी होतो आणि मग सुरू होतात डोहाळे. 

फळे, गोड पदार्थ, तिखट पदार्थ यांचे डोहाळे लागले तर घरचे लोक मोठ्या हौसेने डोहाळे पुरवतातही. पण काही जणींना तर मॅगी, नूडल्स, मन्चुरियन, पिझा, बर्गर असे जंक फुड खाण्याचे डोहाळे लागतात. अजिनोमोटो आणि त्यासारखेच काही हानिकारक घटक चायनिज पदार्थांमध्ये असतात आणि ते बाळाच्या  वाढीसाठी अयोग्य असतात. त्यामुळे गर्भारपणात असे पदार्थ अजिबातच खाऊ नयेत, अशा सूचना गर्भवतींना वारंवार ऐकायला मिळतात. एकीकडे असे सगळेच टेस्टी टेस्टी आणि पाहताक्षणीच ताेंडाला पाणी सुटेल असे चमचमीत पदार्थ आणि दुसरीकडे 'असे पदार्थ ९ महिने बंद', अशा मिळालेल्या सक्त सूचना यापैकी काय करावे आणि काय करू नये, या संभ्रमात अनेकजणी अडकून पडतात.

याविषयी सांगताना औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले की, जंक फुड अतिप्रमाणात खाणे गर्भवतींसाठी अयोग्यच असते. पण खाण्याची  खूपच इच्छा झाली, तर महिन्यातून एकदा असा पदार्थ खाण्यास हरकत नाही. पण या पदार्थांचे प्रमाण वाढले तर त्यातून गर्भवतींचे योग्य पोषण होत नाही. त्यामुळे मग कॅल्शियम, आयर्न या घटकांची कमतरता निर्माण  होते आणि असे होणे आई आणि होणारे बाळ या दोघांसाठीही चांगले नसते. त्यामुळे या पदार्थांचा अतिरेक होऊ देऊ नका. महिनाभर जर पौष्टिक,  सकस आहार घेत असाल, तर महिन्यातून एकदा असा एखादा पदार्थ खाण्यास काहीही हरकत नाही, असेही डॉ. गडप्पा यांनी सांगितले. 

 

डोहाळे का लागतात डोहाळे लागणे ही वरवर पाहता दिसते तेवढी सहज घेण्याची गोष्ट नाही. गर्भारपणाच्या सुरवातीच्या तीन महिन्यांमध्ये शरिरात होणाऱ्या बदलांमुळे महिलांना आंबटचिंबट पदार्थ खूप खावेसे वाटतात. चौथ्या महिन्यापासून मात्र त्याचे प्रमाण कमी होऊ लागते आणि  गोड, तिखट पदार्थ  तसेच फळेही खूप  खावी वाटतात. साधारण चाैथ्या- पाचव्या महिन्यानंतर गर्भवती महिलांच्या शरिरात ज्या घटकांची कमतरता असेल, ते पदार्थ त्यांना खावेसे वाटतात. यालाच आपण डोहाळे लागणे असे म्हणतो.   

टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसीगर्भवती महिलाजंक फूड