Join us   

गरोदरपणातल्या हार्मोन्स बदलांचा डोळ्यांवर होतो परीणाम ! गरोदरपणात डोळे सांभाळा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2021 5:58 PM

गरोदरपण ही बाईसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची अवस्था असते. यामध्ये शरीरात होणारे बदल समजून घेऊन त्यानुसार योग्य ती काळजी घ्यायला हवी, पाहूयात गरोदरपणातील डोळ्यांच्या समस्यांविषयी...

ठळक मुद्दे गर्भधारणेच्या काळात डोळ्यांची विशेष काळजी घ्यायला हवी...इतर गोष्टींबरोबर डोळ्यांकडेही द्या लक्ष, ठरेल फायदेशीर

गर्भारपण म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा काळ. यामध्ये शरीरात ज्याप्रमाणे बदल होतात त्याचप्रमाणे भावनिक, मानसिकही बदल होत असतात. हार्मोन्समध्ये सातत्याने होणारे बदल याला कारणीभूत असतात. ९ महिन्यांमध्ये महिलेच्या शरीरात होणाऱ्या बदलांची आपल्याला काही प्रमाणात कल्पना असते. पण त्याशिवायही अनेक गोष्टी असतात ज्या या ९ महिन्यात महिलांच्या आरोग्यावर परिणाम करत असतात. तुम्हाला कदाचित वाचून आश्चर्य वाटेल की या काळात महिलांच्या डोळ्यांमध्येही बदल झाल्याचे आढळून येते. 

गरोदरपणात शरीराची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते व त्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण देखील वाढते. शरीरातील हार्मोन्समध्ये व रक्तदाबात सातत्याने चढ-उतार होतो. या सर्व गोष्टींमुळे डोळ्यांवर व नजरेवर परिणाम होऊ शकतो. बऱ्याचदा हे नजरेमधील बदल तात्पुरते असतात, पण या काळात होणारे काही बदल हे धोक्याची घंटा असू शकतात. ज्यासाठी लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. अनेकींना गरोदरपणात उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवू शकतो. हा वाढलेला रक्तदाब हे नजरेतील अचानक बदलाचे मुख्य कारण असू शकते. हा आजार नव्याने होणाऱ्या आईसाठी व बाळासाठी धोकादायक ठरू शकतो. 

( Image : Google)
   लक्षणे 

* कमी दिसणे - गर्भारपणात महिलेला अचानक कमी दिसायला लागते. अशावेळी त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ला घ्यायला हवा.

* गोष्टी दोन दोन दिसणे - अनेकदा गर्भवती महिलांना समोर एकच गोष्ट असेल तरी दोन-दोन दिसते. हा त्रास नेमका कशामुळे होतो हे डॉक्टरच सांगू शकतात, त्यामुळे वेळीच डॉक्टरांना भेटणे गरजेचे आहे. 

* काही काळापुरती अंधारी येणे - गर्भारपणात महिलांना एकाएकी अंधारी आल्यासारखी वाटते. त्यामुळे आपण घाबरुन जातो. अशी अंधारी का आली ते आपल्याला कळत नाही. पण काही सोप्या उपायांनी ही समस्या बंद करता येऊ शकते. 

* प्रकाशाचा त्रास होणे - गरोदरपणात डोळे काही प्रमाणात क्षीण झालेले असतात. त्यामुळे डोळ्यांना तीव्र प्रकाशाचा नेहमीपेक्षा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी या समस्या अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.  

( Image : Google)

तुम्हाला आधीपासून काचबिंदूची समस्या असेल आणि वरीलपैकी काही त्रास जाणवल्यास लगेचच नेत्रतज्ज्ञांना भेटा. कारण काचबिंदूची डोळ्यांचा दाब कमी करणारी व गरोदरपणात सुद्धा चालणारी औषधे या काळात वापरणे गरजेचे असते. गर्भारपणातील हॉर्मोन्सच्या चढ- उतारा मुळे गरोदरपणात डोळ्यांचा कोरडेपणा वाढू शकतो. ही समस्या दूर होण्यासाठी म्हणजेच डोळे ओले राहावेत म्हणून थेंबांच्या औषधांचा वापर करावा. ही औषधेही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवीत. हल्ली कमी वयातील मधुमेह ही मोठी समस्या झालेली आहे. त्यामुळे अगोदर पासून मधुमेह असल्यास किंवा गरोदरपणात मधुमेह झाल्यास डोळ्यांमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याचे व वाढण्याचे प्रमाण असते. त्यामुळेदेखील नजर अंधूक होऊ शकते त्यामुळे वेळोवेळी नेत्रतज्ज्ञ व तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गरोदरपणात शरीराच्या पाणी धरून ठेवण्याच्या वाढलेल्या क्षमतेमुळे काही महिलांमध्ये बुब्बुळाचा आकार बदलल्याचे व चष्म्याचा नंबर बदलल्याचे देखील आढळून येते. पण प्रसूतीनंतर व बाळाला अंगावर पाजणे बंद केल्यानंतर हा आकार पुर्वव्रत होतो त्यामुळे गरोदरपणात चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस बदलण्याची घाई करू नका. याबरोबरच गरोदरपणात किंवा बाळंत झाल्यानंतर चष्म्याचा नंबर घालविण्याचे ऑपेरेशन देखील करू नये. याबरोबरच गरोदरपणात डोळ्यांसाठी कुठल्याही प्रकारचे ड्रॉप्स किंवा औषधे वापरण्याआधी त्या औषधांचा काही धोका नाही ना याची खात्री करुन मगच वापरा. 

डोळ्यांमध्ये गरोदरपणात झालेले बदल हे बऱ्याचदा किरकोळ व कमी धोक्याचे असतात. पण तरीही कुठल्याही प्रकारचा बदल हा किरकोळ आहे की धोक्याचा हे स्वतः ठरविण्यापेक्षा नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणेच कधीही रास्त आहे. 

- डॉ. ऐश्वर्या मुळे नेत्रतज्ज्ञ 

टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसीडोळ्यांची निगाहेल्थ टिप्स